निस्सीम गोवाप्रेमी वेंडेल रॉड्रिक्स

0
132
  •  निमिषा पळ

वेंडेल रॉड्रिक्स भारतातील नामांकित फॅशन डिझायनर. जागतिक कीर्ती असलेली व्यक्ती. त्यांच्या या अशा अचानक निघून जाण्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. मी स्वतः काही दिवस त्यांच्या हाताखाली एक प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं आणि आज त्यांच्याबद्दल लिहावंसं वाटलं.

 

वेंडेल रॉड्रिक्स भारतातील नामांकित फॅशन डिझायनर. जागतिक कीर्ती असलेली व्यक्ती. त्यांच्या या अशा अचानक निघून जाण्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. मी स्वतः काही दिवस त्यांच्या हाताखाली एक प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं आणि आज त्यांच्याबद्दल लिहावंसं वाटलं. गोव्याचं नाव त्यांनी जगात पोहोचवलं. त्यांच्या स्वभावात कधीच मोठेपणा नव्हता. ही सगळ्यांशी मिळूनमिसळून वागणारी व्यक्ती, एक मुक्त विचारवंत. त्यांना गोव्याबद्दल अत्यंत आदर. त्यांच्या डिझाईनमध्ये पण गोवेकर असल्याचा आभास असायचा. कोलवाळविषयी अत्यंत प्रेम. खूपजण विदेशात जाऊन तिथलेच होतात आणि स्वदेश विसरतात. हा माणूस स्वतःच्या मातीशी जागला. आपल्या जन्मभूमीसाठी त्यांनी काम केले. आपल्या देशाचं नाव त्यांनी फॅशन जगतात उंचावर नेले.

पद्मश्री वेंडेल रॉड्रिक्स यांचा जन्म २८ मे १९६० रोजी गोवन कॅथलिक कुटुंबात झाला. ते मुंबईत लहानाचे मोठे झाले. त्यांचे शालेय शिक्षण सेंट मायकल हायस्कूल, माहिम येथे झाल्यानंतर त्यांनी कॅटरिंग या विषयात डिप्लोमा केला आणि मग विदेशात मस्कत येथे असिस्टंट डायरेक्टर म्हणून रॉयन ओमान पोलीस ऑफिसर क्लब येथे काम करू लागले. त्यांना या प्रोफेशनमध्ये कधीच रस वाटला नाही. त्यांची ओढ फक्त फॅशनडिझायनिंग क्षेत्राकडे होती. त्यांना हे क्षेत्र खुणावत होते. नोकरी करून कमावलेले पैसे साठवून त्यांनी फॅशन डिझायनिंग डिग्री संपादन करण्यासाठी वापरले. त्यांनी लॉस एन्जलिस आणि पॅरिस येथून हे शिक्षण पूर्ण केले.

पद्मश्री वेंडेल रॉड्रिक्स यांचा पहिला फॅशन शो हॉटेल ऑबेरॉय, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी त्याचं लेबल लॉंच केलं. गार्डन वरेली आणि लक्मे कॉस्मेटिक्ससाठी त्यांनी डिझायनिंग केलेलं. १९८९ मध्ये हा पहिला शो झाला. त्यांचं पहिलं कलेक्शन मॉडेल मोहर जेसीयासोबत त्यांनी प्रस्तुत केलं. यात त्यांचे सहा पेहराव पूर्ण झाले होते. निधीअभावी इतर कामे पूर्ण होऊ शकली नव्हती. पण येथे त्यांचं फॅशन डिझायनिंग क्षेत्र बहरलं आणि इथून पुढे त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. आणि बघता बघता ते या क्षेत्रात ‘बादशहा’ झाले असं आपण म्हणू शकतो. एक मोठं फॅशन वलय त्यांनी तयार केलं. ते ‘फॅशन गुरू’ बनले. वर्ल्ड कॉस्टुम या विषयात अनेक महाविद्यालयांतून ते व्याख्यानं देत. खूप नावीन्य त्यांनी आपल्या डिझाईनमधून लोकांसमोर आणले. भारतीय आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीचा मिलाफ आपण त्यांच्या डिझाइन्स व पेहेरावातून अनुभवू शकतो. एक अत्यंत कल्पक अशी ही व्यक्ती आपल्या आयुष्याच्या कमी कालावधीत स्वतःच्या देशासाठी खूप काही देऊन गेली.

ते पर्यावरणप्रेमी होते. त्यांनी पर्यावरणासंबंधी होत असलेल्या कारवायांविरोधात आवाज उठवला. तसेच गोव्याचं निसर्गसौंदर्य टिकवण्यासंदर्भात ते कायम लिखाण करत. ‘गोवा टुडे’मध्ये ते कॉलमही लिहीत असत. फॅशन डिझायनिंग क्षेत्रात दोन मोठी पुस्तके त्यांनी लिहिली. २०१२ मध्ये ‘मोडा गोवा’, २०१२ ‘द ग्रीन रूम’, २०१७ मध्ये ‘पोस्के’ हे दत्तक घेतलेल्या मुलावर त्यांनी लिहिलेले पुस्तक. अशी अनेक त्यांची लिखिते आहेत. जसं ‘ट्रव्हल ऍण्ड आर्ट’ वगैरे.

ते ‘बुम’ या चित्रपटातून दिसले, तसेच टीव्ही मालिका ‘टू बेस्ट’ २००२ मध्ये दिसले आणि ‘फॅशन’ या चित्रपटात पण पाहुणे कलाकार म्हणून दिसले. वेंडेल रॉड्रिक्स यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रतारकांबरोबर डिझाइनचं काम केलं. जसं- रेखा, अनुष्का शर्मा, लिझा रे, दीपिका पदुकोण, मलाईका अरोरा आणि असे अनेक. त्यांनी २०१६ मध्ये डिझायनिंग क्षेत्रापासून रिटायरमेंट घेतली आणि फक्त आपल्या म्युझियमवर लक्ष केंद्रित केलेलं. ‘मोडा गोवा’ म्युझियम त्यांच्या ४५० वर्षांच्या जुन्या घरात त्यांनी कोलवाळ येथे सुरू केलेलं. त्याच्यावर ते आता काम करत होते. गोव्यातील वेगवेगळी प्राचीन वस्तुसामग्री तसेच प्रामुख्याने गोवन पेहेरावावर त्यांनी काम केलेले. अशी ही असामान्य गोमंतकीय व्यक्ती, ज्यांचं नाव गोमंतभूमीत गर्वाने आणि मानाने घेतले जाईल.