स्वदेशी ‘अग्नि’ ची दहशत!

0
284
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

काही दिवसांपुर्वी अग्नि-२ या क्षेपणास्राचे परीक्षण झाले. या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्राची भीती शेजारी देशांना वाटणेही साहाजिक आहे. कारण आता रात्रीच्या अंधारात केल्या जाणार्‍या हल्ल्यांना सक्षमपणे तोंड देण्यास भारत समर्थ झाला आहे.
स्वदेशी तंत्रज्ञानाची ही प्रगती उत्तरोत्तर वाढत जाणे आवश्यक आहे.

अलीकडेच आंतरराष्ट्रीय संरक्षण उत्पादन प्रदर्शन भारतात भरवण्यात आले होते. एक विकसित होणारे संरक्षण सामग्रीचे उत्पादनकेंद्र म्हणून भारतीय कंपन्यांची जगभरात ओळख व्हावी, यासाठी सरकार भारतीय उत्पादकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणणे, मेक इन इंडिया संकल्पनेचा विस्तार करणे आणि भारत आयुधांचा केवळ आयातदार देश न बनता निर्यातदार देश बनविणे, यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे.

आतापर्यंत भारत शस्त्रास्त्र, दारूगोळा यांची आयात करणारा सर्वात मोठा देश होता. मात्र परिस्थिती बदलते आहे. स्वदेशी शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये भारत वेगाने प्रगती करतो आहे. लष्करप्रमुखांच्या मते, आपल्या शस्त्रास्त्रांची निर्मिती करताना भविष्यातील बदलत्या युद्धस्वरूपाचा विचार केला पाहिजे, कारण भविष्यात लढाई समोरा-समोरच होईल असे नाही. त्यामुळेच आपल्याला सायबर क्षेत्र, अंतराळ क्षेत्र, लेझर, इलेक्ट्रॉनिक युद्ध तसेच रोबोटिक्स यांच्या विकासाबरोबरच कृत्रिम बुद्धीमत्ता विकासाचा विचार करणे अपरिहार्य ठरले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडूनही काही दिवसांपूर्वी स्वदेशीकरणावर जोर दिला गेला. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी अशी व्यवस्था निर्माण करावी, जिथे सर्वच संरक्षण उत्पादनांची निर्मिती करता येऊ शकेल, असा आग्रहही त्यांनी धरला.
काही आठवड्यांपूर्वी भारतीय लष्कराने ओरिसातील बालासोर किनार्‍यावरून शत्रूचे दात घशात घालू शकणार्‍या अग्नि-२ या क्षेपणास्राचे प्रक्षेपण केले. हे क्षेपणास्त्र डीआरडीओनेच विकसित केलेले आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून रात्रीच्या वेळी अग्नि-२ चे प्रक्षेपण करण्यात आले आणि ते यशस्वी झाले. अग्नि-२ च्या कक्षेत आता चीन आणि पाकिस्तानबरोबरच दक्षिण आशियातील अनेक देशही आहेत. ६ ङ्गेब्रुवारी २०१९ रोजी भारताने स्वदेशी बनावटीच्या अग्नि-१ या बॅलास्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.

तांत्रिकदृष्ट्या ज्या क्षेपणास्त्राचा मार्ग हा सबऑर्बिटल बॅलास्टिक असतो, त्याला बॅलास्टिक क्षेपणास्त्र म्हणतात. या तंत्रज्ञानाचा वापर कोणत्याही नाभिकीय शस्त्राला कोणत्याही पूर्वनिर्धारित लक्ष्याचा वेध घेण्यासाठी करता येतो. ह्या क्षेपणास्त्राला प्रक्षेपणाच्या प्रारंभिक टप्प्यावरच मार्गदर्शन केले जाते. त्यानंतरचा त्याचा मार्ग ऑर्बिटल मॅकॅनिक्स म्हणजे बॅलास्टिक सिद्धांतानेच ठरवला जातो. आतापर्यंत रासायनिक रॉकेट इंजिनाद्वारे हे क्षेपणास्त्र चालवले जात होते. सर्वांत पहिले बॅलास्टिक क्षेपणास्त्र होते ए-४. याला व्ही-२ रॉकेट या नावाने ओळखले जाते. या रॉकेटचे पहिले यशस्वी प्रक्षेपण हे ३ ऑक्टोबर १९४२ रोजी करण्यात आले होते. त्याचा वापर ६ सप्टेंबर १९४४ रोजी ङ्ग्रान्स विरूद्ध आणि त्यानंतर दोनच दिवसांनी लंडनवर डागण्यासाठी करण्यात आला. या क्षेपणास्त्राला नाझी जर्मनीने १९३० ते १९४० च्या मध्यापर्यंत रॉकेट सायंटिस्ट वेर्न्हेर वॉन ब्राऊन यांच्या देखरेखीखाली विकसित केले होते. १९४५ च्या मे महिन्यात दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटपर्यंत व्ही-२ रॉकेट क्षेपणास्त्र तीन हजारांहून अधिक वेळा वापरण्यात आले होते.

भारताचे स्वदेशी अग्नि-२ हे मध्यवर्ती अंतरावर मारा करणारे बॅलास्टिक क्षेपणास्त्र आहे, जे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित झालेले आहे. या क्षेपणास्त्राची लांबी २१ मीटर असून रुंदी १.३ मीटर इतकी आहे. एक टनापर्यंत वजनाची अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता या क्षेपणास्रामध्ये आहे. तीन हजार किलोमीटर परिघापर्यंत याचा वापर करता येऊ शकतो. यामध्ये तीन टप्प्यात प्रोपल्शन सिस्टिम लावण्यात आली आहे. डीआरडीओच्या ऍडव्हान्स सिस्टिम लॅबोरेटरीकडून तयार करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राची मारकक्षमता २००० किलोमीटरपर्यंत आहे.

हे क्षेपणास्त्र इंटिग्रेटेड गायडेड क्षेपणास्त्र विकसन कार्यक्रमांतर्गत निर्माण करण्यात आलेले आहे. अग्नि मालिकेतील क्षेपणास्त्राचा भाग असलेले अग्नि-२ हे २००४ मध्येच लष्करात दाखल करण्यात आले होते. त्याचे परीक्षण गेल्याच वर्षी करण्यात आले, परंतु भारताने रात्रीच्या वेळी याचे यशस्वी परीक्षण पहिल्यांदाच केले आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणारी दुहेरी पातळीवरील हे क्षेपणास्त्र आधुनिक अचूक मारा करणार्‍या नौवहन प्रणालीने सुसज्ज आहे. याचे समन्वित किंवा एकीकृत परीक्षण रेंजवरून करण्यात आले. प्रोटोटाईप अग्नि-२ चे सर्वांत पहिले परीक्षण ११ एप्रिल १९९९ मध्ये कऱण्यात आले होते. त्यानंतर आण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेऊ शकणार्‍या अग्नि-२ चे परीक्षण १७ मे २०१० मध्ये करण्यात आले आणि अंतिम परीक्षण २० ङ्गेब्रुवारी २०१८ ला आयटीआरमध्ये करण्यात आले.

जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची आणि मध्यम पल्ल्याचे अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या बॅलास्टिक क्षेपणास्त्र परीक्षणाच्या मार्गावर अत्याधुनिक रडार, टेलिमेट्री, निरीक्षण केंद्रे, इलेक्ट्रो-ऑप्टिक उपकरणे तसेच २ नौदलाच्या जहाजांवरून नजर ठेवण्यात आली होती. या क्षेपणास्त्राचे परीक्षण पूर्णपणे यशस्वी ठरले. अग्नि-२ मध्ये आपल्या शत्रूला शोधून त्याला उद्ध्वस्त कऱण्याची विलक्षण क्षमता आहे. अग्नि-२ च्या रूपाने भारताच्या स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मिती आणि विकासाच्या क्षेत्रामध्ये यशाचा आलेख पुन्हा उंचावला आहे. अग्नि-२ च्या परीक्षणापूर्वी ४ दिवस डीआरडीओकडून लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजसचे रात्रीच्या वेळी अरेस्टेड लँडिंगचे परीक्षणही यशस्वीरित्या पूर्ण केले गेले. दोन महिन्यांपूर्वीच डीआरडीओने दोन सीटच्या एलसीए तेजसचे गोवाच्या आयएनएस हंसा वर अरेस्टेड लँडिग केले होते.

आण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल विकसन क्षेत्र कार्यक्रमांतर्गत निर्माण झालेल्या अग्नि-२ क्षेपणास्त्राची मारक क्षमता गरज पडल्यास वाढवता येईल. अग्नि-२ ची मारक क्षमता सध्या २००० किलोमीटर आहे. मात्र ती वाढवून ३ किलोमीटर करता येऊ शकते. अत्याधुनिक नेव्हिगेशन सिस्टिमने सुसज्ज असलेल्या या क्षेपणास्त्रामध्ये उत्तम सूचना आणि नियंत्रण व्यवस्था बसवण्यात आली आहे. त्यावर असलेल्या हाय ऍक्युरसी नेव्हिगेशन सिस्टिममुळे अचूक लक्ष्यभेद करता येऊ शकतो. अग्नि-२ बॅलास्टिक मिसाईलचे वजन सुमारे १६ हजार किलोग्रॅम म्हणजेच १६ टन आहे. साहजिकच यामुळे पाकिस्तान आणि चीन यासारख्या देशांनाही घाम ङ्गुटणे स्वाभाविक आहे. अग्नि-१ आणि आता रात्रीच्या वेळी अग्नि – २ या दोन्ही क्षेपणास्त्राच्या यशस्वी परीक्षणानंतर भारतीय लष्कराची नुसती ताकदच वाढली नसून आक्रमकताही वाढली आहे. भारतीय लष्करात आधीपासूनच दाखल झालेल्या अग्नि २ क्षेपणास्त्राने रात्रीच्या वेळी हल्ला करून लक्ष्यवेध करण्याची क्षमता सिद्ध केल्यानंतर आता भारतीय लष्कराची शत्रुवर हल्ला करण्याची क्षमता प्रचंड वाढील आहे आणि ती शत्रूसाठी आक्रमक आणि घातक ठरेल, यात काही शंका नाही. आता रात्रीच्या अंधारात केल्या जाणार्‍या हल्ल्यांनाही भारत तितक्यात सक्षमपणे तोंड देण्यास समर्थ झाला आहे. साहजिकच, भारतावर हल्ला करताना शत्रूदेशालाही विचार कऱणे भाग पडणार आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाची ही प्रगती भारताचे प्रबळ संरक्षण कऱण्यास नक्कीच सक्षम झाली आहे.