मिझोरमला नमवून गोवा उपांत्यपूर्व फेरीत

0
135

>> आगामी मोसमात खेळणार एलिट विभागात

चार दिवसीय सामन्यात गोव्याने मिझोरमचा दोन दिवसात फडशा पाडून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्लेट गटात ९ सामन्यांतून ५० गुण घेत गोव्याने अव्वल स्थान मिळविले. त्यामुळे आगामी २०२०-२१ मोसमासाठी गोव्याची प्लेट गटातून एलिट गटात उन्नती झाली आहे. पुढील मोसमात गोव्याचा संघ ‘एलिट सी’ गटात खेळताना दिसेल.

कोलकाता येथील सीसीएफसी मैदानावर गोव्याने काल मिझोरमला एक डाव व २११ धावांनी पराभूत केले. पुदुचेरीचा संघ ८ सामन्यांतून ४१ गुणांवर आहे. गोव्याच्या ४ बाद ४९० धावांना उत्तर देताना मिझोरमने पहिल्या दिवशी १ बाद १५ धावांपर्यंत मजल मारली होती. काल पुढे खेळताना त्यांचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांत आटोपला. लक्षय गर्ग व अमूल्य पांड्रेकर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले तर विजेश प्रभुदेसाई व अमित वर्माने प्रत्येकी २ बळी घेत त्यांना चांगली साथ दिली. मिझोरमकडून ‘पाहुणा’ खेळाडू तरुवर कोहली याने किल्ला लढवताना नाबाद ५० धावा केल्या. फॉलोऑन लादल्यानंतर गोव्याने मिझोरमचा दुसरा डाव १७० धावांत संपवला.

चौथ्या स्थानावर उतरलेल्या के. बी. पवन याने मिझोरमकडून १७२ चेंडूंचा सामना करताना १६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ११० धावा केल्या. गोव्याकडून कर्णधार अमित वर्माने ३९ धावांत ५ गडी बाद केले. गोवा क्रिकेट संघटनेने प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी ५० हजार रुपये व साहाय्यक पथकाला २५ हजार रुपयांची घोषणा केली.

धावफलक
गोवा पहिला डाव ः ४ बाद ४९० घोषित
मिझोरम पहिला डाव ः के. वानलालरुआटा झे. मिसाळ गो. गर्ग ११, लालरुईझेला झे. मिसाळ गो. विजेश १, तरुवर कोहली नाबाद ५०, केबी पवन झे. पटेल गो. गर्ग ६, हेन्री रेंथलेई पायचीत गो. गर्ग ०, साईडिंगलिना सायलो पायचीत गो. विजेश ०, परवेझ अहमद झे. विजेश गो. पांड्रेकर १७, लालहुराय राल्टे झे. अमित गो. पांड्रेकर १२, सुमीत लामा त्रि. गो. पांड्रेकर ०, जी. लालबियाकवेला झे. पटेल गो. अमित १, बॉबी झोथानसांगा झे. गोवेकर गो. अमित ०, अवांतर ११, एकूण ४०.२ षटकांत सर्वबाद १०९

गोलंदाजी ः लक्षय गर्ग ११-४-१८-३, विजेश प्रभुदेसाई ११-१-३९-२, दर्शन मिसाळ १-१-०-०, फेलिक्स आलेमाव ५-१-२३-०, अमूल्य पांड्रेकर ८-२-१७-३, अमित वर्मा ४.२-२-२-२
मिझोरम दुसरा डाव (फॉलोऑन) ः के. वानलालरुआटा त्रि. गो. विजेश १०, लालरुईझेला त्रि. गो. विजेश १, तरुवर कोहली त्रि. गो. आलेमाव १८, केबी पवन नाबाद १११, हेन्री रेंथलेई झे. सुयश गो. पांड्रेकर ०, परवेझ अहमद झे. व गो. अमित १, साईडिंगलिना सायलो झे. पटेल गो. अमित १०, लालहुराय राल्टे झे. आलेमाव गो. अमित २, सुमीत लामा त्रि. गो. अमित ६, जी. लालबियाकवेला झे. कवठणकर गो. अमित ०, बॉबी झोथानसांगा त्रि. गो. मिसाळ १, अवांतर १०, एकूण ६५ षटकांत सर्वबाद १७०
गोलंदाजी ः लक्षय गर्ग ७-०-२९-०, विजेश प्रभुदेसाई ९-२-२९-२, फेलिक्स आलेमाव १०-५-१४-१, दर्शन मिसाळ १६-३-४२-१, अमूल्य पांड्रेकर ७-२-८-१, अमित वर्मा १६-४-३९-५.