हैदराबादची आज जमशेदपूरशी लढत

0
108

इंडियन सुपर लीगमध्ये गुरुवारी हैदराबाद आणि जमशेदपूर यांच्यात लढत होईल. त्यावेळी जी. एम. सी. बालयोगी स्टेडियमवर यजमान संघाची प्रतिष्ठा पणास लागली असेल. त्यांना कामगिरीत घसरण रोखावी लागेल.

हैदराबाद संघासाठी मोसम निराशाजनक ठरला आहे. १६ सामन्यात त्यांना केवळ ६ गुण मिळवता आले आहेत. त्यांना फक्त एकच विजय मिळाला असून त्यास १३ सामने उलटले आहे. आयएसएल इतिहासातील सर्वाधिक खराब कामगिरी त्यांची ठरेल अशी चिन्हे आहेत. गेल्या मोसमात चेन्नईन संघाला केवळ २ विजयासह ९ गुण मिळवता आले होते. जमशेदपूरची कामगिरी इतकी खराब नसली तरी बाद फेरी गाठण्याची त्यांची संधी पुन्हा हुकली आहे. १६ सामन्यातून १७ गुण मिळवत त्यांचा सातवा क्रमांक आहे. त्यांना सुद्धा थोडी प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळावे लागेल. हैदराबादचे हंगामी प्रशिक्षक जेवियर लोपेझ यांना घरच्या मैदानावरील शेवटच्या सामन्यात संघाकडून लढाऊ खेळाची अपेक्षा असेल. त्यांच्या बचाव फळीला मात्र चुका टाळणे आवश्यक असेल.

आतापर्यंत त्यांना एकदाही क्लीन शिट राखता आलेली नाही. लोपेझ यांनी सांगितले की, हा सामना फार महत्त्वाचा आहे, कारण आमचा हा घरच्या मैदानावरील शेवटचा सामना आहे. मागील सामन्यात गोवा संघाविरुद्ध आमचा खेळ चांगला झाला नाही. आम्हाला प्रेक्षक आणि क्लबचे मालक यांच्यासाठी तीन गुण मिळवायचे आहेत. ड्रेसिंग रूम मधील वातावरण फार चांगले आहे. मॅथ्यू किल्गॅलॉन आणि आदील खान अशा खेळाडूंना संघर्ष करूनही यश आलेले नाही. सर्जिओ कॅस्टेल याच्या नेतृत्वाखालील जमशेदपूर संघाच्या अक्रमणासमोर त्यांची कसोटी लागेल. जमशेदपूर संघ मागील चार सामन्यात विजयापासून दूर आहे. न्यो अकोस्टा आणि डेव्हिड ग्रँडे अशा खेळाडूंची कॅस्टल आणि एतोर मॉनरॉय अशा खेळाडूंना साथ मिळेल अशी आशा प्रशिक्षक अँटो निओ इरीओंदो यांना असेल. इरीओंदो यांनी सांगितले की, काहीही झाले तरी आम्हाला जिंकायचे आहे. आम्ही पहिल्या चार संघात स्थान मिळवू शकणार नाही, पण सर्वोत्तम कामगिरी करणे आमचे कर्तव्य आहे.