- प्राजक्ता प्र. गावकर
(नगरगाव, वाळपई)
‘‘आई, या जन्मात तरी आमचे त्या वाड्यात मीलन व्हावे. नाहीतर तो वाडा, तो परिसर तसाच शापित राहणार. म्हणून आम्ही आज त्या वाड्यात जाणार. तुम्ही उगीचच काळजी करु नका. आम्ही सकाळी येऊ’’, असे म्हणून ते दोघे माईंच्या पायाशी वाकले.
अप्पासाहेब गायकवाड हे गावचे जमीनदार होते. त्यांचा दबदबा शेजारच्या जवळपासच्या सर्वच गावात होता. सर्व लोक त्यांना मान देत असत. अप्पासाहेबांची पत्नीही सुशील, मनमिळावू होती. सर्वजण त्यांना माई म्हणत.
अप्पासाहेबांचे घर म्हणजे मोठा वाडाच होता. घरात नोकर चाकर होते. सर्व सुबत्ता होती. पण या एवढ्या मोठ्या घराला वारसदार मात्र नव्हता. त्यांच्या पोटी संतान नव्हते. अनेक वैद्य, हकीम झाले. पण परिणाम शुन्य, माईंची कुस उजवतच नव्हती. शेवटी वय कुणाला थांबत नसते. अप्पासाहेबांनी वयाची सत्तरी गाठली आणि माई साठीच्या उंबरठ्यावर पोहोचल्या.
… आणि एक दिवस मध्यरात्री माई खडबडून उठल्या. त्यांनी अप्पाहेबांना उठवले. त्या म्हणाल्या, ‘अहो, कसलातरी आवाज येतोय. आवाज घराजवळच्या नदीकडून येत होता. तान्ह्या बाळाचा आवाज, ट्यांहाऽऽ, ट्यांहाऽऽ असा. हे दोघे आवाजाच्या रोखाने निघाले. नदीजवळ पोहोचताच आवाज अधिकच स्पष्ट ऐकू येऊ लागला. जवळ जाऊन पाहतात तर काय…
नदीच्या पात्रात त्यांना टोपलीमध्ये पहूडलेला एक तान्हूला दिसला. सुंदर गोरापान, गोंडस असा बाळ त्या टोपलीत रडत होता आणि माईंकडे पाहुन हात पुढे करत होता. त्याला पाहुन माई भान विसरून पुढे गेल्या व त्यांनी आईच्या मायेने त्या बाळाला उचलून घेतले.
त्याचे पटापट मुके घेतले. त्याला छातीशी कवटाळले. थोड्या वेळाने त्या भानावर आल्या. त्यांनी अप्पासाहेबांकडे पाहिले. अप्पासाहेबांचे डोळे भरून आले होते. त्यांनी बाळाला आपल्याजवळ घेतले. माईना व बाळाला घेऊन ते घरी आले.
ऐन मध्यरात्री आलेल्या या आगंतूक पाहुण्याला पाहून, घरातील सर्व माणसे हबकूनच गेली. हे बाळ कुणाचे म्हणून जो तो विचारु लागला. अप्पासाहेबांनी जे घडले ते सांगून म्हटले, ‘‘ज्या अर्थी हे बाळ, टोपलीमध्ये पाण्यात सापडले त्या अर्थी ते मुद्दामहून कुणीतरी पाण्यात सोडले असले पाहिजे. कारण हे मुल कुणाच्यातरी पायातून जन्मलेले असावे, नाहीतर गरीबीमुळे त्याच्या आईने त्याला सोडून दिले असावे. ते काही का असेना हे मुल आम्हाला मिळाले. देवाने आमच्या पोटी संतान दिले नाही. पण या बाळामुळे अपत्य प्रेम आपण सर्वजण उपभोगु’’. थोड्या दिवसांनी त्या बाळाचे बारसे करण्यात आले. त्याचे नाव ‘अनुराग’ ठेवले. अनुराग दिसामासी चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागला. त्याने आपल्या बोबड्या बोलांनी सार्यांना आपलेसे केले. हळूहळू तो शाळेत जाऊ लागला. अनुराग आणखी जरा मोठा होतो न होतो तोच अप्पासाहेबांनी या जगाचा निरोप घेतला. माईना आता अनुरागशिवाय कुणाचाही आसरा नव्हता. गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्यामुळे अनुराग शहरात गेला. पदवीधर होऊन त्याला चांगली नोकरी मिळाली. माई वाड्यावर एकट्याच राहिल्या. दिमतीला नोकर होतेच, पण अनुराग शहरातच राहत होता. अधुनमधून त्याचे पत्र यायचे. एकदा सुटीत तो गावी आला. बरोबर एक तरुण मुलगी होती.
चहा झाल्यावर तो माईना म्हणाला, ‘‘आई, ही अंजली माझ्याबरोबर काम करते. अंजलीने नमस्कार केला. माईंना सून म्हणून अंजली पसंत पडली. त्यांनी दोघांना तोंडभरून आशीर्वाद दिला.
थोड्याच दिवसात अनुराग व अंजलीचा विवाह संपन्न झाला. आणि अंजली गायकवाड घराण्याची सून झाली. लग्नानंतर काही दिवसांसाठी अंजलीला माईजवळ ठेवून अनुराग शहरात गेला. अंजली माईबरोबर वाड्यात राहिली. रोज संध्याकाळी गावाबाहेर फिरायला जायची, पण तिला घरी यायला रात्रीचे दहा-बारा वाजायचे.
माईना खूप आश्चर्य वाटे.. कां? सर्वसाधारणपणे फिरायला गेलेली माणसे अर्ध्या-एक तासाने परत फिरतात, पण अंजलीला मात्र खूप उशीर होतो. ती कुठे जाते? काय करते.. हे पहायला माईंनी आपल्या नोकराला सांगितले.
दुसर्या दिवशी अंजली संध्याकाळी फिरायला निघाली. नोकर तिच्या मागावरच होता. अंजली घरून निघाली ती थेट गावाबाहेर एक पडका वाडा होता तिथे पोहोचली. ती थेट वाड्याच्या दिशेने चालू लागली. नोकराला माहीत होते तो वाडा शंभर वर्षांपासून बंदच होता. त्यामुळे तिथे झाडेझुडूपे वाढून मोठे रानच झाले होते. शंभर वर्षापासून तिथे कुणीही राहत नव्हते. म्हणून तो वाडा भयाण वाटत होता. तिथे माणूसच काय पण चिटपाखरुसुद्धा फिरकत नव्हते. या वाड्यात अंजली गेली. गेटजवळ पोहोचताच गेट करकर असा आवाज करत आपोआप उघडली आणि अंजलीने आत पाउल टाकताच वाढलेली झाडे झुडूपे नाहिशी होऊन जणुकाय तिथे वर्षानुवर्षे कुणीतरी राहत असावे.. असा स्वच्छ झाला तो वाडा आणि आतले दिवे पटापट पेटले. हे काय गौडबंगाल आहे हे नोकराला कळेना. अंजली जणु आपल्याच वाड्यात वावरावे असे वावरत होती.
नोकर बाहेर लपून-छपून हे सारे पहात होता. नोकराने खिडकीतून आत डोकावून पाहिले.. सर्व वाडा साफ चकचकीत होता. उंची फर्निचर, छताला सुंदर सुबक दिवे, रंगीबिरंगी पडदे. हे सर्व पाहून नोकर भीतीने गारठून गेला.
अंजली कुणाचीतरी वाट पाहात बसल्यासारखी वाड्याच्या दिवाणखान्यात बसली होती. थोड्या वेळाने दारावर बेल वाजल्याचा आवाज झाला. अंजलीने उठून दरवाजा उघडला पाहतो तर काय? दारात अनुराग उभा. पण तो वेगळा का दिसत होता? आणि अनुराग शहरातून कधी आला? अन त्याला कसे कळले की अंजली इथे आहे?
अनुरागने ओठावर एक मिशी ठेवली होती. नोकर अचंबित होऊन सारे पाहात होता. अंजलीने अनुरागला शिवा म्हणून हाक मारली. अनुरागने अंजलीला गंगा अशी हाक मारली. नंतर ती दोघे तिथे बसून एकमेकाना पाहात होती. हळू आवाजात दोघे बोलत होती.
घड्याळात बाराचे ठोके पडले आणि दोघे उठून उभे राहिले. अनुराग दाराकडे गेला. पाठोपाठ अंजली.. ‘‘शिवा, थांब. थांब. मला सोडून जाऊ नकोस. थांब. ए’’, म्हणत दाराकडे गेली आणि क्षणार्धात सारे अदृश्य झाले. वाडा काळोखात न्हाऊन निघाला. सर्वत्र वाढलेली झाडे झुडूपे दिसू लागली. ती वाडा तो परिसर पुन्हा भेसूर भयाण दिसू लागला.
अंजली त्या वाड्यातून बाहेर आली व घरची वाट चालू लागली. पाठोपाठ नोकरही घरी आला. माई वाटच पाहात होत्या. नोकराने जे जे पाहिले ते ते सर्व माईंच्या कानावर घातले. माईंना प्रचंड धक्का बसला. त्यांनी अनुरागला तार करुन तातडीने बोलावून घेतले. अनुरागला यायला दोन दिवस लागले. ते दोन दिवस माईंनी अंजलीला जराही घराबाहेर पडू दिले नाही. अंजली घुसमटल्यासारखी घरात बसून राहिली.
अनुराग आला अन माईंना हायसे वाटले. त्याच रात्री जेवण झाल्यानंतर, माईंनी अनुराग व अंजलीला आपल्या खोलीत बोलावून घेतले.
त्यांनी अनुरागला सर्व घटना सांगितली. त्याने अंजलीकडे पाहिले. ती खाली मान घालून सर्व ऐकत होती. माईंचे बोलणे झाल्यावर अनुराग त्यांना म्हणाला, ‘‘आई, हे सर्व खरेच आहे. अंजली व मी आम्ही दोघे गेल्या जन्मीचे पती-पत्नी आहोत. पण त्या जन्मात आम्हाला आमचे मीलन व्हायच्या आधीच मरण आले. म्हणून आम्ही हा दुसरा जन्म घेतला.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘गेल्या जन्मी एका मांत्रिकाने अंजलीला पाहिले. तो तिच्यावर लुब्ध झाला व तिला मिळविण्यासाठी त्याने प्रयत्न सुरु केले. तिचे माझ्यावर खूप प्रेम होते. परिणामी त्याने माझी हत्या केली. नंतर अंजली आपल्याला वश होत नाही म्हणून तिचीही हत्या करण्यात आली. अशा तर्हेने लग्नापूर्वीच आम्हाला मरण आले. आमचे त्या वाड्यात लग्न होऊन राहण्याचे स्वप्न होते ते अपुरे राहिले. आमचा आत्मा अतृप्त होता म्हणून आम्ही पूर्वजन्म घेतला. मी एका गरिबाहून गरीब अशा कुटुंबात जन्म घेतला. त्या माता पित्याने मला नको आपल्याला असे म्हणून टोपलीमध्ये घालून नदीच्या पात्रात फेकले. मला तुम्ही आणले, आईबापाचे प्रेम दिले. पोटच्या मुलासारखे कौतुक केले. वाढवले.
आणि अंजलीने शहरात कुणा पुण्यवंताच्या घरी जन्म घेतला. तो वाडा तो परिसर शापित राहिला. कारण अंजलीने मरताना शाप दिला होता- जोपर्यंत माझे माझ्या पतीशी मिलन होत नाही तोपर्यंतच हा वाडा, हा परिसर आणि तूही शापित राहणार… असे त्या मांत्रिकाला म्हणून तिने प्राण सोडला. तो वाडा आणि तो परिसर खरोखरच शापित आहेत, कारण तिथे शंभर वर्षापासून पाऊस पडलाच नाही. आजपर्यंत हे कुणाला कळले नव्हते’’. त्यावर माई म्हणाल्या, ‘‘असे म्हणतोस, मग ही अंजली तुला अशी कशी अन कुठे भेटली?’’
‘‘तेच तर सांगतो’’, अनुराग म्हणाला. ‘‘मी जेव्हा शहरात गेलो त्यावेळी अंजलीशी ओळख झाली. तिला पाहताक्षणीच तिची व माझी कुठेतरी भेट झाली आहे असेच मला वाटले. विशेष करुन ती व मी एकाच ऑफीसमध्ये काम करु लागलो. त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांच्या आणखी जवळ आलो.
एकदा आमचा सर्व स्टाफ पिकनिकसाठी जवळच्याच एका समुद्रकिनारी गेलो होतो. पाण्यात मस्ती करताना मी फारच भिजलो. म्हणून अंजली माझ्या जवळच उभी होती. तिचे लक्ष माझ्या पाठीकडे गेले आणि ती मोठ्याने किंचाळली. ‘सापडला माझा शिवा, सापडला’ आणि ती बेहोश पडली. तिला शुद्धीवर आणल्यानंतर ती मला म्हणाली, ‘‘तुम्ही माझे पती आहात’’. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. मीपण कावरा बावरा झालो.
पण ती सारखी-सारखी आठवण करुन द्यायला लागली. त्याच रात्री मला गेल्या जन्मीचे सारे आठवले. दुसर्या दिवशी मी तिला भेटून सांगितले की, ‘मी तुझा शिवाच आहे’. गंगा माझी आठवण काढून रडत बसली होती. माझे हे बोलणे ऐकून तिने माझ्या गळ्याला मीठीच मारली’’. ‘‘तूच शिवा आहेस.. हे गंगाला कसे कळले? ते सांग’’, माईंनी त्याला विचारले. ‘‘ज्यावेळी मी टिशर्ट काढून पिळत होतो तेव्हा गंगा माझ्या मागे उभी होती. तिचे लक्ष माझ्या पाठीवरच्या मोठाल्या तिळाकडे गेले. तो तीळ तसाच होता गेल्या जन्मीसुध्दा’’, अनुरागने सांगितले.
‘‘त्यानंतर तुला दाखवण्यासाठी मी गंगाला इथे आणले. नंतरचे सर्व तुला माहीतच आहे’’, तो म्हणाला. एवढा वेळ गप्प बसलेली अंजली माईंना म्हणाली, ‘‘आई, या जन्मात तरी आमचे त्या वाड्यात मीलन व्हावे. नाहीतर तो वाडा, तो परिसर तसाच शापित राहणार. म्हणून आम्ही आज त्या वाड्यात जाणार. तुम्ही उगीचच काळजी करु नका. आम्ही सकाळी येऊ’’, असे म्हणून ते दोघे माईंच्या पायाशी वाकले. माईंनी त्या दोघांना मनापासून आशीर्वाद दिला. अनुराग व अंजली त्या पडक्या वाड्याकडे निघून गेले. सकाळी नोकर माईंच्या उठण्याची वाट पहात होता. त्या उठताच त्याने सांगितले, ‘‘बाईसाहेब, काल मध्यरात्री त्या पडक्या वाड्यावर भरपूर पाऊस पडला’’, माई आश्चर्यचकित होऊन ऐकत होत्या.
माईंनी त्या वाड्यात जायचे ठरविले व नोकराला बरोबर घेऊन त्या वाड्याजवळ पोहोचल्या. त्यांनी पाहिले. सर्वत्र काटेरी झुडूपे आणि रान वाढले होते. पाला पाचोळा भयंकर होता. त्यांच्या मनात हा वाडा शंभर वर्षापूर्वी कसा होता, असावा?.. असा विचार आला. त्यांनी अनुराग व अंजलीला हाक मारली. अनुराग व अंजली त्या वाड्याच्या मोडकळीला आलेल्या दारातून बाहेर पडले आणि दोघे माईंच्या जवळ आले. त्यांनी त्या दोघांना घट्ट छातीशी धरले.
अनुराग म्हणाला, ‘‘आजपासून हा वाडा व परिसर शापमुक्त झालेत’’. मग ते सर्वजण घरी आले आणि त्यानंतर थोड्याच कालावधीत अंजलीने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
नातवाच्या बाललीला पाहुन माईंना अनुरागच्या बालपणीची आठवण येत होती. बाळलीलांनी गायकवाड वाडा आनंदाने दुथडी भरून वाहू लागला.