वन्यप्राण्यांना अन्नपाणी मिळण्याची अभयारण्यांत व्यवस्था करू

0
247

>> मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

म्हादई अभयारण्यातील चार वाघांची हत्त्या करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील वनक्षेत्रात असलेल्या वाघांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने आवश्यक ती सगळी उपाययोजना केलेली आहे. लवकरच सर्व अभयारण्यात टेहाळणी मनोरे उभारण्यात येणार आहेत. तसेच वाघांसह अन्य वन्यप्राण्यांना अभयारण्यात आवश्यक ते पाणी व खाद्य मिळावे यासाठीही पावले उचलण्यात येणार आहेत. वन्यप्राणी खाद्यासाठी मानवी वस्तीत शिरू नयेत यासाठी वनक्षेत्रात फळझाडांची संख्या वाढवण्यात येणार आहे, तसेच वन्यप्राणी व मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठीही उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली.

व्याघ्र हत्त्येच्या प्रश्‍नावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, प्रवीण झांट्ये व अन्य काही आमदारांनी मांडलेल्या लक्ष्यवेधी सूचनेवर उत्तर देताना डॉ. सावंत यांनी वरील माहिती दिली.
राज्यातील वनक्षेत्रात असलेले वाघ व अन्य वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी सरकार बांधील आहे असे सांगून वाघांच्या हत्त्या प्रकरणाचे तपासकाम चालू आहे. हत्त्या झालेल्या वाघांचे व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जे पथक नवी दिल्लीतून चौकशीसाठी आले होते, त्यांनी आपला अहवाल केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडे सुपूर्द केला आहे, अशी माहितीही सावंत यांनी दिली.

एका दिवसात भरपाई
अभयारण्य क्षेत्रात राहणार्‍या शेतकर्‍यांची गुरे जर वाघाच्या हल्ल्यात ठार झाली तर या शेतकर्‍यांना एका दिवसाच्या आत नुकसानभरपाई देण्याची सोय करण्यात आली आहे. वाघाच्या हल्ल्यात जर गावठी गाय मृत्यूमुखी पडली, तर तिच्या मालकाला १५ हजार रु. व संकरित गाय मृत्यूमुखी पडली तर २५ हजार रु. देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.

शेतकर्‍यांचे पुनर्वसन
दरम्यान, विविध ठिकाणी वनक्षेत्रात राहणार्‍या लोकांचे पुनर्वसन करण्याचा सरकारचा विचार असून ज्या शेतकर्‍यांच्या गुरांवर हल्ला करून वाघाने ठार केले होते त्या शेतकरी कुटुंबांचे ठाणे येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. मात्र, अभयारण्याजवळ लोकांची मोठ्या संख्येने वस्ती असेल तर अशा लोकांना सध्यातरी हलवले जाणार नाही, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

म्हादई व्याघ्रक्षेत्र करा : कामत
यावेळी बोलताना विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हादई अभयारण्य व्याघ्रक्षेत्र घोषित करा, अशी मागणी केली. वाघांच्या हत्त्येमागे नेमके कोण आहेत ते कळायला हवे. त्यामुळे हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी आमदार सरदेसाई यांनी यावेळी केली.

केंद्राची मदत घ्या : ढवळीकर
वाघांच्या सुरक्षेचा प्रश्‍न हा मोठा असून त्यासाठी केंद्राची मदत घेण्यात यावी. त्यासाठी केंद्राकडून निधीही मिळवा, अशी सूचना व मागणी मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी केली.