नदालला पछाडत जोकोविच अव्वल

0
112

ऑस्ट्रेलियन ओपन विक्रमी आठव्या वेळेस जिंकलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने काल सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या एटीपी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान मिळविले आहे. त्याने स्पेनच्या राफेल नदाल याला दुसर्‍या स्थानी ढकलले आहे.

मागील वर्षी ४ नोव्हेंबरला नदालने जोकोविचला पछाडत पहिला क्रमांक आपल्या नावे केला होता. अव्वल स्थानावरील आपल्या २७६व्या आठवड्याची सुरुवात जोकोविचने केली. मागील दहा पैकी नऊ मोसमात (२०११-१६, २०१८-२०) अव्वल राहण्याची कामगिरी जोकोविचने केली. ५ ऑक्टोबरपर्यंत जोकोविच प्रथम स्थानावर राहिल्यास रॉजर फेडरर याचा ३१० आठवडे प्रथम राहण्याचा विक्रम जोकोविच मोडणार आहे. ४ जुलै २०११ रोजी जोकोविच सर्वप्रथम पहिल्या स्थानी पोहोचला. ८ जुलै २०१२पर्यंत (५३ आठवडे) जोकोविच प्रथम होता. यानंतर ५ नोव्हेंबर २०१२ ते ६ ऑक्टोबर २०१३ (४८ आठवडे), ७ जुलै २०१४ ते ६ नोव्हेंबर २०१६ (१२२ आठवडे) व ५ नोव्हेंबर २०१८ ते ३ नोव्हेंबर २०१९ (५२ आठवडे) जोकोविच पहिल्या स्थानी होता.

पुरुष एकेरी क्रमवारीतील अन्य खेळाडूंचा विचार केल्यास रॉजर फेडरर याने आपले तिसरे स्थान राखले आहे. ऑस्ट्रेलियन ओपनचा उपविजेता ऑस्ट्रियाचा डॉमनिक थिम चौथ्या स्थानी पोहोचल्याने रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. स्पेनचा रॉबर्टो बाटिस्टा आगुट (१२) टॉप टेन बाहेर फेकला गेला आहे. गाईल मोनफिल्स व डेव्हिड गॉफिन यांनी प्रत्येकी एका स्थानाची सुधारणा करत अनुक्रमे नववे व दहावे स्थान प्राप्त केले आहे. पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा तीन स्थानांच्या घसरणीसह ४१व्या स्थानी पोहोचला आहे.
डब्ल्यूटीए क्रमवारीत ‘टॉप १०’मध्ये मोठे बदल दिसून आले. ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या सोफिया केनिन हिने आठ स्थानांची झेप घेत सातव्या क्रमांकावर हक्क सांगितला आहे. जपानच्या नाओमी ओसाका हिला खराब कामगिरीचा फटका बसला असून सहा स्थानांच्या घसरणीसह ती दहाव्या स्थानी आली आहे. किकी बर्टेन्सने दहाव्यावरून आठवे तर बेलिंडा बेनसिचने सातव्यावरून पाचवे स्थान प्राप्त केले आहे. सिमोना हालेप ( + १, दुसरे स्थान) व कॅरोलिना प्लिस्कोवा (-१, तिसरे स्थान) यांनी जागांची अदलाबदल केली आहे. होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपनच्या ‘अंतिम ६४’ फेरीतून अंग काढून घेतलेल्या भारताच्या सानिया मिर्झाने महिला दुहेरीत १२ स्थानांची उडी घेत २५३वा क्रमांक मिळविला आहे. अंकिता रैना (+ ६, १६६वे स्थान) भारताची महिला दुहेरीतील सर्वोत्तम खेळाडू आहे.