- संतोष कामत
(सचिव, सक्षम गोवा)
‘समदृष्टी, क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ’ म्हणजेच ‘सक्षम’ ही एक धर्मादाय संस्था असून तिचे मुख्य कार्यालय नागपूर, महाराष्ट्र येथे आहे. देशातील सगळ्या विकलांग व्यक्तींना एका छत्राखाली आणणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच सक्षम या संस्थेची स्थापना करण्यात आली. विकलांग व्यक्ती या समाजावरील भार नसून ते देशाची संपत्ती आहेत अशी सक्षमची भावना असून ही संस्था निरनिराळे प्रकल्प राबवून समाजाला सेवा प्रदान करत असते- जसे नेत्र पेढी (१४ परवाना धारक नेत्र पेढ्या आहेत); ब्रेल लिपीमध्ये पुस्तके उपलब्ध करणे, ऑडिओ पुस्तके (ऑडिओ कॅसेट्स, सीडी), लो व्हिजन एन्हान्समेंट, उदबत्त्या बनवणे आणि दृष्टीदोष असलेल्यांकडून आयुर्वेदिक औषधे बनवणे, दृष्टी विकलांगांचा गायन वृंद, विविध प्रकारची विकलांगता असलेल्यांसाठी मनोरंजन केंद्र, तसेच उत्तम खाद्य योजना इत्यादी प्रकल्प देशातील विविध राज्यांमध्ये चालवले जातात.
‘समदृष्टी, क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ’ म्हणजेच ‘सक्षम’ ही एनजीओ असून ३००पेक्षा जास्त शहरांमध्ये या संस्थेच्या शाखा आहेत.
प्रकल्प क्र. १ ः उअचइअ – कॉर्निअल अंधत्वमुक्त भारत अभियान …
हा प्रकल्प २९ जुलै २०१७ रोजी गोव्याचे माजी व दिवंगत मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या शुभ हस्ते सुरू करण्यात आला होता. हा तीन वर्षांचा प्रकल्प असून २०२० सालापर्यंत गोव्यासहीत संपूर्ण भारत हा कॉर्निअल अंधत्वमुक्त करण्याचा याचा संकल्प आहे.
कॉर्निया म्हणजे डोळ्याच्या बाहेरील पारदर्शी आरशासारखा अवयव. जन्मतःच इन्फेक्शन, अपघात आणि आजारामुळे कॉर्निया भुरकट होऊ शकतो व पारदर्शी उरत नाही. भुरकट कॉर्निया काढून, मृत दात्याकडून मिळालेल्या सशक्त पारदर्शी कॉर्नियाने बदलण्यात येतो, याला कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन म्हणतात. कॉर्निया बदलल्यानंतर माणूस पुन्हा व्यवस्थितपणे पाहू शकतो. मधुमेही, ब्लड प्रेशर असलेले, चष्मा असलेले आणि कोणत्याही वयाची व्यक्ती आपल्या मृत्युनंतर नेत्रदान करू शकते. कॉर्निया हा दात्याच्या मृत्युनंतर सहा ते आठ तासांच्या आतच काढला पाहिजे.
त्यासाठी खालील पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले.
१. गोव्यातील कॉर्निअल अंधत्वाबद्दलचे सविस्तर सर्वेक्षण, ज्याकरिता समाज कल्याण केंद्र, गोवा सरकार आणि महाविद्यालयाती एनएसएसच्या विद्यार्थ्यांची सहाय्यता घेण्यात येते. एकूण ५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.
२. ही सर्व माहिती मिळाल्यानंतर ती संगणकात टाकली जाते व गरजेनुसार विविध अहवाल तयार केले जातात.
३. कॉर्निअल अंधत्वाचे रुग्ण मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी आवश्यक ते उपाय व प्रत्यारोपणाची सोय केली जाते, ज्यामुळे कॅम्बाचे उद्दिष्ट सफल होण्यास मदत होते.
४. तसेच सरकारी विभागांच्या सहकार्याने जसे समाज कल्याण केंद्र, गोवा वैद्यकीय महाविद्यालय शिबिरे घेऊन गरजूंना विकलांगतेचे प्रमाणपत्र देण्यात येते.
५. विकलांगतेचे प्रमाणपत्र मिळाल्यावर सक्षम-गोवातर्फे दिव्यांगांना ऑनलाईन रजिस्टर करून युडीआयडी कार्डस् देण्यात येतात.
६. अशा प्रकारच्या सर्वेक्षणामुळे आपल्याला कॉर्निअल प्रत्यारोपणासाठी प्रतिक्षेत असलेल्या दिव्यांगाचा एक निश्चित आढावा मिळू शकतो.
प्रकल्प क्र. २ ः ब्रेल लिपीतील पुस्तकं बनवणे आणि ब्रेल वाचनालय.
द ब्रेल लायब्ररी आणि ब्रेल बुक प्रॉडक्शन सेंटर यांची स्थापना गोवा सरकारच्या समाज कल्याण केंद्राच्या सहाय्याने २०१४ मध्ये करण्यात आली. ब्रेल लिपीमध्ये भरपूर पुस्तके छापण्यात आली व ती पाटो-पणजी येथील मध्यवर्ती वाचनालय, तसेच जिल्हा वायनालये, नावेली, मडगाव, दक्षिण गोवा येथे त्यांच्या मागणीनुसार पाठवण्यात आली.
तसेच सक्षम-गोवातर्फे एक ब्रेल लिपीमधील मतदारांची यादीसुद्धा मे २०१७च्या निवडणुकीच्या वेळी बनविण्यात आली होती व ती प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करण्यात आली होती.
नुकतेच काही ब्रेल लिपीतील पुस्तके क्षितिज- अकोला, महाराष्ट्र येथे पाठवण्यात आली.
प्रकल्प क्र. ३ ः पणजी व मडगाव येथे दृष्टी कमतरता शिबिरे
सक्षम-गोवातर्फे कृष्णदास शामा गोवा राज्य मध्यवर्ती वाचनालय, जिल्हा वाचनालयस नावेली, मडगाव, गोवा सर्वशिक्षा अभियान आणि गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, बांबोळी यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टी कमतरता तपासणी शिबिरांचे आयोजन पाटो-पणजी येथील संस्कृती भवनात ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१७ दरम्यान घेण्यात आले होते.
एक चार दिवसीय शिबिर प्राथमिकतः माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांची दृष्टी कमतरता तपासण्यासाठी घेण्यात आले होते. तरीसुद्धा त्याचा लाभ इतर काही व्यक्तींनाही मिळाला. त्यावेळी एकूण १४२ व्यक्तींची नोंदणी होऊन त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये त्यांची दृष्टी (परसेप्शन टेस्ट), जवळची दृष्टी, दूरची दृष्टी आणि इतर दृष्टीदोषांचा समावेश होता. त्यावेळी पुण्यातील डॉ. रमेश साठे यांनी तयार व उपलब्ध करून दिलेल्या विविध उपकरणांचा वापर करण्यात आला होता.
सक्षम-गोवाचे सदस्य आणि श्री. शिरीष दारव्हेकर(नॅशनल कॅम्बा टीमचा कार्यकारी सदस्य) आणि श्री. आनंद सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली आलेली ६ स्वयंसेवकांची सक्षम-नागपूरची चमू आणि यांच्यासोबत गोमंतक आयुर्वेद कॉलेज-शिरोडा, गोवा येथील १० इंटर्नसिप करणारे विद्यार्थी यांनी पणजी येथील या शिबिरासाठी चार दिवस खूप परिश्रम घेतले. या शिबिरामुळे माध्यमिक शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षक यांच्यामध्ये दृष्टी कमतरता समस्यांविषयी जागृती निर्माण करण्यात सक्षमला यश मिळाले.
प्रकल्प क्र. ४ ः स्क्विंट (तिरळेपणा) करेक्शन कॅम्प २०१७
सक्षम-गोवातर्फे कृष्णदास शामा गोवा राज्य मध्यवर्ती वाचनालय, गोवा सर्वशिक्षा अभियान आणि गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, बांबोळी यांच्या संयुक्त विद्यमाने ३ रा व ४ था तिरळेपणा सुधार शिबिर बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज येथे १० मे ते १३ मे २०१७ आणि ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१७ या दरम्यात घेण्यात आले होते.
हे चार दिवसीय शिबिरे तिरळेपणाचा दोष दूर करण्यासाठी मुख्यतः हायस्कूल, प्राथमिक आणि आंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले होते पण इतरही काही व्यक्तींना त्याचा लाभ मिळाला. जून २०१८ मध्ये एकूण १४ आणि ११ स्क्विंट करेक्शन शस्त्रक्रिया अनुक्रमे दोन्ही शिबिरात करण्यात आल्या.
डॉ. सुवर्णा बालंखे, डीएनबी (बालनेत्रतज्ज्ञ, तिरळेपणा विशेषज्ञ)- नागपूर यांनी विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया शिबिरावेळी केल्या. गोमेकॉमधील नेत्र विभागप्रमुख डॉ. उगम उसगावकर, डॉ. दीप्ती श्रीवास्तव, डॉ. मानसी प्रभुदेसाई आणि इतर नेत्र विभागाच्या डॉक्टरांसह, तसेच डॉ. शैला कामत यांच्या उत्तम मार्गदर्शनासह आणि त्यांच्या ऍनास्थेशियाच्या चमूच्या सहकार्याने रुग्णांची उत्तम शस्त्रक्रियेच्या पूर्वीची आणि नंतरची काळजी घेण्यात आली.
प्रकल्प क्र. ५ ः नेत्रदान जागृती- सादरीकरण – कार रॅली- घोषणा फलक
लॉयन्स आणि रोटरी क्लब्ज ऑफ गोवा, विविध कॉलेजेस, हायस्कूल्समधले एन्एस्एस् युनिट्स, लोकांच्या संस्था व सार्वजनिक समूहांमध्ये असे निरनिराळ्या भागांमध्ये, लोकांमध्ये नेत्रदानाचे महत्त्व पडवून देण्यात आले. त्यामध्ये एक १५ मिनिटांचा व्हिडिओ ज्यामध्ये नेत्रदानासंबंधी माहिती होती. त्यानंतर २० मिनिटांची नेत्रदानावर चर्चा व प्रश्नोत्तरे व सर्वांना माहिती पत्रकं देण्यात आली होती.
सन २०१७ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपांमध्ये एकूण १२० बॅनर्स ज्यावर नेत्रदानासंबंधी माहिती व गोव्यात नेत्रदानाविषयी संपर्काचा सविस्तर पत्ता देण्यात आला होता. या वर्षीसुद्धा निरनिराळ्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले.
४ कार रॅलीजसुद्धा आयोजित केल्या होत्या.
प्रकल्प क्र. ६ ः कार्यकर्त्यांचे ४ प्रकारचे प्रशिक्षण
क्षमता विकार प्रमुख (केव्हीपी) प्रशिक्षण वर्ग ः ४ प्रमुख प्रशिक्षण वर्ग हे चार वेगवेगळ्या ठिकाणी, निरनिराळ्या वेळी आयोजित केले होते. सक्षम-गोवाच्या सदस्यांपैकी प्रत्येकी २ सदस्यांनी वर्गामध्ये हजेरी लावली.
प्रकल्प क्र. ७ ः अब्रार – अइठअठ – ऑडिओ बुक रीडर अँड रेकॉर्डर.
दृष्टीदोष किंवा दृष्टी विकलांगता असलेल्या लोकांसाठी अब्रार हे एक क्रांतिकारी उपकरण आहे जे समदृष्टी, क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ, नागपूरने तयार केले आहे. हे खिशात ठेवता येण्यासारखे उपकरण असून त्यात ८ ब्रेलच्या बटन्स आहेत. मेमरी कार्ड सहजरीत्या बदलता येण्यासारखे असून रेकॉर्डिंगसुद्धा करता येते.
देशातील दृष्टीदोष असणारे किंवा दृष्टी विकलांग लोकांना त्यांच्या शिक्षणात अनेक अडचणी येत असतात, ज्यामध्ये इंग्रजी भाषेचा प्रामुख्याने उपयोग केलेला असतो, शिवाय त्यांच्या किमतीही परवडणार्या नसतात. म्हणूनच ‘सक्षम’ने अब्रार हे उपकरण तयार केले आहे जे अशा प्रकारचे पहिले आणि भारतात तयार केलेले असे एकमेव उपकरण आहे.
सक्षम-गोवाने आतापर्यंत एकूण ६० अब्रार उपकरण गरजू अंध विद्यार्थ्यांना दिलेले आहे ज्यामध्ये लोकविश्वास प्रतिष्ठान, ढवळी,फोंडा; नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंड (एमएबी), सांताक्रूझ, पणजी. तसेच सक्षमने लो व्हिजन इक्विपमेंट्स १०० पेक्षा जास्त लो व्हिजन असणार्या विद्यार्थ्यांना दान दिले आहेत.
संस्थेचा पत्ता ः सक्षम गोवा, ‘सान्व्हिला’, ग्राउंड फ्लोअर, बँक ऑफ इंडियाच्या जवळ, फातोर्डा, मडगाव, गोवा- ४०३६०२