अनेक व्याधींचा समूह ः ‘डायबिटीज’

0
261
  • डॉ. सुरज स. पाटलेकर
    (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय )

जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे यकृतामध्ये अतिमात्रेत शर्करा साठवून ठेवली जाते व ही शर्करा शरीरामधील साखर जर कमी झाली तर त्यासाठी वापरली जाते. पण ह्या टाईप२च्या रुग्णांमध्ये कधीकधी हेही शक्य होत नसते. लक्षणे कित्येक वर्षे दिसत व जाणवत नाहीत. सावकाश दिसू लागतात. पण योग्य आहार व व्यायाम यांच्या सहाय्याने नियंत्रणात ठेवली जाऊ शकतात.

डायबिटीज हा कित्येक व्याधींचा समुह आहे ज्यात एकतर आपले शरीर योग्य प्रमाणात इन्सुलीन तयार करत नाही किंवा तयार केलेच तर ते योग्य प्रकारे वापरत नाही. असेही होऊ शकते की वरील उल्लेखित दोन्हीही अवस्था एकाच वेळी असू शकतात. अश्या गोष्टी ज्यावेळी घडतात त्यावेळी शरीर हे रक्तातील साखर, पेशीं(सेल्स)मध्ये पोहोचऊ शकत नाही आणि ह्याचमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. ही साखर/शर्करा म्हणजेच ग्लूकोज ज्यामुळे शरिराला ऊर्जा व शक्ति मिळते. इन्सुलीन कमी झाल्याने किंवा इन्सुलीनला प्रतिकार झाल्याने, रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढत जाते जे स्वास्थ्यासाठी अपायकारक आहे.

इन्सुलीन हे एक हॉर्मोन आहे. हॉर्मोन म्हणजेच शरीराच्या अवयवांना चेतना देणारा शरीरग्रंथीपासून निघणारा स्राव. व हे इन्सुलीन तयार करण्याचे काम स्वादुपिन्ड(पॅन्क्रियाज) इमानैतबारे करत असते. इन्सुलीन हे रक्तातील ग्लुकोज शरीरातील पेशींमध्ये पोहोचवते. ग्लुकोज जर जास्त असेल तर रक्तातील साखरेचे संतुलन राखण्याकरिता इन्सुलीनसुद्धा जास्त प्रमाणात तयार होते.

काहींमध्ये तर त्यांची स्वतःची रोगप्रतिकार प्रणाली जी संसर्गदोषांपासून शरीराचे संरक्षण करते, ती स्वादुपिन्डामधील इन्सुलीन तयार करणार्‍या पेशींवर परके समजून हल्ला करते व इन्सुलीनचे उत्पादन बंद करते किंवा कमी करते. असे झाल्याने रक्तातील ग्लूकोज हे रक्तामध्येच राहते व शरिरातील पेशी ह्या साखरेचे/शर्करेचे शोषण करुन ऊर्जेत रूपांतर करण्यात असमर्थ ठरते. आणि ह्यालाच *टाईप १ डायबिटीज* किंवा *इन्सुलीन डिपेंडंट

डायबिटीज* असे म्हणतात. मोठ्या माणसांमध्ये तर होऊ शकतो त्याशिवाय लहान मुलांमध्ये सुद्धा हा होतो. *ज्यूवेनाईल डायबिटीज* म्हणुन ही ओळखला जातो. अश्या अवस्थेत मग शरिरामध्ये बाहेरुन इन्सुलीन द्यावे लागते. घरातील लोकाना जर डायबिटीज असेल तर पुढील पीढीला ते होण्याची शक्यता जास्त असते.
पुनःपुनः तहान लागणे व लघवीला होणे, लहान मुलांनी अंथरूण व बिछाना ओला करणे, खुप भुक लागणे, नकळत वजन कमी होणे, स्वभावात चिडचिडेपणा, थकवा व अशक्तपणा येणे, धूसर दिसणे यांसारख्या तक्रारी टाईप.१ डायबिटीज मध्ये शक्यतो दिसून येतात. हा डायबिटीज प्रकार होण्यापासून रोखणे अशक्य आहे व लक्षणे लगेचच काही आठवडयात दिसू लागतात.

*टाईप २ डायबिटीज* हा आजीवन राहणारा डायबीटीसचा दुसरा प्रकार ज्यामध्ये इन्सुलीन तर तयार होते पण शरीराला/ शरीराच्या पेशीनां जेवढे इन्सुलीन वापरले पाहिजे तेवढ़े वापरणे शक्य होत नाही किंवा वापरत नाहीत. सुरुवातीस स्वादुपिन्ड शक्य होईल तेवढे इन्सुलीन तयार करते जेणेकरुन ग्लुकोज हे पेशीमध्ये जाईल. पण नंतर तेही हतबल होते व आपले कार्य कमी करते. अश्याने रक्तातील साखरेचे प्रमाण इथेही वाढू लागते. तरुण वयात व वृद्धावस्थेमध्ये जास्त प्रमाणात होतो. ह्यालाच *एडल्ट-ऑन्सेट डायबिटीज* असेही म्हणतात. जगभरात सगळ्यात जास्त आढळणारा हा डायबीटीसचा प्रकार. ह्यामध्ये इन्सुलीनला प्रतिकार होऊ लागतो. तहान लागणे, जास्त प्रमाणात व पुनःपुनः लघवीला होणे, धूसर दृष्टि, तापट व हेकड़ स्वभाव, हातापायात मुंग्या येणे, थकवा येणे, जखम लवकर न भरणे, इन्फेक्शन्स परत परत होणे, खुप भुक लागणे, वजन व शरीरभार कमी होणे यांसारखी लक्षणे मध्ये आढळतात. वजन जास्त असणे हे तर ह्या प्रकारच्या डायबीटीसला अजूनच कारणीभूत ठरते. टाईप२ डायबीटीसच्या रुग्णांमध्ये पोटाच्या भोवती जास्त मांस व चरबी असणे, उच्चरक्तदाब, कोलेस्टेरॉल व ट्राायग्लिसराईड्सचे प्रमाणही जास्त असते. जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे यकृतामध्ये अतिमात्रेत शर्करा साठवून ठेवली जाते व ही शर्करा शरीरामधील साखर जर कमी झाली तर त्यासाठी वापरली जाते. पण ह्या टाईप२च्या रुग्णांमध्ये कधीकधी हे ही शक्य होत नसते. लक्षणे कित्येक वर्षे दिसत व जाणवत नाहीत. सावकाश दिसू लागतात. पण योग्य आहार व व्यायाम यांच्या सहाय्याने नियंत्रणात ठेवली जाऊ शकतात.

आयुर्वेदानुसार ज्याला मधुमेह म्हटले जाते तो प्रमेहाच्या २० प्रकारांपैकी एक. नेहमी आरामात बसून राहणे, अतिप्रमाणात झोप घेणे, व्यायाम न करणे, बैठे काम यासारखा विहार व त्याबरोबरच थंड-तैलाचे, गोड, शरिरातील मांस व चरबी वाढवणारे, द्रव(पातळ) पदार्थ खाणे जसे की प्राण्यांचे मांस(जलचर इतर), नवीन धान्य, नवीन पाणी, गुळ व गुळापासून बनविलेले पदार्थ, दही, साखर, आंबट, पीठाचे पदार्थ हे जास्त प्रमाणात खाणे, धूम्रपान करणे, दारु पिणे हे प्रमेहाला कारणीभूत ठरतात. खरे पाहता प्रमेह हा एक कुलज व्याधी असून प्रमेही माता-पिता यांचेकडून आलेल्या बीजदोषांमुळे प्रमेहाची उत्पत्ती बहुतांश वेळा होत असते. प्रमेहाचा कुलज इतिहास असणार्‍या व्यक्तिकडून वरील प्रकारचा शरीरामध्ये कफ अतिप्रमाणात वाढवणारा आहार-विहार घडल्याने प्रमेह उत्पन्न होतो असे म्हणता येईल. शरीरामध्ये द्रव गुण(पाण्याचा अंश) वाढतो व त्यामुळे चिकटपणा वाढतो. द्रवगुण वाढल्याने भुख मंदावते व धातुंचे पोषण योग्य प्रकारे होईनासे होते. धातु विकृतरित्या वाढू लागतात पण त्यांचे पोषण मात्र होत नसते. त्यामध्ये एक प्रकारचे शैथिल्य येते. शरिरामध्ये वात वाढतो. दात, टाळू, गळा, जिव्हा इत्यादी प्रदेशी अधिक प्रमाणात मल उत्पन्न होणे व साठून राहणे, हाताच्या व पायाच्या तळव्यामध्ये जळजळ, सर्व शरीर चिकट झाल्यासारखे वाटणे, केसामध्ये जटा होणे, नख वाढणे, श्वासातून दुर्गंधी असणे अशी पूर्वरुपे दिसू लागतात. प्रमेहाच्या २० प्रकारांमध्ये मूत्राचा स्पर्श, गंध, वर्ण बदलत जातो. पुर्वरुपातील सर्व लक्षणे ही अधिकच वाढतात. मेहाच्या उपद्रवांमध्ये भोजनाचा परिपाक न होणे, तोंडाला चव नसणे, उलट्या होणे, झोप जास्त येणे किंवा अगदीच न येणे, सर्दी होणे, लघवीच्या ठिकाणी टोचल्यासारखी, फाडल्याप्रमाणे वेदना असणे, ताप व चक्कर येणे, शौचास पातळ होणे, खोकला, धाप लागणे, छातीमध्ये गच्च होणे यांसारख्या तक्रारी असतात.

बीजदोषातून उत्पन्न झालेले सर्व व्याधी हे असाध्यच असतात. नित्य व्यायाम व शारीरिक कसरत करावी. डायबिटीज हा ऑफीसमध्ये बैठे काम करणार्‍या किंवा घरी काहीच न करता बसून राहणार्‍या लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. आहारामध्ये सातू, नाचणी, वरी, गहू, मूग, कुलिथ, जूने तांदुळ, कारले, दुधीभोपळा यांसारख्या भाज्या पथ्यकर आहेत. तांदुळ, गहू वगैरे धान्य भाजून नंतर वापरल्यास ती अधिक पथ्यकर बनतात. एकदा अग्निशी संपर्क आल्याने ही द्रव्ये पचायला अधिक हलकी बनतात म्हणून पथ्यकर. हळद, लिम्बू, खैर, गुळवेल, जांभूळ, पडवळ, उंबर, वड ही वनस्पतिज द्रव्येसुद्धा उपयोगी ठरतात, अर्थातच तज्ञांच्या किंवा चिकित्सकांच्या सल्ल्यानेच.
प्रमेहीमध्ये फक्त लक्षणांवर विसंबून राहून प्रमेह कमी होत आहे किंवा नाही ठरविणे बरेच कठिण जाते. अश्यावेळी त्यासोबत मूत्रातील व रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून मगच औषधांची मात्रा व आहार योजना करावी लागते.
आरबीएसएल, एफबीएसएल, पीपीबीएसएल चाचणी करुन रक्तातील साखरेचे प्रमाण ओळखू शकतो. एचबीए१सी चाचणीने गेल्या ३ महिन्याचे रक्तातील साखरेचे प्रमाण व रिकॉर्ड ट्रॅक करु शकतो. जर डायबिटीज किंवा प्रमेह नियंत्रणामध्ये नाही राहिला तर वृक्क, यकृत, पौरुषग्रंथी, पियुष ग्रंथी, बस्ति, फुफ्फुस, आंत्रसारख्या अवयवांवर प्रभाव पडू शकतो व त्यांचे कार्यपण बिघड़ेल. म्हणूनच काळजी घ्या. सर्व रोग काही पुर्वजन्मामध्ये पाप केल्याने होत नसतात. काही रोग हे आपल्याच चुकिच्या पद्धतीने केलेल्या आहार व विहार ह्यामुळे उत्पन्न होतात.