वातदोषात उपयुक्त योगासने

0
292
  •  डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी-म्हापसा)

पोट निरोगी असेल तर मन शांत असते व मन शांत असेल तर व्यक्ती समाधानी व स्वस्थ असते. हे दोन्ही संलग्न असल्याने पचन संस्था निरोगी आणि मजबूत असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पोटातील वायू सरण्यासाठी आणि पचन ठीक होण्यासाठी पवनमुक्तासन गरजेचे आहे.

शरीरस्वास्थ्यासाठी योगासनांचा विचार करताना शरिरातील दोषस्थितीचा विशेष रुपाने विचार करावा लागतो. कारण काही आसने वातावर तर काही पित्तावर तर काही कफदोषावर विशिष्ट पद्धतीने कार्य करतात. उदा. स्वस्तिकासन, पद्मासन, सिद्धासन, पवनमुक्तासन ही काही वातघ्न गटातील आसने आहेत. शलभासन, भुजंगासन, धनुरासन, सिंहासन, मत्स्येंद्रासन, कुक्कुटासन, कूर्मासन, मयुरासन, वीरासन, भद्रासन ही काही पित्तघ्न गटातील आसने आहेत. तशीच सर्वांगासन, हलासन, पश्‍चिमोत्तानासन, शीर्षासन… ही काही कफघ्न गटातील आसने होत. तसेच शवासनासारखे आसन हे धातुरक्षणार्थ हेतूने केले जाते म्हणजेच सगळीच आसने रोज करण्याची गरज नसते. स्वस्थ मनुष्याने आपल्या देहप्रकृतीचा विचार करून आजारी मनुष्याने आपल्या बलाचा व विकृत दोषाचा विचार करून त्या त्या दोषाच्या शमनार्थ आसने करावीत.

आसनांचे ध्यानात्मक, क्रियात्मक, शिथिलीकर व तोलात्मक असे चार प्रकार करता येतात.
* ध्यानात्मक आसने ः सुखासन, अर्धपद्मासन, पद्मासन, वज्रासन आणि सिद्धासन या आसनांना ध्यानात्मक आसने म्हटले आहे.
– या आसनांचा उपयोग विशेष करून प्राणायाम, दीर्घश्‍वसन, ध्यान यासाठी केला जातो.
– या आसनांनी सर्व शरीर सुखपूर्वक तोलले जाते व त्यामुळे मनाची चंचलता कमी होऊन चित्त एकाग्र करण्याकडे योग्य प्रयत्न केले जाऊ शकतात.
१) स्वस्तिकासन ः या आसनातील पायांची रचना स्वस्तिकातील एकमेकांना छेदणार्‍या रेषांप्रमाणे असते. म्हणून याला स्वस्तिकासन असे म्हणतात व ही आसनस्थिती धारण सुखकर असल्याने याला ‘सुखासन’ असेही म्हणतात.
आसनपूर्व स्थिती ः- समोर पाय पसरून बसणे.
आसनकृती ः- १) प्रथम उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या मांडीला आतील बाजूने स्पर्श करेल असा ठेवावा. नंतर उजव्या पायाची टाच जांघेच्या जवळ जास्तीत जास्त नेऊन ठेवावी.
२) यानंतर डावा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या मांडीकडे आणाला व डाव्या पायाचे पाऊल उजव्या पायाची पोटरी व मांडी यांच्यामध्ये बरोबर बसवावी. अंगठ्याकडील पावलाची बाजू थोडी बाहेर राहील असे डावे पाऊल पक्के करावे.
३) दोन्ही हात ताठ गुडघ्याजवळ पालथे किंवा ज्ञानमुद्रा साधून उलटे ठेवावेत. पाठ, मान व मस्तक एका सरळ रेषेत ठेवावे.
फायदे ः- कटी, सवयी या वासस्थानांवर नियंत्रण प्राप्त करता येते.
– निरनिराळ्या वातव्याधीत उपयोगी
– ताठ बसण्याच्या सवयीने कोष्ठस्थ अवयवांच्या क्रिया योग्य राहतात.
२) पद्मासन ः- हे आसन घालून बसल्यानंतर हात व पाय यांची रचना कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे भासते म्हणून या आसनाला पद्मासन किंवा कमलासन असे म्हणतात.

आसनपूर्वस्थिती – पाय समोर पसरून बसावे.
आसनकृती ः- १) उजवा पाय गुडघ्यात वाकवून दोन्ही हातांनी उजवे पाऊल धरून ते डाव्या जांघेत असे बसवावे की उजवी टाच ओटीपोटाखालील हाडावर येईल.
२) डावा पाय गुडघ्यात दुमडूनडावे पाऊल दोन्ही हातांनी उचलून उजव्या जांघेत असे पक्के करावे की डावी टाच उजव्या टाचेजवळ येईल व दोन्ही गुडघे जमिनीस चिकटून राहतील.
३) नंतर हाताचा अंगठा व तर्जनीची टोके एकमेकांजवळ आणून, इतर तीन बोटे सरळ ठेवून ज्ञानमुद्रा तयार करावी. तळहात वरच्या बाजूला करून हात सरळ ताठ ठेवून तळहाताचा मागील भाग गुडघ्याजवळ टेकवून ताठ बसावे.
४) आसन सोडताना प्रथम डावा पाय व नंतर उजवा पाय मोकळा करावा व आसन पूर्वस्थितीत बसावे.
फायदे ः- हे आसन केल्याने निरनिराळ्या वातव्याधीमध्ये चालण्याची हालचाल करण्याची शक्ती सुधारते.
– आध्यात्मिक उन्नतीसाठी व सर्व चक्रांना जागृती आणण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
– रुग्णाने आसन केल्यानंतर काही काळाने ठेकर येऊ लागल्यास रोग आमाशयस्थ आहे व वातानुलोमन होऊ लागल्यास रोग संप्राप्ती पक्वाशयात आहे असे समजावे.
– स्तंभ किंवा शैथिल्य असल्यास पायाची शक्ती नष्ट होते. अशा अवस्थेमध्ये पायांचे कार्यक्षमता प्राकृत करण्याची क्षमता या आसनात आहे.
वर्ज्य – संधीशोथ, संधीशूल असता व्यक्तींनी हे आसन करू नये.
३) सिद्धासन ः- मनाची एकाग्रता साधण्यासाठी या आसनाचा फार उपयोग होतो. म्हणून याला सिद्धासन असे म्हणतात.
आसनपूर्वस्थिती – समोर पाय पसरून बसावे.
आसनकृती – १) प्रथम उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या पायाची टाच वृषण आणि गुदद्वार यांच्यामधील शिवणीवर टेकावी.
२) नंतर डावा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या पायावर घ्यावा व डाव्या पायाची टाच वृषण, शिस्न यांच्यावर पण ओटीपोटाला टेकवून ठेवावी. थोडक्यात दोन टाचांच्या मध्ये वृषण व शिस्न सुरक्षित राहतील अशी रचना होते.
३) कंबर, पाठ, मान, डोके सरळ ठेवून दृष्टी समोर स्थिर ठेवावी. याच आसनाला मुक्तासन, गुप्तासन असेही म्हणतात.
फायदे ः- शरीरातील सर्व नाडीमार्गाचे योग्य शोधन होते.
– ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांचे उत्तम नियंत्रण करता येते.
४) वज्रासन ः- या आसनात पायांची बैठक वज्राप्रमाणे पक्की असते. म्हणून याला वज्रासन म्हणतात.
आसनपूर्वस्थिती – दोन्ही पाय एकमेकांना चिकटवून समोर पसरून आणि हाताचे तळवे जमिनीला टेकवून हात शरीराला चिकटवून बसावे.
आसनकृती – १) प्रथम डाव्या हातावर शरीराचा भार घेऊन उजव्या हाताने उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजवे पाऊल पकडून ते उजव्या पार्श्‍वभागाखाली तळवा वर असलेल्या स्थितीत बसवावे.
२) नंतर उजव्या हातावर शरीराचा किंचित भार घेऊन डाव्या हाताने डावा पाय गुडघ्यात दुमडून, डावे पाऊल पकडून डाव्या पार्श्‍वभागाखाली पावलाचा तळवा वर राहील अशा स्थितीत बसवावे.
३) दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना टेकवावेत व दोन्ही पावलांच्या तळव्यांवर पार्श्‍वभाग पक्का बसवावा.
४) कंबर, पाठ, मान, डोके ताठ ठेवून हाताचे तळवे गुडघ्यांवर ठेवून दोन्ही हात ताठ ठेवून बसावे.
फायदे ः- हात व पायांना कंप असणार्‍या रुग्णांना याचा फायदा मिळतो. पक्षवधामध्येशैथिल्य असल्यास हे आसन केल्याने उत्तम मांससंहनन प्राप्त होऊ शकते.
– गुदभ्रंश, योनिभ्रंशाच्या रुग्णांना फायदा मिळतो.
– वज्र म्हणजे कठोर किंवा मजबूत. हे पाय, मांडीच्या स्नायूंना मजबूत बनविते.
– रक्तसंचरण गतिमान करते.
– पचन सुधारते. वज्रासन हे एकमेव असे आसन आहे जे आपण जेवल्यानंतरही करू शकतो.
– कंबर आणि पाठदुखीच्या रुग्णांमध्ये खूप फायदेशीर.
– ध्यानमुद्रेमध्ये वज्रासन खूप फायदेशीर आहे.
– महिलांसाठी विशेष लाभकर. अनियमित मासिक पाळी असल्यास हे आसन दररोज केल्याने लाभ होतो.
५) पवनमुक्तासन ः- पवन म्हणजे वायू – वातदोष. हे आसन केल्याने वातदोषजन्य व्याधी नष्ट होण्यास मदत होते. मलस्वरूप विरल पदार्थांचे (फ्लेटस) गुदद्वारावाटे निःसारण होण्यास मदत होते. म्हणून या आसनाला पवनमुक्तासन असे म्हणतात.

आसन पूर्वस्थिती – पाठीवर उताणे झोपावे.
आसनकृती – १) दोन्ही पाय जवळ ठेवून, तळहात जमिनीवर टेकवून दोन्ही हात शरीराला चिकटवून दोन्ही बाजूला ठेवावेत.
२) नंतर पोटाच्या स्नायूंचा संकोच करून हातांवर फारसा जोर न देता दोन्ही पाय एकत्र वर उचलून १५ ते २० अंशाचा जमिनीशी कोन होईल असे वर उचलावेत व मग गुडघ्यात दुमडून दुमडलेले गुडघे हळूहळू छातीजवळ घ्यावेत.
३) नंतर दोन्ही हातांनी गुडघ्यांना विळखा घालून ते छातीवर दाबावेत आणि त्याच वेळी डोके वर उचलून हनुवटीने गुडघ्यांना स्पर्श करावा.
४) श्‍वासोच्छ्वास चालू ठेवून २-३ मिनिटे तसेच रहावे. आसन सोडून देताना उलट क्रमाने क्रिया कराव्यात. वर्ज्य – ज्यांच्या मानेतील मणक्यात दोष असेल त्यांनी हे आसन करू नये.
फायदे ः- पोट निरोगी असेल तर मन शांत असते व मन शांत असेल तर व्यक्ती समाधानी व स्वस्थ असते. हे दोन्ही संलग्न असल्याने पचन संस्था निरोगी आणि मजबूत असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पोटातील वायू सरण्यासाठी आणि पचन ठीक होण्यासाठी पवनमुक्तासन गरजेचे आहे.

– पोटाचे व पाठीचे स्नायू बळकट होतात.
– हाताचे आणि पायाचे स्नायू पुष्ट होतात.
– पोटातील आतडी व इतर अवयवांचे मर्दन होते.
– पचनशक्ती सुधारते आणि पोटातील वायू बाहेर पडतो.
– पार्श्‍वभागातील सांध्यामध्ये रक्ताभिसरण वाढते व पाठीच्या खालच्या भागाचा ताण कमी होतो.
– वजन कमी करण्यासाठीही हे आसन फायदेशीर आहे. या आसनाच्या नियमित करण्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
– मूलाधारापासून स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध या कंठस्थ चक्रापर्यंत सर्व चक्रस्थानांवर दाब पडतो व त्या मानाने रोग्याला फारच कमी परिश्रम होतात. यामुळे वातनिग्रह करण्यास हे आसन कमी श्रमात अधिकाधिक फायदे मिळवून देणारे आहे.
– दुसर्‍याच्या मदतीने अत्यंत क्षीण रोगीदेखील हे आसन करून वातनिग्रह साधू शकतो.
वातव्याधी असणार्‍यांनी किंवा वातप्रकृती असल्यास ही वातघ्न गटातील आसने जरूर करावीत. वज्रासन व पवनमुक्तासन ही दोषविकृतीमध्ये तसेच स्वास्थ्य रक्षणार्थ उपयुक्त अशी आसने आहेत. त्याचा सराव रोज करावा.
कफघ्न व पित्तघ्न गटातील आसने पुढील लेखात पाहू.