१५० व्या जयंतीवर्षात गांधी विचारांना उजाळा

0
178

एडिटर्स चॉइस
– परेश प्रभू

महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्ताने विविध पुस्तके प्रकाशित होत आहेत. गांधीजींचे आत्मचरित्र, त्यांची महत्त्वाची भाषणे, त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेले विचार आदींचे एक समग्र संकलनही नुकतेच प्रकाशित झाले आहे. गांधी आणि संगीत याविषयीचे एक वेगळे पुस्तकही वाचनात आले. या दोन्ही पुस्तकांविषयी –

महात्मा गांधी यांचे हे १५० वे जयंती वर्ष आहे. नुकतीच त्यांची पुण्यतिथी पार पडली. आजच्या परिस्थितीत गांधी विचारांची उपयुक्तता व आवश्यकता यावर बरीच चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर नुकतीच गांधींविषयीची दोन पुस्तके दोन वेगवेगळ्या प्रकाशनसंस्थांतर्फे प्रकाशित झाली आहेत.

गांधीजींचे विविध विषयांवरील विचार, त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास, त्यांनी वेळोवेळी केलेली भाषणे यांचे जवळजवळ ५८२ पानांचे एक समग्र संकलन ‘द व्हेरी बेस्ट ऑफ महात्मा गांधी’ या नावाने नुकतेच रूपा पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे, तर दुसरे पुस्तक आहे गांधीजी आणि संगीत या वेगळ्या विषयावरील, जे रोलीबुक्स या दुसर्‍या आघाडीच्या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केले आहे, त्याचे नाव आहे, ‘सिंगिंग गांधीज् इंडिया.’

गांधीजींनी सहकार्‍यांच्या आग्रहाखातर आपले आत्मचरित्र गुजरातीत लिहिले. १९२७ साली त्याचा पहिला खंड प्रकाशित झाला, तर १९२९ साली दुसरा खंड. हे दोन्ही खंड हातोहात विकले गेले. संपूर्ण आत्मचरित्र सलग लिहिण्याएवढी उसंत गांधीजींना कधीच लाभली नाही. त्यांनी आत्मचरित्र लिहायला घेतले आणि मुंबईत दंगली उसळल्या. त्यानंतर येरवडा कारागृहात असताना सर जमनादास यांनी त्यांना आत्मचरित्र लेखनाचा आग्रह केला, परंतु तरीही सलगपणे ते लिहिणे त्यांना शक्य झाले नाही. मुळात आत्मचरित्र ही संकल्पना पाश्‍चात्त्यांची. पूर्वेकडील माणसांनी कधी आत्मचरित्रे लिहिलेली नाहीत आणि समजा आज आत्मचरित्र लिहिले आणि कालांतराने आपले विचार बदलले तर काय, असा सवालही त्यांच्या एका मित्राने त्यांना केला होता. त्यामुळे आत्मचरित्र लेखनात गांधींना तसा रस नव्हता, परंतु आपल्या साप्ताहिकासाठी मालिकारूपाने त्यांनी जे लेखन केले, तेच संकलित करून महादेवभाई देसाईंनी ते पुढे प्रकाशित केले.

गांधीजी आपल्या आत्मपर लेखनाला सत्याचे प्रयोग संबोधतात. पूर्ण सत्य आपल्याला गवसले आहे असा त्यांचा दावा कधीच नाही. सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य आदींसंबंधीचे जे प्रयोग ते आयुष्यात करीत गेले, त्यांच्याविषयी ते प्रांजळपणे लिहित गेले. पुढे महादेवभाई देसाईंच्या प्रयत्नांमुळे ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. आपल्याला ‘महात्मा’ असे जे संबोधले जाते, त्याने आपल्याला वेदनाच होत असल्याचे गांधीजींनी नमूद केलेले आहे. त्यांच्या मूलतः आध्यात्मिक वृत्तीचे दर्शन त्यांच्या ‘सत्याचे प्रयोग’ मध्ये होते.
गांधींचे ‘सत्याचे प्रयोग’ जाणकारांत वाचले गेलेच आहे, त्यामुळे त्याविषयी येथे सांगण्याजोगे काही नवे नाही, परंतु रूपा प्रकाशित ‘द व्हेरी बेस्ट ऑफ महात्मा गांधी’ या संकलनामध्ये संपूर्ण पाच खंडांतील सत्याचे प्रयोगच्या जोडीने गांधीजींची काही अत्यंत महत्त्वपूर्ण भाषणे आणि त्यांच्या विचारांचे जे संकलन दिले गेले आहे, ते महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः १९१६ साली बनारस हिंदू विश्‍वविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गांधीजींना निमंत्रण होते. तेथे त्यांनी केलेले भाषण अर्ध्यावरच उधळले गेले, परंतु त्यामधून त्यांनी मातृभाषेच्या महत्त्वासंबंधीचे जे विचार मांडले आहेत, ते मननीय आहेत. पुण्यातील काही प्राध्यापकांनी त्यांच्याशी बोलताना असे म्हटले होते की भारतीय युवकांना इंग्रजीतून ज्ञान मिळत असल्याने त्यांच्या आयुष्याची किमान सहा वर्षे ती भाषा शिकण्यात वाया जातात. आपल्या शाळा व महाविद्यालयांतून शिकणार्‍या मुलांच्या एकूण संख्येशी या सहा वर्षांचा गुणाकार करा म्हणजे देशाची किती हजार वर्षे आपण वाया घालवतो याचा विचार करा असे गांधीजी या भाषणात म्हणतात. आपण जर देशी भाषांतून एवढी वर्षे शिकलो असतो, तर आज स्वतंत्र असतो, ते स्वतःच्याच देशात विदेशी व्यक्तीसारखे वागले नसते, तर देशाच्या ह्रदयाशी संवाद साधू शकले असते, असे त्यांनी निःसंदिग्धपणे या भाषणात सांगितले आहे.

१९३० सालच्या ऐतिहासिक दांडी यात्रेप्रसंगी गांधीजींनी केलेले भाषण, १९३१ च्या गोलमेज परिषदेतील भाषण, १९४२ चे ‘चले जाव’ चळवळीवेळचे भाषण, मुंबईतील कॉंग्रेस अधिवेशनात ४२ साली दिलेली भाषणे, आपल्या प्रार्थनासभेवेळी काश्मीरसंबंधी दिलेले भाषण, १८४८ मधील आपल्या शेवटच्या उपोषणावेळचे भाषण अशा सर्व महत्त्वाच्या भाषणांनाही या पुस्तकामध्ये संकलित करण्यात आले आहे, ज्यामुळे हा एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरतो. शिवाय ‘थॉटस् ऑफ महात्मा गांधी’ या अंतिम विभागामध्ये शांती, धर्म, अहिंसा याविषयीचे गांधीजींचे विचार संकलित केले गेले आहेत. गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षात प्रकाशित करण्यात आलेल्या या तब्बल ५८२ पानी ग्रंथाचे मूल्य फक्त ३९५ रुपये आहे.

***

राजकारण आणि संगीत यांचा काही संबंध असू शकतो का? राजकारणी म्हटले की सर्वसाधारणतः अरसिक आणि साहित्य, संगीत, संस्कृती यांच्याशी काही देणेघेणे नसलेला महाभाग असाच सर्वसाधारण समज असतो. अर्थात, यालाही सन्माननीय अपवाद आहेत, परंतु सर्वसाधारणतः राजकारण्याची समाजमानसातील हीच प्रतिमा असते. परंतु संगीत आणि राजकारण यांचा अर्थाअर्थी प्रत्यक्ष संबंध जरी नसला, तरी संगीताचा आपल्या राजकारणासाठी कसा प्रभावीरीत्या वापर करता येऊ शकतो यावर प्रकाश टाकणारे एक आगळेवेगळे नवे पुस्तक या नववर्षात हाती आले, ते म्हणजे लक्ष्मी सुब्रह्मण्यन यांचे ‘सिंगिंग गांधीज् इंडिया ः म्युझिक अँड सॉनिक नॅशनलिझम.’ संगीत आणि राष्ट्रवाद यांचा कसा संबंध असू शकतो आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या राष्ट्रीय राजकारणासाठी संगीताचा कसा प्रभावीरीत्या वापर करून घेतला या वेगळ्याच विषयावरचे हे अभ्यासपूर्ण पुस्तक आहे.

आपल्याकडे राजेरजवाड्यांच्या काळामध्ये संगीताला राजाश्रय मिळाला. दरबारी संगीताच्या परंपरा निर्माण झाल्या, घराणी निर्माण झाली. परंतु ब्रिटिशांच्या काळामध्ये पं. विष्णू दिगंबर पलुस्कर सारख्या संगीतज्ज्ञांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची जी बैठक घातली, त्यातून संगीत सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचू शकले, त्यांच्या मनावर प्रभाव टाकू शकले आणि ह्याच संगीताचा राष्ट्रीय राजकारणामध्ये देखील कसा प्रभावीरीत्या उपयोग करून घेतला जाऊ लागला त्याचा लेखिकेने विस्तृत आढावा घेतला आहे.

महात्मा गांधींना प्रतिकात्मकतेची फार चांगली जाण होती. खादी असो, चरखा असो, मिठाचा सत्याग्रह करताना मीठ असो, ही सर्व प्रतिके गांधीजींनी प्रभावीरीत्या आपल्या राष्ट्रीय राजकारणामध्ये वापरली. त्याच प्रमाणे संगीताचा देखील त्यांनी असाच प्रभावी वापर आपल्या आश्रम जीवनामध्ये राष्ट्रकारणासाठी कसा करून घेतला त्यावर लेखिकेचे भाष्य वाचण्याजोगे आहे. गांधीजींचा जन्म गुजराती वैष्णव कुटुंबात झालेला होता. साहजिकच त्यांच्यावर भजने, प्रार्थना यांचा बालपणापासून प्रभाव होता. ह्या प्रार्थना, भजने यांतून देखील माणसांवर नैतिक, आध्यात्मिक संस्कार कसा होत असतो हे त्यांनी जवळून अनुभवले होते. त्यामुळे आपल्या आश्रमांमधून त्यांनी याच शांत, संथ भजनावलीचा वापर आपल्याला अभिप्रेत असलेले शांती, सौहार्द, सदाचार, सहिष्णुता आदी मूल्यांच्या प्रसारासाठी करून घेतला. गांधीजींच्या आश्रमातील दिनक्रम पहाटे चार वाजल्यापासून सुरू होत असे. श्‍लोक, भजन, गीतापाठ यांनी त्याची सुरूवात होत असे. संध्याकाळी देखील गीतापठण, भजने होत व गांधीजींना अत्यंत प्रिय असलेल्या पलुस्करांनी संगीतबद्ध केलेल्या रामधुनीने प्रार्थनेची सांगता होत असे. या सार्‍याची काळजीपूर्वक निवड गांधीजींनी केलेली होती. त्यातून आपल्या अनुयायांमध्ये आपल्याला अपेक्षित असलेले भाव प्रसारित करण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला असे लेखिका म्हणते. ध्वनीचे महत्त्व जसे गांधीजींना उमगलेले होते, तसेच मौनाचे महत्त्वही ते जाणून होते. त्यामुळे अधूनमधून मौनाचा देखील गांधीजींनी हत्यारासारखा प्रभावीरीत्या वापर केला. रवींद्रनाथ टागोर यांची संगीताकडे पाहण्याची दृष्टी ही कलात्मक व सौंदर्यवादी होती, परंतु गांधीजींची संगीताकडे पाहण्याची दृष्टी ही राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने आपल्याला अपेक्षित असलेले सत्याग्रही निर्माण करण्याची होती असे लेखिका नमूद करते. समाजामध्ये शांततामय भाव निर्माण व्हावा, हिंसाचारास जनता उद्युक्त होऊ नये यासाठी कशा प्रकारच्या संगीताचा प्रसार व्हायला हवा यासंबंधीची गांधीजींची दृष्टी त्यांच्या आश्रमी जीवनातील संगीतामधून दिसून येते असे लेखिका म्हणते.

गांधीजींनी संगीताबद्दल ठिकठिकाणी मांडलेल्या विचारांचा वेधही लेखिकेने घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील प्रभातफेर्‍या, घोषणा यामधूनही ध्वनीचा झालेला वापर, त्याचा जनमानसावर पडलेला प्रभाव याची चर्चाही लेखिकेने केली आहे. राजकारण आणि संगीत ही दोन टोके कशी एकत्र आली आणि त्यांनी जनमानस कसे प्रभावित केले, त्याचा हा लेखाजोखा वाचनीय आहे. विसाव्या शतकातील राजकारणातील ध्वनी व संगीताचे महत्त्व लेखिकेने समर्थपणे या पुस्तकात टिपले आहे. राष्ट्रीय जागृतीमध्ये संगीताचे योगदान काय आणि कसे होते हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरेल यात शंका नाही.