निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील ४ दोषींना आज दि. १ फेब्रुवारी रोजी फाशी दिली जाणार नाही. पुढील आदेशापर्यंत त्या सर्व दोषींची ‘डेथ वॉरंटस्’ची कार्यवाही पुढे ढकलण्यात आली आहे. येथील न्यायालयाने काल हा निर्णय जाहीर केला. दोषींनी न्यायालयात शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. दरम्यान, दोषींची फाशी लांबणीवर पडली असली तरी आपली लढाई चालूच राहील असे निर्भयाच्या आईने पत्रकारांना सांगितले.
याचिकेवर काल दिल्लीचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांच्यासमोर सुनावणी होऊन न्या. राणा यांनी वरील निर्णय दिला. या प्रकरणातील पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा, अक्षय कुमार व मुकेश कुमार सिंग या दोषींची डेथ वॉरंटस् १७ जानेवारी रोजी जारी झाली होती. त्यांनी वरील न्यायालयात १ फेब्रुवारीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल केल्यानंतर तिहार तुरुंग प्रशासनाने त्याला आव्हान दिले होते. मात्र त्यांचे म्हणणे न्यायालयाने मान्य केले नाही.
विनयकुमारची याचिका राष्ट्रपतींसमोर
कालच्या सुनावणीमुळे दोषींच्या वकिलाने युक्तीवाद करताना सांगितले की जेव्हा एक दोषीची याचिका प्रलंबित असते तेव्हा अन्य दोषींना फाशी दिली जाऊ शकत नाही असे नियम सांगतो. तीन दोषींची बाजू ऍड. ए. पी. सिंग यांनी मांडली. त्यांनी दोषींची फाशी बेमुदत प्रलंबित ठेवण्याची मागणी केली. विनयकुमार या दोषीची दया याचिका राष्ट्रपतींसमोर आहे. मुकेश सिंग याची दया याचिका राष्ट्रपतींनी १७ जानेवारी रोजी फेटाळली आहे. त्यानंतर त्याने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती.
विनय कुमार व अक्षय कुमार यांनी केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने याआधीच नाकारल्या होत्या. पवन कुमार यानेच अद्याप क्युरेटिव्ह याचिका दाखल केलेली नाही. न्यायालयाने पहिल्यांदा गेल्या ७ जानेवारी रोजी दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्याचा निवाडा जाहीर केला होता. नंतर त्यात बदल होऊन त्यांना आज दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वा. फाशी दिली जाणार होती. मात्र आता ती अनिश्चित काळापर्यंत लांबणीवर पडली आहे.