महिला संघाची विजयी सलामी

0
100

>> पहिल्या टी-ट्वेंटीत इंग्लंडवर ५ गड्यांनी विजय

भारतीय महिला क्रिकेट संघाने तिरंगी टी-ट्वेंटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा ५ गडी व ३ चेंडू राखून पराभव केला. ऑस्ट्रेलिया हा या मालिकेतील तिसरा संघ आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नाबाद ४२ धावा व आघाडी फळीतील खेळाडूंच्या उपयुक्त योगदानामुळे भारताला हा विजय मिळविणे शक्य झाले.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी निवडल्यानंतर इंग्लंडचा संघ १०व्या षटकाअखेर ४ बाद ५९ अशा नाजूक स्थितीत होता. हिथर नाईट (४४ चेंडूंत ६७) व टॅमी ब्युमॉंट (२७ चेंडूंत ३७) यांनी आक्रमकतेची कास धरली. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे इंग्लंडचा संघ ७ बाद १४७ अशा भक्कम स्थितीत पोहोचला. विजयासाठी १४८ धावांचे आव्हान असताना भारताच्या आघाडी फळीतील फलंदाजांनी उपयुक्त भागीदार्‍या रचल्या. २७ धावांची सलामी मिळाल्यानंतर शफाली व जेमिमा यांनी दुसर्‍या विकेटसाठी ३७ धावा जोडल्या. मधल्या फळीत वेदा (७), तानिया (११) झटपट परतल्यामुळे कर्णधार हरमनप्रीतने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली. शेवटच्या षटकात सहा धावांची आवश्यकता होती.
पहिल्या दोन चेंडूंत दोन धावा निघाल्यानंतर तिसर्‍या चेंडूवर हरमनप्रीतने षटकार खेचून भारताला विजयी केले.

धावफलक
इंग्लंड ः एमी जोन्स झे. कौर गो. गायकवाड १, डॅनी वायट झे. पांडे गो. गायकवाड ४, नताली सीवर झे. शर्मा गो. यादव २०, हिथर नाईट झे. रॉड्रिगीस गो. पांडे ६७, फ्रान विल्सन त्रि. गो. पांडे ७, टॅमी ब्युमॉंट यष्टिचीत भाटिया गो. शर्मा ३७, कॅथरिन ब्रंट झे. मंधाना गो. शर्मा २, लॉरेन विनफिल्ड नाबाद ८, ऍन्या श्रुबसोल नाबाद १, अवांतर ०, एकूण २० षटकांत ७ बाद १४७
गोलंदाजी ः राजेश्‍वरी गायकवाड ४-०-१९-२, शिखा पांडे ४-०-३३-२, राधा यादव ४-०-३३-१, दीप्ती शर्मा ४-०-३०-२, हरमनप्रीत कौर ३-०-२३-०, पूजा वस्राकर १-०-९-०
भारत ः शफाली वर्मा झे. विल्सन गो. नाईट ३०, स्मृती मंधाना झे. विनफिल्ड गो. सीवर १५, जेमिमा रॉड्रिगीस झे. विनफिल्ड गो. ब्रंट २६, हरमनप्रीत कौर नाबाद ४२, वेदा कृष्णमूर्ती यष्टिचीत जोन्स गो. एकलस्टन ७, तानिया भाटिया झे. नाईट गो. ब्रंट ११, दीप्ती शर्मा नाबाद १२, अवांतर ७, एकूण १९.३ षटकांत ५ बाद १५०
गोलंदाजी ः सोफी एकलस्टन ४-०-२४-१, कॅथरिन ब्रंट ३.३-०-३३-२, ऍन्या श्रुबसोल २-०-१३-०, नताली सीवर ४-०-३४-१, साराह ग्लेन ३-०-२६-०, हिथर नाईट ३-०-२०-१