>> नागरिकांच्या सूचनांसाठी पोर्टलचे उद्घाटन; विधानसभा अधिवेशन ३ ते ७ फेब्रुवारी
राज्याचा अर्थसंकल्प आपण गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी विधानसभेत मांडणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. काल कामकाज सल्लागार समितीच्या (बीएसी) बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. अर्थसंकल्पीय विधानसभा अधिवेशन ३ ते ७ फेब्रुवारी असे होणार आहे. अर्थसंकल्पातून ग्रामीण विकासावर भर देण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी यावेळी दिली.
दरम्यान, येत्या ३ फेब्रुवारीपासून होणार्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पासाठी नव्या कल्पना व सूचना जनतेकडून मागवण्यासाठीच्या पोर्टलचे विधानसभा संकुलातील आपल्या कार्यालयात उद्घाटन केले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, की अर्थसंकल्प म्हणजे केवळ पैशांची तरतूद करणे एवढेच नव्हे. अर्थसंकल्प म्हटले की, शेतीपासून ग्रामीण विकास तसेच अन्य सर्व खाती यांचा संबंध येतो. वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी तज्ज्ञ मंडळी असते. अशा लोकांकडे नव्या नव्या कल्पना असतात.
सूचना पाठविण्याचे आवाहन
लोकांनी या पोर्टलवरून आपल्या कल्पना व सूचना पाठवाव्यात. सरकारला ज्या आवडतील त्या अर्थसंकल्प तयार करताना स्वीकारल्या जातील, असे सावंत यांनी स्पष्ट केले व राज्य अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
लोकांना आपल्या सूचना व्यवस्थित करता याव्यात यासाठी या पोर्टलची सोय करण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
म्हादई, सीएएसह अन्य प्रश्नी
विधानसभेत आवाज उठविणार
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेस पक्ष म्हादई, सीएए, अमली पदार्थ, कायदा आणि सुव्यवस्था, बेरोजगारी आदी प्रश्नांवर आवाज उठवणार असून या प्रश्नांवर सदस्यांना सविस्तरपणे बोलू दिले जावे, अशी आमची मागणी आहे. आपण सोमवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सभापती राजेश पाटणेकर यांच्याशी तशी मागणी केली असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल सांगितले.
वरील प्रश्न सभागृहात सविस्तरपणे मांडता यावेत यासाठी कॉंग्रेस पक्ष विधानसभेतील अन्य विरोधी पक्ष सदस्यांबरोबर हात मिळवणी करणार असल्याची माहितीही कामत यांनी दिली.
कॉंग्रेस विधीमंडळाची ३० रोजी बैठक
या अधिवेशनात सत्ताधार्यांना कसे कोंडीत पकडायचे त्यासंबंधीची रणनीती ठरवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने येत्या ३० जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वा. कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक आयोजित केली आहे.