योगसाधना – ४४७ अंतरंग योग – ३३

0
156

– डॉ. सीताकांत घाणेकर

प्रत्येक व्यक्तीने, विशेष करून योगसाधकाने मनावर संयम ठेवून सत्याच्या मार्गाने जावे. त्यामुळे सर्वांचे कल्याण होईल… स्वतःचे- कुटुंबाचे- समाजाचे- देशाचे- विश्‍वाचे. मला खात्री आहे की सर्वजण असे करतीलच.

चंचल मनाला चित्तएकाग्रतेमध्ये गुंतवायचे म्हणजे अत्यंत कठीण काम. एवढा उच्च कोटीचा धनुर्धर धनंजय अर्जुनदेखील गीतेत श्रीकृष्णाला सांगतो की हे चंचल मन ताब्यात आणणे हे वार्‍याला मोट बांधण्याएवढे कठीण काम आहे.

चंचलं हि मनः कृष्ण प्रमाधि बलवदृढम् |
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥

हे कृष्णा, हे मन मोठे चंचल, क्षोभविणारे, मोठे दृढ आणि बलवान आहे. त्यामुळे त्याला वश करणे हे मी वार्‍याला अडवण्यासारखेच अत्यंत कठीण समजतो.
हा अर्जुन म्हणजे चित्तएकाग्रतेचा आदर्श आहे. लहानपणी त्याला वृक्षावर बसलेल्या पोपटाचा फक्त डोळा दिसला आणि नंतर द्रौपदी स्वयंवराच्या वेळी वर फिरणार्‍या माशाच्या डोळ्याचे त्याने अचूक शिरसंधान केले आणि तेदेखील खाली उकळत्या तेलात बघून. अलौकिक चित्तएकाग्रता आहे ही.

आणि आपण? साधे पाच सेकंद चित्त एकाग्र करू शकत नाही. त्यासाठी विविध साधना आहेत. त्यातील एक म्हणजे मूर्तिपूजा.
पू. पांडुरंगशास्त्री आठवलेंच्या मूर्तिपूजेवरील प्रवचनांतून आपण ती समजून घेत आहोत. आम्ही मागच्या वेळी विचार केला तेव्हा समजले की चित्तएकाग्रतेसाठी पाच तत्त्वे आवश्यक आहेत –
सेवा- स्वाध्याय- संयम- सत्य आणि साधना.
यातील सेवा व स्वाध्याय यांवर आम्ही विचार केला आहे. योगसाधकांनी या विषयावर चिंतन केलेच असेल. अभ्यास व चिंतन केले तरच विषय व्यवस्थित समजतो व पुढील तत्त्वज्ञान समजणे सोपे होते. नाहीतर आमचे गुरुजी म्हणत होते तसे…* नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारें’… असे व्हायला नको.

३. संयम – मानवी जीवनात पदोपदी संयम आवश्यक आहे. विश्‍वांत चौफेर नजर फिरवली तर लगेच लक्षात येईल की प्रत्येक क्षेत्रात- वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक- संयम कुठेच दिसत नाही. आज माणसाची परिस्थिती अगदी भयानक त्याच्यामुळेच झालेली आहे. परिस्थिती आज विनाशाच्या मार्गावर आहे.
योगसाधनेमध्ये मुख्यतः चार गोष्टी आवश्यक आहेत ः आहार- विहार- आचार- विचार. चारही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. विचार जरी शेवटी असला तरी त्याचे स्थान मानवी जीवनात प्रथम. कारण विचार व्यवस्थित असले तरच इतर तीन योग्यरीत्या होणार.

आहार-विहाराबद्दल श्रीकृष्णभगवान अर्जुनाला काय सांगतात ते पाहूया-
आत्मसंयमयोगात-
युक्ताहारविहारस्य मुक्तचेष्टस्य कर्मसु|
युक्तस्वप्नावबोधस्व योगो भवति दुःखहा॥

– दुःखाचा नाश करणारा ‘योग’ हा यथायोग्य आहार- विहार करणार्‍याला, कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणार्‍याला आणि झोपणे व जागणे ज्यांचे यथायोग्य आहेत, त्यालाच साध्य होतो.

प्रत्येकाने आपले स्वतःचे जीवन जवळून पहावे. लगेच कळेल की आपल्या जीवनात सहसा ताळतंत्र नसते. जास्त करून जिथे इंद्रियांचे व्यवहार असतात तिथे- मग ती ज्ञानेंद्रिये असो अथवा कर्मेंद्रिये असोत, अर्थात अपवाद असणारच.

प्रथम आहाराबद्दल विचार केला तर कळेल की आपण योग्य आचरण करतच नाही. त्याबद्दल प्रचंड अज्ञान बहुतेकांमध्ये आहे. तथाकथित सुशिक्षित विद्वानांमध्येसुद्धा! मानवाच्या शरीररचनेनुसार योग्य असलेला शाकाहार करावा की जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मांसाहार करावा याबद्दल विचारच नाही. त्याशिवाय इतर अनेक मुद्दे आहेतच- केव्हा, किती, कसे… खावे?
खरे म्हणजे सूज्ञ माणसाने व्यसनांच्या आहारी जाऊ नये. मुख्यत्वे दारु पिऊ नये. पण ‘सोशल ड्रिंकिंग’च्या नावाखाली कित्येकजण दारू पितात. खरे म्हणजे ‘सूरा’ ही ‘असूरां’नी प्यायची असते. सज्जनाने नव्हे! पण आज दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे जवळजवळ प्रत्येक समारंभामध्ये दारू ही असतेच आणि जो दारू पित नाही त्याची मस्करी केली जाते. त्याला सामाजिक प्रतिष्ठा दिली जात नाही.
झोप तर विचारूच नका. तिच्यावरसुद्धा नियंत्रण नाही. किती वेळ झोपतो, केव्हा झोपतो, केव्हा उठतो…! खरें म्हणजे लवकर झोपून प्रातःकाळी म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठणे प्रत्येकाच्या हिताचे आहे- सकाळी ३.३० ते ५.००वा. दरम्यान ध्यान- धारणा, पूजाअर्चा…त्यावेळी करायची असते. योगशास्त्राप्रमाणे त्यावेळी अगदी छान कंपने असतात. सर्वत्र शांतता असते. त्याशिवाय विविध कामे सुरळीत होतात. कारण वेळ पुष्कळ असतो. घाई नसते. एकदा असे उठण्याची सवय झाली की त्यावेळी उठण्याचा आनंद काही औरच असतो. त्याचे व्यसनच लागते.

पशुपक्षी.. सृष्टीकडे नजर फिरवली तर कळेल की तेदेखील तसेच प्रातःकाळी उठतात. अर्थात थोडी जनावरे सोडून.. वाघ, सिंह, अस्वल, कोल्हे… ते तर निशाचरच आहेत.
सकाळी उठून जर योगसाधना- आसने, प्राणायाम, ध्यान केले तर आरोग्यदेखील चांगले राहते.
सूज्ञ व्यक्ती श्रीकृष्णांनी काय सांगितले त्याचा अभ्यास करून त्यावर चिंतन करून नक्की आचरणात आणतील.
सारांश काय तर ‘संयम’ चित्तएकाग्रतेसाठी अत्यंत आवश्यक आहे.
४. सत्य – हा तर पतंजलीयोग (अष्टांगयोग) यामध्ये दुसरा यम (व्यक्ती व समाजासाठी सद्वर्तनाचे आदेश) आहे. शास्त्रकार सत्याची व्याख्या करतात ती अशी.
* ‘सते हितम् सत्यम्’.
– जे सत् ईश्‍वराकडे घेऊन जाते ते सत्य. आपण म्हणतोदेखील * सत्यमेव जयते*. पण तसे वागणे तेवढे सोपे नाही. सत्य मार्गाने जाणार्‍याला पुष्कळ सामर्थ्य, आत्मशक्ती लागते. म्हणून तेच शास्त्रकार पुढे म्हणतात- ‘सत्य सामर्थ्यमेव जयते’.
भारतीय संस्कृतीत अनेक उदाहरणे या विषयावर आहेत. सर्वांना परिचित असलेले म्हणजे सत्यवादी राजा हरिश्‍चंद्र.

विश्‍वामित्राला स्वप्नात दिलेले वचन पाळण्याासठी अनेक हाल सोसूनदेखील तो सत्यापासून ढळला नाही आणि मुख्य म्हणजे त्याची पत्नी तारामती व छोटा मुलगा रोहिदास यांनीसुद्धा त्याला साजेशी साथ दिली.
धन्य आहे ते कुटुंब. कुठे गेले ते आदर्श? ती संस्कृती?
आज अनेक जण थोड्याशा भौतिक फायद्यासाठी खोटे बोलतात. कोर्टात तर धार्मिक ग्रंथावर हात ठेवून शपथ घेतात – ‘मी सत्यच बोलेन. सत्याशिवाय अन्य काहीच बोलणार नाही’. पण दुःखाची गोष्ट अशी की केस जिंकण्यासाठी त्यांना खोटे बोलण्यास प्रवृत्त केले जाते. आणि आपले राजकारणी? ते कसे वागतात हे तर सगळ्यांनाच माहीत आहे.
खरे म्हणजे त्यांना कशाला दोष द्यायचा? असत्याचरण सर्वच क्षेत्रात दिसते. समाजाच्या अधोगतीची ही लक्षणे आहेत.

भगवंताला तर ‘सत्यं शिवं सुंदरम्’ म्हणतात. प्रत्येकाचा विचार, वाणी व व्यवहार सत्यच असायला हवा. अशी व्यक्ती निर्धास्त व शांत असते. त्यामुळे चित्तएकाग्रता सहज व सोपी होते. अन्यथा मनात एक धुगधुग असते, चिंता असते.
प्रत्येक व्यक्तीने, विशेष करून योगसाधकाने मनावर संयम ठेवून सत्याच्या मार्गाने जावे. त्यामुळे सर्वांचे कल्याण होईल… स्वतःचे- कुटुंबाचे- समाजाचे- देशाचे- विश्‍वाचे. मला खात्री आहे की सर्वजण असे करतीलच. कारण आता आम्हाला जीवनविकासाची ओढ लागलेली आहे.