इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) एटीकेची सोमवारी येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध लढत होईल. बाद फेरीची चुरस शिगेला पोचली असल्यामुळे यापुढे कामगिरीत घसरण होऊ देणे प्रमुख संघांना परवडणार नाही. त्यामुळे आगेकूच कायम राखण्याचा एटीकेचा प्रयत्न असेल.
नॉर्थईस्टचा संघ सातत्यासाठी झगडतो आहे. एटीके तिसर्या क्रमांकावर आहे. ते एफसी गोवापेक्षा तीन, तर बंगळुरू एफसीपेक्षा एका गुणाने मागे आहे. गोव्यावरील विजयामुळे एटीकेचे मनोधैर्य उंचावले आहे. नॉर्थईस्ट मात्र नवव्या क्रमांकावर घसरला असून त्यांना सात सामन्यांत विजय मिळविता आलेला नाही. एटीकेची घरच्या मैदानावरील यंदाची कामगिरी भक्कम झाली आहे. त्यांनी १८ पैकी १३ गुण कमावले आहेत. त्यामुळे नॉर्थईस्टविरुद्ध निर्णायक विजयासाठी त्यांचे पारडे जड असेल. नॉर्थईस्टला बाहेरील मैदानांवरील सामन्यांत (अवे मॅचेस) केवळ तीन गोल करता आले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोरील आव्हान अशक्यप्राय वाटते. रॉय कृष्णा हा एटीकेचा प्रमुख स्ट्रायकर असून त्याने आतापर्यंत आठ गोल केले आहेत. थेट खेळ आणि सहकार्यांना सामावून घेण्याची वृत्ती यामुळे अँटोनिओ हबास यांच्या संघाला चांगला फायदा झाला आहे.
गेल्या चार सामन्यांत तो गोल करू शकलेला नाही, पण त्याने सहकारी खेळाडूंना असिस्ट केले आहे. आता ही आकडेवारी सुधारण्याचा त्याचा प्रयत्न असेल. नॉर्थईस्टविरुद्ध त्याने याआधीच्या लढतीत दोन केले होते. नॉर्थईस्टला आज विजय मिळविता आला नाही तर बाद फेरीच्या त्यांच्या आशांना फार मोठा धक्का बसेल.नॉर्थईस्टला बाहेरील सामन्यांत गोल करण्यासाठी झगडावे लागले आहे. त्यामुळे नवा खेळाडू अँडी किऑग आपले दैव पालटेल अशी त्यांना आशा असेल. अँडी हा अत्यंत अनुभवी स्ट्रायकर असून त्याला प्रिमीयर लिगचा अनुभव आहे. जायबंदी असामोह ग्यान याची जागा त्याने भरून काढण्याची गरज आहे. नॉर्थईस्टने मध्य फळीतील सायमन लुंडेवाल यालाही करारबद्ध केले आहे. या लढतीसाठी मात्र तो उपलब्ध असण्याची अपेक्षा नाही. फेडेरिको गॅलेगो आणि मार्टिन चॅव्हेज अशा खेळाडूंना सातत्य राखण्याची गरज आहे. चिवट बचावफळीविरुद्ध अँडीला पुरेशी साथ मिळेल याची जबाबदारी त्यांच्यावर असून त्यांना ती पार पाडावी लागेल