प्रजासत्ताकाची ‘सत्तरी’

0
220

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट

या सार्‍या परिस्थितीची नोंद घेऊन अशा दृष्ट, विकृत व विध्वंसक वृत्तीबद्दल चिड निर्माण होऊन त्याचा बिमोड केला पाहिजे. पारिपत्य केले पाहिजे. राष्ट्रीय मूल्यांना हानीकारक असे वर्तन करू न देणे, देशाच्या साधन-संपत्तीचे, सार्वजनिक मालमत्तेचे, राष्ट्रीय व ऐतिहासिक स्मारकांचे, प्रार्थना मंदिरांचे संरक्षण व जतन करणे आज खूपच गरजेचे बनले आहे; अन्यथा देशातील धार्मिक व जातीय सलोखा टिकवून ठेवणे कठीण होईल.

आज दि. २६ जानेवारी २०२० रोजी आपण आपल्या भारतमातेचा सत्तरावा प्रजासत्ताकदिन साजरा करीत आहोत!
ब्रिटिश वसाहतवादाच्या शृंखलांतून भारतमाता दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी मुक्त झाली. भारतमातेच्या मुलांनी हौतात्म्य पत्करत आपल्या मातेच्या हातातील पारतंत्र्याच्या शृंखला तोडून टाकण्यात यश मिळवले. ब्रिटिशांनी आपल्या भारत देशावर अंमल बजावण्यापूर्वी राजे-महाराजे, संस्थानिक, जहागिरदार यांचेच साम्राज्य होते. राजे-महाराजे, जहागिरदार, संस्थानिक यांच्या मर्जीप्रमाणे आणि लहरीप्रमाणे राज्याचा किंवा जहागिरीचा कारभार चालत असे. ब्रिटिशांचा या देशात अंमल सुरू झाल्यावरही, त्यांना आपले मिंधे बनवण्यासाठी अनुकूल असे विविध कायदे-कानून ब्रिटिशांनी केले. त्यांना आपले मंडलिक करून टाकले. तत्पूर्वीही शक, कुषाण, मोंगल यांसारख्या परकीयांनी आपल्या खंडप्राय देशावर स्वारी करून येथे राज्य केले. परंतु येथील तत्कालीन हर्षवर्धन, शिवाजीमहाराज यांसारख्या राजे-महाराजांनी त्यांच्या आक्रमणांना योग्य उत्तर दिले होते याचा आम्हा सर्वांस आजही अभिमान वाटावयास हवा!

ब्रिटिशांना हा भारत देश सोडून जाण्यास भाग पाडल्यानंतर या देशाचा राज्यकारभार सुरळीत चालावा यासाठी पूर्वीपासूनच प्रयत्न करणे आवश्यक होते. आणि ही आवश्यकता ध्यानात घेऊनच स्वतंत्र भारताचा कारभार भारतीय जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून चालावा यासाठी देशाला स्वतःची राज्यघटना असणे गरजेचे आहे याची जाणीवही त्यावेळच्या अर्ध्वयूना होती. त्या दृष्टिकोनातून इ.स. १९२८ मध्ये राष्ट्रीय सभेने नेमलेल्या एका समितीने स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार केली होती. तिला ‘स्वराज्य राज्यघटना’ असे नाव देण्यात आले होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पं. जवाहरलाल नेहरू यांचे वडील कै. मोतिलाल नेहरू हे या समितीचे अध्यक्ष होते. स्व. महात्मा गांधीनी दि. १९ नोव्हेंबर १९३१ च्या ‘हरिजन’च्या अंकात स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे महत्त्व विशद केले होते. इ.स. १९३६ मध्ये फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते आणि या अधिवेशनात ‘आपला भारत देश स्वतंत्र झाल्यावर एक घटना समिती स्थापून स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करावी’ असा ठराव संमत करण्यात आला होता.

जागतिक स्तरावर दुसरे महायुद्ध पेटले होते. या युद्धानंतर ब्रिटिशांनी भारत देश सोडण्याचा विचार चालवला होता. याची कल्पना भारतीय नेत्यांना होती. स्वातंत्र्य दारात आले आहे याची जाणीव होताच देशाची राज्यघटना तयार करण्याची गरज भासू लागली होती. त्यामुळे दि. १ डिसेंबर १९४६ रोजी नवी दिल्लीतील संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात या घटनापरिषदेची बैठक झाली. देशाच्या विविध प्रांतांतील कायदे मंडळांकडून अप्रत्यक्षरीत्या निवडले गेलेले प्रतिनिधी या परिषदेचे सभासद होते. परिषदेच्या बहुतेक सर्व बैठका संसद भवनाच्या या मध्यवर्ती सभागृहात आयोजित केल्या जायच्या.

दि. ११ डिसेंबर १९४६ रोजी घटना परिषदेने स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज नक्की केला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पै. जिन्हा यांच्या नेतृत्वाखालील मुस्लीम लिगचा अडसर दूर झाला होता, त्यामुळे परिषदेच्या कामाला गती आली. परिषदेने दि. १४ जुलै १९४७ रोजी एका ठरावाद्वारे परिषदेचे सल्लागार कै. बेनेगल नरसिंह राव यांना राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यास सांगितले असता त्यांनी तो ऑक्टोबर १९४७ मध्ये तयार केला. घटनेच्या या मसुद्यामध्ये २४० अनुच्छेद व १३ परिच्छेद होते. घटना परिषदेच्या या मसुद्यावर विचारविनिमय करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सातजणांची एक समिती गठित करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने दि. २२ ऑक्टोबर १९४७ पासून सतत बेचाळीस दिवस बैठका घेतल्या आणि मसुद्याचा सांगोपांग विचार करून हा मसुदा निश्‍चित करण्यात आला. पुढे मग मसुदा समितीतर्फे निश्‍चित करण्यात आलेला सदर मसुदा दि. २७ फेब्रुवारी १९४८ रोजी घटना परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सादर केला. मसुदा हाती पडताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. ४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटनापरिषदेत चर्चेसाठी हा मसुदा ठेवला. सुरुवातीचे पहिले पाच दिवस मसुद्यावर सर्वसाधारण चर्चा झाली. त्यानंतर दि. १४ नोव्हेंबर १९४८ पासून मसुद्यातील प्रत्येक कलमावर चर्चा करण्यात आली. ही प्रदीर्घ चर्चा दि. १७ ऑक्टोबर १९४९ रोजी संपली. त्यानंतर घटनापरिषदेने सुचविलेल्या सर्व दुरुस्त्यांसह हा मसुदा पुन्हा मसुदा समितीकडे विचारार्थ पाठविण्यात आला.

घटना समितीने सर्व दुरुस्त्यांचा पुनर्विचार करून नवीन मसुदा घटना परिषदेच्या अध्यक्षांकडे दि. ३ नोव्हेंबर १९४९ रोजी पाठविला. तद्नंतर पुढील तीन दिवस घटनापरिषदेने त्यावर सविस्तर व सखोल चर्चा केली. दि. १७ नोव्हेंबर १९४९ रोजी घटनापरिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘ही राज्यघटना घटनापरिषदेने मंजूर करावी’ असा ठराव घटनापरिषदेच्या बैठकीत मांडला असता त्यावर दि. २५ नोव्हेंबर १९४९ पर्यंत पुन्हा चर्चा झाली. दुसर्‍या दिवशी म्हणजे दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना परिषदेच्या बैठकीत चर्चेला उत्तर दिले व त्याच दिवशी या ठरावावर मतदान घेण्यात आले आणि हा ठराव टाळ्यांच्या गजरात घटनापरिषदेने कोणत्याही विरोधाशिवाय मंजूर केला. आपल्या भारत देशाची राज्यघटना संमत करून घेण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोलाचे होते.
घटना परिषदेचे कार्य दि. १ डिसेंबर १९४६ रोजी सुरू होऊन दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण झाले. घटनापरिषदेच्या सदस्यांच्या एकूण १६५ दिवस बैठका होऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. घटनापरिषदेने संमत केलेल्या घटनेतील २४० अनुच्छेद, १३ परिच्छेद व ७६३५ दुरुस्त्यांवर विचारविनिमय केला. घटनापरिषदेने मंजूर केलेली राज्यघटना दि. २६ जानेवारी १९५० पासून अमलात आणली गेली आणि भारतीय नागरिकांसाठी वसाहतवादी ब्रिटिशांनी लागू केलेले कायदे-कानून व त्यांची भारतातील जुलमी सत्ता कायमची संपुष्टात आली.

जोपर्यंत आपल्या देशाची स्वतःची अशी राज्यघटना नव्हती तोपर्यंत आपल्या भारतदेशाला ब्रिटनच्या संसदेने संमत केलेल्या कायद्याप्रमाणे देशाचा राज्यकारभार हाकावा लागत होता. म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळूनदेखील स्वतंत्र भारताला माऊंटबॅटनसारखा ब्रिटिश गव्हर्नर खपवून घ्यावा लागला.
भारत देशाचा राज्यकारभार भारतीय नागरिकांनी चालवावा हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून भारताची राज्यघटना तयार करण्यात आली होती. पण अधिकृतरीत्या ती दि. २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारण्यात आली आणि आपला भारत देश सर्वार्थाने प्रजासत्ताक बनला.

परंतु भारतदेशाची घटना दि. २६ जानेवारीलाच का स्वीकारली गेली? त्यापूर्वी देशाला प्रजासत्ताक म्हणून का घोषित केले नाही? यामागेसुद्धा एका मोठ्या इतिहासाची पार्श्‍वभूमी आहे.
इ.स. १९२९ मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन पं. जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते. भारताचे तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी वसाहतीअंतर्गत स्वराज्य देण्याचे मान्य केले होते. त्यावर लाहोर येथे भरलेल्या या अधिवेशनात चर्चा झाली असता जुन्या पुढार्‍यांनी व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विनच्या निर्णयाला अनुकूलता दाखवली. पण तरुण पुढार्‍यांना ते मान्य नव्हते. पूर्ण विचारांती चर्चेच्या अखेरीस संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आला व दि. २६ जानेवारी १९३० हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून निश्‍चित करण्यात आला. दि. ३१ डिसेंबर १९२९ च्या मध्यरात्री पं. जवाहरलाल नेहरूनी मध्यभागी चरखा असलेला तिरंगा रावी नदीच्या किनार्‍यावर फडकविला. दि. २६ जानेवारी १९३० रोजी भारतीय नागरिकांनी भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून जागोजागी चरखायुक्त तिरंगा फडकविला. यावर प्रशासनाने क्रूरपणे भारतीय नागरिकांच्या भावनांवर आणि स्वातंत्र्याच्या ऊर्मीवर वरवंटा फिरवण्याचं दुष्कृत्य केलं. पण भारतीय नागरिक त्यासही धैर्याने आणि निर्भयपणे सामोरे गेले.

दि. २६ जानेवारी १९३० या दिवशी भारतीय नागरिकांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा उच्चार केला होता. त्यापूर्वी ब्रिटिश वसाहतीअंतर्गत स्वातंत्र्य स्वीकारण्यास भारतदेशातील जुने नेते व काही भारतीय नागरिक तयार होते. नाही म्हटले तरी ही एक प्रकारची क्रांतीच होती. यास्तव या दिवसाची स्मृती म्हणून दि. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संघराज्याची घटना स्वीकारून भारत हा प्रजासत्ताक देश म्हणून घोषणा केली.
भारत देशाचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी उपाख्य राजाजी यांनी आपल्याकडील सूत्रे या स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे दि. २६ जानेवारी १९५० रोजी सुपूर्द केली.

आपल्या भारत देशाच्या राज्यघटनेनुसार भारतीय संसदेसाठी लोकशाही पद्धतीने इ.स. १९५१ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. इ.स. १९५२ साली डॉ. राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून अप्रत्यक्ष निवड झाली.
आपला भारत देश स्वतंत्र झाला, प्रजासत्ताक झाला. परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत भाषावाद, प्रांतवाद, दहशतवाद, धार्मिक-जातीय- सांस्कृतिक कलह यांसारख्या बाबीमुळे आपलेच लोक स्वकीयांची पिळवणूक व छळ करीत असल्याचे दृश्य सर्रासपणे पाहावयास मिळते. देशातील विकृत व विध्वंसक शक्तींच्या छाया सर्वसामान्य माणसाच्या मनावर पडलेल्या दिसतात. त्यामुळे जीवनाची व जगण्याची निश्‍चिती बेभरवशाची झाली आहे. स्वार्थ, भ्रष्टाचार, लाचलुचपत यांना मर्यादा राहिलेली नाही. भ्रष्टाचार तर वरिष्ठांपासून शिपायापर्यंत झिरपतो आहे. राष्ट्रीय मालमत्ता, स्मारके यांची मोडतोड आणि नासधूस करण्याचे प्रमाणही वाढले आहे.

या सार्‍या परिस्थितीची नोंद घेऊन अशा दृष्ट, विकृत व विध्वंसक वृत्तीबद्दल चिड निर्माण होऊन त्याचा बिमोड केला पाहिजे. पारिपत्य केले पाहिजे. राष्ट्रीय मूल्यांना हानीकारक असे वर्तन करू न देणे, देशाच्या साधन-संपत्तीचे, सार्वजनिक मालमत्तेचे, राष्ट्रीय व ऐतिहासिक स्मारकांचे, प्रार्थना मंदिरांचे संरक्षण व जतन करणे आज खूपच गरजेचे बनले आहे; अन्यथा देशातील धार्मिक व जातीय सलोखा टिकवून ठेवणे कठीण होईल.
देशाच्या संकटकाळी, मग ते संकट राष्ट्रीय असो वा नैसर्गिक आपत्ती असो, सर्वांना एकत्र येऊन सर्वतोपरी सामना केला पाहिजे. वाढती लोकसंख्या, जातीयता, अंधश्रद्धा, प्रदूषण यांसारख्या देशहिताला बाधक अशा बाबींचा अभ्यास करून त्या सोडवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आपला देश, आपला समाज, आपली संस्कृती, परंपरा, चालीरीती, निसर्ग, इतिहास, साहित्य, कला, राष्ट्रीय प्रतिके, आपले देशबांधव यांचे रक्षण करण्यासाठी व स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक राष्ट्रभक्तांनी, क्रांतिकारकांनी व थोर नेत्यांनी आत्मबलिदान केले, हौतात्म्य स्वीकारले हे आपण सर्वांनी जाणून घेतले पाहिजे.

आपल्या या प्रजासत्ताक देशात गंगा, सिंधू, यमुना, ब्रह्मपुत्रा, कावेरी, नर्मदा, कृष्णा यांसारख्या अनेक नद्या शतकानुशतके वाहून आपल्या देशाला सुजलाम्, सुफलाम् करीत आल्या आहेत. हिमालयासारखा पर्वत देशाचा पाठीराखा म्हणून उभा आहे. हिन्दी महासागर, बंगालचा उपसागर देशाचे चरणस्पर्श करीत आहेत. केवळ या भौगोलिक सीमांनी बंदिस्त झालेला भाग म्हणजे आपला भारत देश नसून या देशातील माणसांच्या आपुलकीच्या बंधांनी एकत्र जोडलेला हा देश आहे. इथल्या चराचरावर या देशातील माणसांचे प्रेम आहे. या देशाचा त्याला अभिमान वाटतो. कुठल्याही देशातील माणसांची अशी भावना असणे हे त्या देशाचे सामर्थ्य असते.

आपली भारतीय संस्कृती फार प्राचीन आहे. भारतीय संस्कृतीने हिन्दू, मुसलमान, शीख, ख्रिश्‍चन, पारसी, बहाई आदी धमाच्या व जाती-पर्ंथांंच्या लोकांना आपल्यात सामावून घेतले आहे. नृत्य, नाट्य, साहित्य, कला यांना भारतीय संस्कृतीत उच्च स्थान आहे. जन्मभूमीला श्रेष्ठ मानणारी आपली संस्कृती आणि परंपरा आहे.

ब्रिटिशांच्या वसाहतवादातून आणि परकीय आक्रमणातून भारत देशाची सुटका व्हावी यासाठी छत्रपती शिवाजीमहाराज, झांशीची राणी लक्ष्मीबाई, वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, वासुदेव बळवंत फडके, ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’ अशी गर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांनी जे अथक प्रयत्न केले, हौतात्म्य पत्करले, त्यांचे भारत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान कुणालाही विसरता येणार नाही.
तसेच आपली राष्ट्रीय प्रतिके म्हणजे प्रामुख्याने आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्रगीत! राष्ट्रध्वज देशातील प्रत्येक माणसाच्या मनात एकात्मतेची व देशभक्तीची भावना निर्माण करतो, तर राष्ट्रगीतातून राष्ट्रीय एकात्मतेचा व सहिष्णूतेचा संदेश मिळतो!
आपला भारत देश दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. आपण आपली राज्यघटना निर्माण केली. दि. २६ जानेवारी १९५० रोजी आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. आपण लोकशाही शासनप्रणालीचा स्वीकार केला. लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य! लोकशाही शासनप्रणालीचा स्वीकार केल्यानंतर गुप्त मतदान मदतीने सरकार निवडीचा अधिकार भारतीय जनतेला मिळाला. भारतीय निवडणूक आयोगाकडून या निवडणुका घेतल्या जातात.

गेल्या सत्तर वर्षांच्या कालखंडात आपल्या प्रजासत्ताक देशाने आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक क्षेत्रांत आपण जी उंच भरारी घेतली त्याचे आजही जगभर कौतुक होत आहे.
प्रजासत्ताकदिन भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताची राजधानी नवी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाले की पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. तत्पूर्वी पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहतात. त्यानंतर राजपथावर होणार्‍या कार्यक्रमात भारतातील सर्व राज्ये सहभागी होतात. भारताच्या सर्व क्षेत्रांतील वैभवाचे आणि प्रगतीचे दर्शन घडविणारे रथ आणि सांस्कृतिक पथके यावेळी निघणार्‍या मिरवणुकीत भाग घेतात.

प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात आणि गावागावांत प्रजासत्ताकदिन साजरा केला जातो. शाळा-महाविद्यालयांतून, शासकीय कार्यालयांतून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य कार्यक्रम होतात. सर्व ठिकाणी शाळा-कॉलेजमधील छात्रसैनिक व पोलीस ध्वजास मानवंदना देतात. ध्वजवंदन होताच प्रत्येकजण ताठ मानेने उभा राहून राष्ट्रगीत सामूहिकरीत्या एकसुरात म्हणतात. ठिकठिकाणी प्रभातफेर्‍या, भाषणे, प्रदर्शने यांचे आयोजन केले जाते. या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणार्‍या व्यक्तींचा व धाडशी मुलांचा आणि युवकांचा यथोचित मानसन्मान केला जातो. अनेक ठिकाणी इमारतीवर व इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी विद्युतरोषणाई केली जाते.

या दिवशी देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते. परंतु केवळ उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. वास्तविक पाहता हा प्रतिज्ञेचा दिवस लोकशाहीच्या उद्घोषाचा दिवस! प्रत्येक भारतीय नागरिकाने या महत्त्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे आणि त्यानुसार आपली वागणूक ठेवली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनातील राष्ट्रीय भावना व राष्ट्रप्रेम अधिक उसळून, उजळून निघेल याबद्दल कुणाच्या मनात संदेह असण्याचे कारण नाही!