एडिटर्स चॉइस
– परेश प्रभू
काही वेगळी, आतल्या गोटातली माहिती आपल्याला अशा पत्रकाराच्या पुस्तकातून वाचायला मिळेल अशी अपेक्षा असते, परंतु त्या बाबतीत हे पुस्तक निराशाच करते. मात्र, मोदींच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा आणि त्यातील बर्यावाईट गोष्टींची चिकित्सा या दृष्टीने पाहता हा एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरेल.
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी नावाचे एक वादळ घोंगावत आले आणि त्याने देशाच्या राजकारणाची दिशाच पालटून टाकली. त्या निवडणुकीतील मोदींच्या देदीप्यमान यशाची चिकित्सा अनेकांनी अनेक प्रकारे केली. पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी तेव्हा त्या निवडणुकीतील भाजपच्या देदीप्यमान यशामागील तांत्रिक सफाईचा आणि संघटनात्मक बांधणीचा खोलात जाऊन वेध घेणारे एक पुस्तक लिहिले, ज्याचा निखील वागळे यांनी नंतर मराठीतही अनुवाद केला होता. गेल्या वर्षी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा कस लागला. २०१९ च्या त्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकवार मोदींनी दिमाखदार यश संपादन केले. त्यामुळे मोदींच्या या दुसर्या यशाची चिकित्सा करणारे आणखी एक पुस्तक राजदीप सरदेसाई यांनी लिहिले, जे नुकतेच गोव्यासह विविध ठिकाणी हार्पर कॉलीन्सकडून प्रकाशित झाले, त्याचे नाव आहे ‘२०१९ हाऊ मोदी वॉन इंडिया.’
आधीच्या पुस्तकापेक्षा हे पुस्तक एका बाबतीत वेगळे आहे ते म्हणजे यामध्ये लेखकाचा भर प्रत्यक्ष निवडणूक काळातील नावीन्यपूर्ण प्रचारतंत्र किंवा पक्षाने अवलंबिलेल्या तांत्रिक वा संघटनात्मक बाबींवर नाही, जसा आधीच्या पुस्तकात होता. यामध्ये मुख्यतः मे २०१४ मधील मोदींच्या पंतप्रधानपदीच्या शपथविधीनंतरच्या पाच वर्षांच्या कालखंडातील चढउतारांची चिकित्सा आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक येईपर्यंत मोदींच्या वाटचालीचा एका परीने हा आढावा आहे आणि शेवटी ही निवडणूक त्यांनी कशी जिंकली यासंबंधीचे आपले निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे. २०१४ ची निवडणूक २०१९ च्या तुलनेत मोदींसाठी सोपी होती, कारण तेव्हा तत्कालीन यूपीए सरकारच्या आणि त्यातील मोकाट भ्रष्टाचाराच्या विरोधात निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा मोदींना मिळाला होता, परंतु २०१९ मध्ये ती परिस्थिती नव्हती. अँटी इन्कम्बन्सीपेक्षा प्रो इन्कम्बन्सी लाट तयार करणे कठीण असते. त्यामुळे हे मोदी – शहा आणि भाजपने कसे साधले या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे. आपण ही सारी चिकित्सा पूर्वग्रहविरहीत केली असल्याचा राजदीप यांचा दावा आहे, परंतु मुळात ते एक डाव्या विचारांचे पत्रकार आहेत आणि एकेकाळी मोदींच्या विरोधात एकेकाळी रान पेटवणार्यांत ते आघाडीवर होते हे वाचक विसरणे शक्य नाही.
मोदींच्या मॅडिसन स्क्वेअरमधील गाजलेल्या भाषणावेळी वार्तांकन करीत असताना आपल्याला मोदीभक्तांकडून कशी गैरवागणूक दिली गेली तेथून या पुस्तकाची सुरुवात होते.
मोदींच्या देदीप्यमान विजयास ‘मोदी – (वोटिंग) मशीन – मीडिया – मनी’असे चार ‘एम’ कारणीभूत असल्याची कुत्सित प्रतिक्रिया योगेंद्र यादव यांनी व्यक्त केली होती. राजदीप त्याला आणखी काही ‘एम’ जोडतात. ‘मेसेजिंग – मार्केटिंंग – मोबाईल – मिडल क्लास – मिलेनियमर्स – (अँटी) मुस्लीम – मेजॉरिटीअनिझम – मस्न्युलर नॅशनलिझम – मसुद अझर – महागठबंधन’ अशी ही ‘एम’ची यादी त्यांनी वाढवत नेली आहे. त्याच्या जोडीला दोन ‘डब्ल्यू’ म्हणजे वेल्फेअरीझम आणि व्हॉटस्ऍपही त्यांनी जोडले आहेत. शिवाय यावेळची निवडणूक मोदींनी ‘गरीब किसान’ या शब्दांशी कशी जोडली तेही राजदीप यांनी सांगितले आहे. पुस्तकाच्या प्रास्ताविकातच या सगळ्या कारणांची जंत्री त्यांनी दिलेली असल्याने पुढे काय वाचायला मिळेल त्याची चाहुल मिळते.
निवडणूक काळामध्ये राहुल गांधी यांनी इंडिया टुडेसारख्या देशातील बड्या माध्यमसमूहाशी ठरलेली मुलाखत केवळ त्या साप्ताहिकात आपले रागीट छायाचित्र मुखपृष्ठावर छापले गेले म्हणून ऐनवेळी कशी रद्द केली त्याचा किस्सा राजदीप यांनी एके ठिकाणी नमूद केला आहे.
मोदींचे गुजरातमधील प्रतिस्पर्धी संघप्रचारक संजय जोशी याच्या वाढदिवसाची पोस्टर्स श्रीपाद नाईक यांच्या कार्यालयातील नितीन सरदारे नामक कर्मचार्याने दिल्लीत लावली म्हणून त्याला कसे घरी पाठवले गेले तो किस्साही राजदीप यांनी या पुस्तकात नमूद केला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार असल्याचा एक फायदा म्हणजे सामान्य वाचकांना ज्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा परवाना जणू अशा व्यक्तींना प्राप्त झालेला असतो. त्यामुळे काही वेगळी, आतल्या गोटातली माहिती आपल्याला अशा पत्रकाराच्या पुस्तकातून वाचायला मिळेल अशी अपेक्षा असते, परंतु त्या बाबतीत हे पुस्तक निराशाच करते. मात्र, मोदींच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा आणि त्यातील बर्यावाईट गोष्टींची चिकित्सा या दृष्टीने पाहता हा एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरेल. मोदींनी पाच वर्षांत राबवलेल्या उज्ज्वला, जनधन, मुद्रा, स्वच्छ भारत, आवास योजना, आयुष्मान भारत आदी मूलभूत कल्याणयोजनांतून त्यांनी एकेकाळचा शेटजी – भटजींचा मानला जाणारा भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवल्याची कबुली राजदीप यांनी दिली आहे. मनमोहनसिंग यांच्या यूपीए सरकारच्या काळातही अशा योजना राबवण्यात आल्या होत्या, परंतु कॉंग्रेसला त्याचे मार्केटिंग करता आले नाही असे राजदीप लिहितात. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने १७.१ कोटी मते मिळवली होती, ती २०१९ च्या निवडणुकीत २२.६ कोटींवर पोहोचल्याचेही त्यांना नमूद करावे लागले आहे. मात्र, बालाकोट हा या निवडणुकीत मोदींना लाभलेला ‘एक्स फॅक्टर’ असल्याचा निष्कर्ष राजदीप यांनी काढला आहे. अर्थात, हे सर्वमान्यच आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर सत्तावीस हजार कोटी रुपये खर्च झाले व त्यापैकी ४५ टक्के रक्कम एकट्या भाजपकडून खर्च झाली या मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांच्या विधानाचा संदर्भही एके ठिकाणी येतो. निवडणूक हा शेवटी मने काबीज करण्याचा खेळ असतो (टू कॅप्चर माईंडस्पेस) असे एक वेधक वाक्य एके ठिकाणी आले आहे. एकंदरीत भाजपने उपरोल्लेखित गोष्टींचा वापर करून निवडणुकीत मतदारांची मने जिंकली असे लेखकाला म्हणायचे आहे. कॉंग्रेसनेही त्या निवडणुकीत काही घोडचुका केल्या, ज्या भाजपच्या पथ्थ्यावर पडल्या. विशेषतः काश्मीरमधून लष्कराच्या विशेषाधिकारांचा कायदा हटवण्याची केलेली मागणी किंवा काश्मीरसंदर्भात, पाकिस्तानवरील कारवाईसंदर्भात घेतलेली भूमिका मतदारांत चुकीचा संदेश देऊन गेली याचाही उल्लेख राजदीप यांनी केला आहे, अर्थात, ते तर उघडच आहे.
आपल्या मूळ भूमिकेस अनुसरून नरेंद्र मोदींवर ‘नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी कल्ट’ चा आरोप सरदेसाई करतात. त्यांच्या कार्यकाळात ‘लेस स्पेस फॉर डिसेन्ट’ ची तक्रारही पुस्तकात ऐकू येते. प्रत्येक गोष्टीला ‘इव्हेंट’ बनवण्याच्या मोदींच्या अट्टहासाने देशात एक नवे ‘स्पेक्टॅकल पॉलिटिक्स’ आणले असल्याचेही निरीक्षण राजदीप नोंदवतात. मात्र, मोदींच्या कार्यशैलीचे त्यांनीच दिलेले काही दाखलेही लक्षवेधी आहेत. २०१४ च्या विजयानंतर दिल्लीत विमानाने आगमन झालेल्या मोदींच्या स्वागताला पुष्पगुच्छांसह उभ्या असलेल्या नोकरशहांना ‘दोस्त, ये फुलोंसे कुछ नही होगा, मुझे आयडियाज चाहिए, ऍक्शन चाहिये’ असे मोदींनी सुनावल्याचा किस्सा रंजक आहे. शपथविधीनंतर लागलीच चार जूनला केंद्र सरकारमधील सर्व ७७ सचिवांची बैठक घेऊन स्वतःचा फोन नंबर, रॅक्स, ईमेल देऊन थेट कॉल करण्यास फर्मावून या सरकारमध्ये निर्णयप्रक्रियाही थेट असेल हे मोदींनी सूचित केल्याचे राजदीप सांगतात. कोणती फाईल कुठवर गेली आहे हे टॅबवर दाखवणारी ‘ई -समीक्षा’ सारखी तांत्रिक प्रणाली या सरकारमध्ये कशी वापरली जात आहे, एखादी फाईल एकाच ठिकाणी जास्त वेळ असल्याचे दिसल्यावर पंतप्रधानांकडून त्यावर लाल खूण कशी केली जाऊ शकते, दरमहा होणार्या मुख्य सचिवांच्या बैठकीत देशातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा कसा केला जातो, गोल्फ क्लबवर मौजमस्ती करणार्या वरिष्ठ अधिकार्यांचे सदस्यत्व कसे परस्पर रद्द केले गेले, भ्रष्टाचारी अधिकार्यांना कसे घरी पाठवले गेले, पंतप्रधान कार्यालयात व्हिजिटिंग कार्ड फडकावून पंतप्रधानांपर्यंत पोहोचणार्या उद्योगपतींचा तेथील प्रवेश कसा बंद झाला वगैरे मोदींच्या ‘नो नॉनसेन्स’ कार्यशैलीची झलकही या पुस्तकात दिसते. मात्र, या सार्याला मोदींच्या विजयाचे श्रेय देताना लेखक दिसत नाही. भाजपचे बुथ व्यवस्थापन, मतदारयादीतील प्रत्येकी साठ मतदारांमागे एक पान प्रमुख, त्यांच्यावर प्रत्येक बुथसाठी एक प्रभारी, पंधरा ते वीस बुथ सदस्यांच्या बुथ समित्या, दर पाच ते सहा बुथमागे एक शक्तिकेंद्र अशी बलाढ्य संघटनात्मक रचना आणि निवडणुकीच्या तब्बल दोन वर्षांआधीच सज्ज असलेली २३ मुद्दे युक्त कृतीयोजना प्रत्येक बुथ कार्यकर्त्यासाठी कशी तयार केली गेली होती, बुथ पातळीवर पाच ते सहा कार्यक्रम होतील हे कसे पाहिले गेले, विस्तारक योजना कशी राबवली यासारख्या गोष्टी भाजपच्या यशात वाटेकरी असल्याची कबुली मात्र ते देतात.
२०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुका देशाच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील आणि राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाचे असे टप्पे आहेत हे विसरून चालणार नाही. त्यामुळे या निवडणुकांतील यशापयशाची पुस्तकरूपाने नोंद ठेवली जाण्याची गरज होती. राजदीप सरदेसाई यांनी केलेल्या चिकित्सेबाबत, निष्कर्षांबाबत मतेमतांतरे असू शकतात, परंतु त्यांनी वरील गरजेची पूर्तता केली याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे!