थायरॉइड ग्रंथीची क्रिया बिघडते तेव्हा…

0
507
  • डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर
    (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय)

लहान मुलांमध्ये कावीळ (त्वचा व डोळे पिवळे होणे), तोंडाला सुज येणे, वाढ खुंटणे, यौवन उशिरा येणे, हालचाल मंद व संथ असणे, मानसिक विकास उशिरा होणे आणि इतर त्रास होतात. प्रयोगशाळेतील अहवालामध्ये टीएसएच वाढ़लेले आणि टी३ टी४ ह्यांचे प्रमाण कमी झालेले आढ़ळेल.

‘थायरॉइड ग्लँड’ ह्यालाच कंठग्रंथी, गलग्रंथी, अवटुग्रंथी, अवटुकाग्रंथी असेही म्हणतात. थायरॉइड ही ग्रंथी सर्व कणा असलेल्या प्राण्यांमध्ये गळ्याच्या पुढे, श्वासनलिकेच्या समोर व दोन्ही बाजुस असते. एखादे फुलपाखरू पंख पसरल्याप्रमाणे ती दिसते. शरिरातील विविध चयापचय क्रियांचे नियमन करण्यासाठी थायरॉइड ग्रंथीची महत्वपूर्ण भूमिका असते. तपकिरी-लाल रंगाचे व भरपुर प्रमाणात रक्तवाहिन्या असलेली अशी ही ग्रंथी. चांगल्या व दर्जेदार आवाजासाठी उपयुक्त अश्या नसासुद्धा थायरॉइड ग्रंथीतूनच जातात. थायरॉइड हे एंडोक्राईन ग्लँड (ग्रंथी जो स्वतःचे स्राव, हॉर्मोंस थेट रक्तात मिसळतो) आहे.

थायरॉइडचे रोग एकतर त्याची रचना बिघडवते किंवा त्याची क्रिया. शरिरामध्ये विविध हॉर्मोंन्स विशेषकरुन थायरॉइड हॉर्मोंन्सच्या स्रववण्याचे कार्य थायरॉइड ग्लँड करते.
थायरॉइड हे हॉर्मान तयार करण्यासाठी आयोडीनचा वापर करते. थायरोक्सीन (टी४) हे थायरॉइडद्वारे तयार केले जाणारे सर्वात पहिले हॉर्मोन आहे. थायरॉइड हॉर्मोन हे सम्पुर्ण शरीरावर काम करते.. जसे की चयापचयावर, शरीराची वाढ व विकास, तापमान यांवर.

बालपणात थायरॉइड हॉर्मोनची उचित मात्रा बुद्धीचा विकास घडविते. बाळाच्या जन्मानंतर, अवटुका ग्रंथीमधील टी४ हॉर्मोनचा काही भाग हा ट्रायआयड़ोथायरोनीन (टी३) हॉर्मोनमध्ये परिवर्तित होते जे रक्तातून शरीरातील ऊतक (बॉडी टिश्यू)मध्ये जाते आणि हे टी३ सर्वात सक्रिय होर्मोन आहे.
अवटुका ग्रंथीचे कार्य हे मेंदूतील अभिप्राय-यंत्रणेवर (फीडबॅक मेकॅनिझम) अवलंबून असते. त्यातील हॉर्मोंन्सची पातळी ज्यावेळी कमी होते त्यावेळी मेंदूतील हायपोथॅलेमस, हे थायरोट्रोपिन रीलीजींग हॉर्मोन (टी आर एच) तयार करते. हे टीआरएच, मेंदूच्या खालच्या बाजुस स्थित पीयुष ग्रंथी (पिट्युटरी ग्लेन्ड)ला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (टीएसएच) सोडायला भाग पाडते आणि हे टीएसएच, अवटुका ग्रंथीला टी४ सोडण्यास उत्तेजित करते. तसेच केल्सीटॉनीन हे हॉर्मोनसुद्धा अवटुका ग्रंथीच तयार करते.
तर हा झाला सैद्धांतिक भाग. रुग्णांच्या तक्रारी असतात की त्यांना थायरॉइड झालाय. ती रातोरात दुसरी तयार नाही होत. थायरॉइड ग्रंथी ही सर्व प्राण्यांमध्ये असतेच. फक्त त्याचे कार्य बिघडते व अनेक वेळा त्याचा आकार वाढतो. अश्याच काही तक्रारींविषयी पाहुया.

*हायपो-थायरॉइडीझम* ही अशी एक अवस्था ज्यामध्ये अवटुका ग्रंथी कमी प्रमाणात थायरॉइड हॉर्मोन तयार करते. ह्याचे कारण अवटुका ग्रंथी, पियुष ग्रंथी किंवा हायपोथॅलेमस मध्येच असु शकते. हायपोथायरॉयडीझममुळे थकवा येणे, एकाग्रता नसणे, स्मृतिमान्द्य (स्मरणशक्ति कमी होणे), मानसिक अस्वास्थ्यता, कोरडी त्वचा, केस गळणे वा विरळ होणे, मलावस्टंभ (शौचास साफ न होणे), नेहमी थंडी वाजणे/गार वाटणे व त्याचा त्रास होणे, अंगास सुज येणे (विशेषकरुन पायाला), वजन वाढणे, स्नायु व सन्धिमध्ये वेदना, औदासिन्यता/डिप्रेशन, झोप न लागणे, ऐकु कमी येणे, आवाजात कर्कशपणा येणे, बायकांमध्ये मासिकपाळीच्या वेळेस अत्यधिक रजःस्राव व त्यानंतर मासिकपाळी होण्यास कष्टता अथवा अगदीच बंद आणि अनियमित होणे, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे, नाडीगती मंदावणे यांसारख्या तक्रारी चालू होतात.

लहान मुलांमध्ये कावीळ (त्वचा व डोळे पिवळे होणे), तोंडाला सुज येणे, वाढ खुंटणे, यौवन उशिरा येणे, हालचाल मंद व संथ असणे, मानसिक विकास उशिरा होणे आणि इतर त्रास होतात. प्रयोगशाळेतील अहवालामध्ये टीएसएच वाढ़लेले आणि टी३ टी४ ह्यांचे प्रमाण कमी झालेले आढ़ळेल.
हाशिमोटोस थायरॉयडायटीस (ओटोइम्युन डिसॉर्डर म्हणजेच शरीर स्वत:च्याच पेशीजालांना प्रतिद्रव्ये निर्माण करते असा रोग ज्यात अवटुका ग्रंथीला सुज येते), ऍक्युट थायरॉयडायटीस, पोस्टपार्टम थायरॉयडायटीस हे सर्व हायपोथायरॉयडिझमचेच प्रकार.

*हायपर-थायरॉइडीझम* – यामध्ये थायरॉइड हॉर्मोंन्स हे प्रमाणापेक्षा जास्त वाढतात. ह्यामध्ये पूर्ण अंगाला कंप होणे (विशेषतः हातानां), नेहमी चिंताग्रस्त वाटणे, चिड़चिड़ होणे, हृदयाचे ठोके वाढणे, थकवा, उन्हाळा व गर्मी सहन न होणे, पुनः पुनः शौचास होणे किंवा अतिसार, घाम जास्त येणे, भुक वाढणे तरिपण नकळत वजन कमी होणे, मासिक पाळीमध्ये बदल होणे (शक्यतो कमीच होणे किंवा न होणे), अवटुका ग्रंथीला सुज येऊन त्याचा आकार वाढणे व ती सुज गळ्याच्या खालच्या बाजुस एखादे अण्डकोष लोंबल्यासारखे दिसणे, थोड़े काम करूनच मरगळ व अंग गळुन गेल्यासारखे वाटणे, झोप न लागणे, केस विरळ होणे व लगेच तुटणे(भुवयांच्या बाहेरील एक तृतीयांश भागाचे केस गळणे), अंग व त्वचा स्पर्शास गरम लागणे, उलट्या होणे, मांसपेशी-स्नायुमध्ये वेदना, अतिचंचलता, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, लघवीला जास्त होणे, खूप तहान लागणे, उन्माद किंवा चित्तभ्रम होणे, कामवासना कमी होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, कुठल्याही गोष्टीमध्ये एकाग्रता नसणे, लक्ष्य न लागणे व आठवायला त्रास होणे, डोळ्यानां सुज येणे, डोळ्यांची हालचाल थोडी कमी होणे, डोळे बाहेर आल्यासारखे वाटणे, दिसायला अस्पष्ट दिसणे किंवा एकच वस्तु २ दिसणे (डबल व्हिजन), प्रकाशाचा त्रास होणे, डोळे लाल होणे, शुष्क होणे, असामान्य अनैच्छिक अश्या शरीराच्या हालचाली, योग्यवेळी चिकित्सा न केल्यास हाडे ठिसूळ होणे, पुरुषांमध्ये स्तनांचा आकार वाढणे… यांसारख्या इतर तक्रारी होतात. ह्यामध्ये टी३ व टी४चे प्रमाण वाढते आणि टीएसएचचे प्रमाण कमी होते. ग्रेव्स डीजिस, टॉक्सीक मल्टीनोड्यूलर गॉयटर (अवटुका ग्रंथीला बारीक अश्या खुप गाठी येणे) हे हायपरथायरॉयडीझमचेच प्रकार.

रक्ताची तपासणी, अल्ट्रासाऊंड, रेडीओएक्टिव आयोडीन वापरून थायरॉईड स्कॅन, फाईन नीडल एस्पिरेशन, बायोप्सी करुन आधुनिकरित्या निदान होऊ शकते. नाहीच तर शस्त्रक्रिया अनिवार्य असेल.
आयुर्वेदाप्रमाणे यालाच गलगंड असे म्हणतात व तेही ३ प्रकारचे असे आचार्य सुश्रुतांनी म्हटले आहे. हा शोथ दोष व धातुनुसार काळ्या, आरक्तवर्णाचा, त्वकवर्णाचा, श्वेतवर्णाचा असु शकतो.

हा शोथ वेदना किंवा वेदनारहित असु शकतो. त्यात खाज, दुर्गंधी येणे, हळुहळु वाढत जाणे व नंतर पाक होणे, तोंडाची चव जाणे, टाळु व कण्ठाच्या ठिकाणी कफ साठल्यासारखा वाटणे अश्या तक्रारी असू शकतात. अवस्थेनुसार नाडी स्वेद, रक्तमोक्षण, उपनाह, लेप, तैलपान, शोधन, विम्लापन, प्रतिसारण, दहन व शस्त्रक्रियांचा उल्लेख केलेला आहे. आहारामध्येसुद्धा पथ्य पाळावे. अर्थातच वैद्यांचा सल्ला व मार्गदर्शन महत्वाचे.