गरज ‘सबुरी’ची

0
143

सबका मालिक एक है असे सांगणार्‍या श्रीसाईबाबांच्या पाथरी या जन्मभूमीला महाराष्ट्र सरकारने शंभर कोटी रुपये दिल्याने शिर्डीवासीयांनी निर्माण केलेला वाद दुर्दैवी आहे. श्रद्धा आणि सबुरी या साईंनीच दिलेल्या मंत्राचा त्यांच्या भक्तमंडळीला विसर तर पडलेला नाही ना असा प्रश्‍न त्यामुळे पडतो. साईबाबांचे तीर्थक्षेत्र म्हणून आजवर शिर्डीची कीर्ती देश विदेशांत पोहोचली असली, तरी साईबाबा हे मूळचे शिर्डीचे नव्हेत हे तर सर्वज्ञात आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी हे त्यांचे जन्मगाव अशीच आजवर धारणा राहिली आहे आणि साईचरित्रामध्येही त्यांची जन्मभूमी शिर्डी नव्हती, परंतु शिर्डीत त्यांचे स्वागत कसे झाले, शिर्डीवासीयांची त्यांच्यावर श्रद्धा का जडली हे सारे नमूद केलेले आहे. शिर्डीतील द्वारकामाईमधील वास्तव्यात साईंची कीर्ती सर्वदूर पसरत गेली आणि बुटीवाड्यातील त्यांच्या समाधीनंतर तर जगभरातील भाविकांची तेथे दर्शनासाठी रीघ लागत आली आहे. शिर्डी गावचे सारे अर्थकारण साईबाबांभोवती निगडीत आहे आणि आज जो काही वाद निर्माण केला गेला आहे, त्याचे मूळ याच अर्थकारणामध्ये आहे. साईबाबांवरील श्रद्धेपेक्षा या अर्थकारणामुळेच हा वाद अधिक भडकलेला आहे हे तर स्पष्टच दिसते. पाथरी ही साईबाबांची कथित जन्मभूमी, परंतु आजवर उपेक्षित आणि अविकसित राहिली आहे. तेथेही साईंचे मंदिर उभारलेले आहे. काही भाविक तेथे मंदिरात दर्शनासाठी येतात, परंतु सोयीसुविधांच्या अभावामुळे त्यांना निराशा पत्करावी लागते. महाराष्ट्र सरकारकडे पाथरीवासीयांनी या सुविधांसाठी गळ घातली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील नव्या सरकारने शंभर कोटींची तरतूद पाथरीच्या विकासासाठी केली. मात्र, पाथरीमध्ये शंभर कोटी खर्चून सोयीसुविधा झाल्या, तर शिर्डीकडे येणारे भाविक पाथरीकडे वळतील आणि त्याचा फटका आपल्या आर्थिक उलाढालीला बसेल अशी भीती शिर्डीवासीयांच्या मनामध्ये आहे आणि त्यातूनच हा सारा वाद पेटलेला आहे. वास्तविक, जो कोणी साईंचा भक्त असेल त्याच्यासाठी पाथरी आणि शिर्डी ही दोन्ही ठिकाणे वंद्यच असतील. पाथरीच्या विकासानंतर शिर्डीचे महत्त्व कमी होईल हे म्हणणेही पटण्याजोगे नाही, कारण शेवटी साईंची प्रत्यक्ष समाधी ही शिर्डीमध्येच आहे, जेथे आज त्यांचे भव्य समाधीमंदिर उभे आहे. साईंच्या जीवनचरित्रातील महत्त्वाचे लीळाप्रसंग हे शिर्डीमध्येच घडलेले आहेत. त्यामुळे पाथरीचा विकास जरी झाला, तरी शिर्डीची उपेक्षा होईल हे म्हणणे तसे पटणारे नाही. साईबाबांवर श्रद्धा बाळगणार्‍याच्या मनातील शिर्डीबाबतची श्रद्धा ढळणार नाही. सध्याच्या वादामध्ये शिर्डी बंदसारखा जो काही आततायी प्रकार चालला आहे तो योग्य नाही. साईंप्रती श्रद्धा बाळगता आणि त्यांच्या जन्मभूमीचाच विकास होऊ नये असे म्हणता हे कसे काय, असा प्रश्न आज पाथरीवासीय करीत आहेत. एक प्रश्न या वादात पडतो तो म्हणजे, साईबाबांनी शिकविलेली सबुरी गेली कुठे? साईंच्या निमित्ताने का होईना एखादे गाव जर विकसित होत असेल, तेथील अर्थकारणाला चालना मिळणार असेल, रोजगार संधी निर्माण होणार असतील, तर त्याचे स्वागतच व्हायला हवे. त्याविषयी निव्वळ आर्थिक व राजकीय कारणांसाठी आरडाओरड करणे साईभक्तांच्या भावनांना धक्का पोहोचवणारे आहे. शिर्डीचा आजवर मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. श्री साईसंस्थान हे आज देशातील श्रीमंत संस्थानांपैकी एक आहे. येणार्‍या भाविकांसाठीही फार उत्तम सुविधा आज शिर्डीमध्ये दिसतात, ज्या अनेक तीर्थक्षेत्री अभावानेच आढळून येतात. त्यात आणखी वाढ कशी करायची आणि शिर्डीचे महत्त्व कायम राहावे, वाढावे यासाठी आणखी काय करता येईल याचा विचार शिर्डीवासीयांनी करणे आवश्यक आहे. त्यासाठी खरे तर वेगळ्या सरकारी मदतीचीही संस्थानला आवश्यकता नाही, एवढे ते स्वयंपूर्ण आहे. आजकाल धकाधकीच्या जीवनातून आणि नोकरी व्यवसायातून येणार्‍या ताणतणावांतून जेरीला आलेली माणसे मानसिक शांतीच्या शोधात वणवण फिरत असतात. कधी ईश्वरचरणी लीन होतात, तर कधी साधूसंतांच्या पायावर डोके ठेवतात. शेवटी त्यांना हवी असते ती मनःशांती. आपल्या जीवनामध्ये लाभ व्हावा, समृद्धी यावी, संकटे दूर व्हावीत अशा स्वार्थी विचारांनी असो वा आणि निरपेक्ष भावनेतून, स्वतःला आलेल्या प्रत्ययातून जडलेली श्रद्धास्थाने असोत, त्यांचा बाजार होता कामा नये. त्यांचे पावित्र्य कायम राहिले पाहिजे. दुर्दैवाने अशा श्रद्धास्थानांभोवती गावचे अर्थकारण केंद्रित होत असल्याने मूळ श्रद्धेचा विषय बाजूलाच राहतो आणि आर्थिक उलाढालीला महत्त्व मिळत जाते. मग अशा स्थळांचे मार्केटिंग करण्यावर भर दिला जातो. एकदा का असा बाजार झाला की त्या श्रद्धास्थानाची निरामयता, पावित्र्य हळूहळू लोप पावण्याची भीती असते. पाथरीच्या विषयात शक्ती खर्च करण्याऐवजी शिर्डीवासीयांनी हे भान ठेवण्याची आज आवश्यकता आहे. शिर्डीचे पावित्र्य त्यांना कायम राखता आले, तर लोक आपोआप येतील, साईचरणी लीन होत राहतील. शिर्डीचे महत्त्व अबाधित उरेल!