टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर मालिका विजय

0
120

>> तिसरा एकदिवसीय सामना ७ गड्यांनी जिंकला

सलामीवीर रोहित शर्माचे २९वे एकदिवसीय शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या ८९ धावांच्या खणखणीत खेळीच्या बळावर भारताने तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ७ गडी व १५ चेंडू राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने ठेवलेेले २८७ धावांचे लक्ष्य भारताने केवळ ३ गडी गमावून गाठले. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी खिशात घातली. आठ चौकार आणि ६ षटकारांसह आपली ११९ धावांची शतकी खेळी सजवलेला रोहित शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. विराट कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार लाभला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन गडी लवकर गमावले. स्टीव स्मिथ (१३१) व मार्नस लाबुशेन (५४) यांनी तिसर्‍या गड्यासाठी १२७ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यानंतर ठराविक अंतराने त्यांची गडी बाद होत राहिले. शेवटच्या दहा षटकांत किमान ८० धावांची अपेक्षा असताना कांगारूंना केवळ ६३ धावा करता आल्या. भारताकडून मोहम्मह शमीने ‘हाणामारी’च्या षटकांत टिच्चून मारा करताना कांगारूंना मुक्तपणे फलंदाजीची क्वचितच संधी दिली. शमीने ६३ धावांत ४ गडी बाद केले. जडेजाने २ तर सैनी व कुलदीपने प्रत्येकी १ गडी बाद केला.

क्षेत्ररक्षण करताना खांदा दुखावल्यामुळे शिखर धवन भारतीय डावाची सुरुवात करण्यास उतरला नाही. राहुलने रोहितसह डाव सुरू केला. याद्वयीने पहिल्या गड्यासाठी ६९ धावा जोडल्या. एगारने राहुलला पायचीत करत ही जोडी फोडली. रोहित व कर्णधार कोहली यांनी दुसर्‍या गड्यासाठी १३७ धावा जोडताना संघाला दोनशेपार नेले. शतकानंतर धावगती वाढविण्याच्या नादात रोहित शर्मा झंपाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

विराट कोहलीला मात्र ४४व्या वनडे शतकाने हुलकावणी दिली. हेझलवूडचा एक यॉर्कर चेंडू फ्लिक करण्याच्या नादात त्याला यष्टी गमवावी लागली. त्याने ९१ चेंडूंत ८ चौकारांसह ८९ धावांची दमदार खेळी केली. रोहित व विराटच्या विकेट्‌सचा स्वतःवर दबाव जाणवू न देता श्रेयस अय्यरने ३५ चेंडूंत झटपट नाबाद ४४ धावा करत मनीष पांडे (८) याच्या साथीने संघाला विजयी केले.