>> गोवा प्रो-लीग फुटबॉल
चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबने वास्को स्पोर्ट्स क्लबचा ५-१ असा धुव्वा उडवित गोवा फुटबॉल संघटना आयोजित गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत काल पूर्ण गुणांची कमाई केली. नागोवा ग्रामपंचायत मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात चर्चिल ब्रदर्स संघाने १०व्याच मिनिटाला आपले खाते खोलले. वास्कोच्या मैंदो दादानुवूरने चर्चिल ब्रदर्सच्या खेळाडूलला डी कक्षेत धोकादायरित्या खाली पाडल्याने रेफ्रीने पेनल्टी बहाल केली. त्यावर कोणतीही चूक न करता लालखावंपुईमावियाने चर्चिलला १-० अशा आघाडीवर नेणारा हा गोल नोंदविला. ३०व्या मिनिटाला क्वॅनकडून मिळालेल्या पासवर लालेंग्झामा वांगचिहियाने चर्चिल ब्रदर्सची आघाडी २-० अशी केली. ४३व्या मिनिटाला मिकी वाझने गोल नोंदवित वास्को स्पोर्ट्स क्लबची पिछडी २-१ अशी कमी केली. पहिल्या सत्रात चर्चिल ब्रदर्सने आपली २-१ अशी आघाडी राखली. दुसर्या सत्रात ६१व्या मिनिटाला वास्कोच्या अमित दासकडून स्वयंगोलाची नोंद झाल्याने चर्चिल ब्रदर्सला ३-१ अशी आघाडी मिळाली. ६४व्या मिनटाला लामगोलेन हँगशिंगने पेनल्टीवर गोल नोंदवित संघाची आघाडी ४-१ अशी मजबूत केली. तर ७२व्या मिनिटाला मॉविन बॉर्जीसने गोल नोंदवित चर्चिल ब्रदर्सच्या ५-१ अशा एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केला.