>> केरळमधील ५ जणांना अटक
काणकोणच्या पोलिसांनी पोळे चेक नाक्यावर गुरूवार दि. ९ रोजी रात्रौ ९च्या दरम्यान घातलेल्या एका छाप्यात गोव्यातून कासरकोड-केरळ येथे जाणारी केए १४ यू ३३३० ही चारचाकी गाडी अडवून त्यातील १ कोटी ४८ लाख रु.च्या चलनात नसलेल्या जुन्या नोटा जप्त केल्या.
या कारवाईत अब्दुल कन्नूर (४४), सलीम रेहमान (३३), रजाक मोहम्मद (४५), अब्बू बक्कर अब्दूल्ला (२५), युसूफ अब्दुल्ला रेहमान (३०) या पाचजणांना कासरकोड केरळ येथील अटक केली आहे. काणकोणच्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या छाप्यात १००० रु.च्या १ लाख चलनात नसलेल्या नोटा सापडल्या. यावेळी पोळे चेकनाक्यावर कामावर असलेल्या भगवान सावंत या हवालदाराच्या नजरेस ही गोष्ट आल्यानंतर लगेच त्यांनी काणकोणचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण, पोलीस उपीन रीजक, रामचंद्र नाईक, धिरज देविदास, उपनिरीक्षक रमाकांत वेळीप यांना या घटनेची खबर दिली आणि काणकोणच्या पोलिसांनी पंचनामा करून सर्व माल ताब्यात घेतला.
याची खबर मिळताच दक्षिण गोव्याचे पोलीस अधिक्षक अरविंद गावस, दक्षिण गोव्याचे उपअधीक्षक कुणाल पौडवाल यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली.