अभयारण्यातील कुटुंबांनी स्थलांतर करावे ः मुख्यमंत्री

0
122

राज्यातील राखीव अभयारण्यात एकदम धोक्याच्या जागी राहणार्‍या कुटुंबांनी स्वयंस्फूर्तीने स्थलांतरासाठी पुढाकार घेतल्यास त्यांचे पुनर्वसन करण्याची सरकारची तयारी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

म्हादई अभयारण्यातील वाघांच्या मृत्युप्रकरणी धनगर कुटुंबातील तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. धनगर कुटुंबीयांच्या गाय, म्हैस यांची वाघाने शिकार केलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, अभयारण्याच्या जवळ धोक्याच्या जागी राहणार्‍या एक – दोन कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव आहे. सुरुवातीला सहा महिने किंवा वर्षभर या कुटुंबांना पुनर्वसन केंद्रात ठेवले जाईल. त्या कुटुंबीयाच्या पुनर्वसनाची व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर जागा उपलब्ध केली जाणार आहे. त्यांची पाळीव जनावरे असल्यास त्यांना आवश्यक सुविधा पुरवल्या जातील. वन्यप्राण्यांनी पाळीव जनावरांची शिकार केल्यास मालकाला नुकसानभरपाई दिली जाईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

म्हादई अभयारण्यातील वाघाच्या मृत्यू प्रकरणामुळे वनखात्याची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे. वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी राज्याबाहेरील असल्याने केवळ कार्यालयात बसून कामकाज हाताळणे पसंत करतात. वाघांच्या सर्वंधनासाठी उपाय योजना करण्यात वनखाते अपयशी ठरले आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री तथा मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल केली.