कॉंग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी आलेक्स रेजिनाल्डची निवड

0
117

>> कॉंग्रेस विधिमंडळ गटाची बैठक

कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत कॉंग्रेसचे मुख्य प्रतोद म्हणून आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांची निवड काल करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस विधिमंडळ गटाची बैठक पार पडली. या बैठकीत म्हादई, सरकारची आर्थिक स्थिती व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. म्हादईच्या प्रश्‍नावर संयुक्त स्थगन प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

विधिमंडळ गटाच्या बैठकीत गोवा विधानसभेच्या आज होणार्‍या एक दिवसीय अधिवेशनावर चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे. त्यानंतर एसटी., एससी व इतरांना राखीवतेमध्ये आणखीन १० वर्षाची वाढ देणारे केंद्रीय विधेयक मांडले जाणार आहे. तसेच केंद्रीय जीएसटी विधेयक मांडले जाणार आहे, असे कामत यांनी सांगितले.

राज्यातील म्हादई हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. याबाबत स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्याशी नियोजित स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्यात आली आहे. सर्वांनी एकत्र येऊन स्थगन प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे कामत यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. अनेक विद्यालयांना व्यवस्थापन अनुदान अद्याप देण्यात आलेले नाही. मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नाही. मतदारसंघातील विकासकामांसाठी ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु, अद्यापपर्यंत विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नाही, असेही कामत यांनी सांगितले.

राज्यातील फोफावत चाललेल्या अमलीपदार्थ आणि वेश्याव्यवसायामुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे. अमली पदार्थांचा विळखा वाढत चालला आहे. दोन्ही विषय गंभीर समस्या बनलेले आहे. गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून जाहिरात बाजी केली जाते. तथापि, अमलीपदार्थ आणि वेश्या व्यवसायामुळे पर्यटक गोव्यात येण्याची टाळू शकतात, असेही कामत यांनी सांगितले.