>> होळकर स्टेडियमवर धावांची बरसात अपेक्षित
भारत व श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-ट्वेंटी सामना आज मंगळवारी होळकर स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. पहिला सामना पावसामुळे व ओलसर मैदानामुळे रद्द करावा लागल्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेतील आजच्या सामन्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला अवघे काही महिने शिल्लक असल्यामुळेे उभय संघ संघ बांधणी करण्यात गुंतले आहेत. टीम इंडियादेखील दुसर्या सलामीवीराच्या शोधात आहे. नियमित सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. सलामीवीर म्हणून त्याची जागा पक्की आहे. आज भारताच्या डावाची सुरुवात करणार्या शिखर धवन व लोकेश राहुल यांच्यात रोहितचा जोडीदार बनण्यासाठी स्पर्धा दिसून येणार आहे. त्यामुळे आज धावा जमवून प्रभावित करण्याचा उभयतांचा प्रयत्न असेल. तिसर्या स्थानावर विराट कोहली फलंदाजी करेल. मधल्या फळीत श्रेयस अय्यर, ऋषभ पंत फलंदाजी करेल. या दोघांचे ‘वर्ल्डकप तिकिट’ अजून निश्चित झालेले नाही. मनीष पांडे, संजू सॅमसनसारखे सक्षम पर्याय या दोन जागेंसाठी आहेत. त्यामुळे सातत्य राखण्यावाचून श्रेयस, ऋषभकडे पर्याय नाही. अष्टपैलू म्हणून शिवम दुबेला खेळवून टीम इंडियाचा प्रयोग सुरूच असेल. हार्दिक पंड्या टी-ट्वेंटी वर्ल्डकपसाठी तंदुरुस्त ठरला तर ‘दुबे’चा प्रयोग फारकाळ सुरू राहणे अपेक्षित नाही. वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा यांचा संघातील समावेश खेळपट्टीचे स्वरुप पाहून ठरणार आहे. वर्ल्डकपसाठी तसेच आजच्या सामन्यासाठी ‘अंतिम ११’मध्ये जसप्रीत बुमराह व नवदीप सैनी यांची जागा जवळपास नक्की आहे.
श्रीलंका संघाचा विचार करता ‘अंतिम ११’ मध्ये अँजेलो मॅथ्यूजला स्थान मिळणे कठीण आहे. पहिल्या सामन्यात जाहीर केलेल्या संघात मॅथ्यूजचा समावेश नव्हता. धनंजय डीसिल्वा, इसुरु उदाना, दासुन शनका, वानिंदू हसारंगा या चार अष्टपैलूंचा समावेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘अनुभवाला’ प्राधान्य देण्याचे ठरविल्यास या चौघांपैकी एकाला बाहेर बसवावे लागणार आहे. त्यामुळे गोलंदाजीचा एक पर्याय कमी होऊ शकतो. उदाना याला आयपीएलमध्ये कोहलीच्या आरसीबीने खरेदी केले आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे कोहलीचे अधिक लक्ष्य असेल.
मार्च २०१८ मध्ये भारत व श्रीलंका अखेरच्या वेळी टी-ट्वेंटीत भिडले होेते. शार्दुलने २७ धावांत ४ गडी बाद करत श्रीलंकेचा डाव १५३ धावांत रोखण्यास मदत केली होती. हा सामना भारताने सहा गड्यांनी जिंकला होता. फलंदाजीचे नंदनवन म्हणून होळकर मैदान ओळखले जाते. २०१७ साली भारत-श्रीलंका यांच्यात या मैदानावर अखेरच्या वेळी झालेल्या टी-ट्वेंटीमध्ये भारताने २६० धावांचा डोंगर उभारला होता. यानंतर लंकेने १७२ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी स्वीकारण्याची शक्यता नाकारता येत नाही.
श्रीलंका संभाव्य ः दनुष्का गुणथिलका, अविष्का फर्नांडो, कुशल परेरा, ओशादा फर्नांडो, भनुका राजपक्षा, धनंजय डीसिल्वा, दासुन शनका, इसुरु उदाना, वानिंदू हसारंगा, लाहिरु कुमारा व लसिथ मलिंगा.
भारत संभाव्य ः शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह व नवदीप सैनी.