योगसाधना – ४४४ अंतरंग योग – ३०

0
176
  • डॉ. सीताकांत घाणेकर

पत्नी पतीवर रागावते तेव्हा बोलणे बंद करते, मुलगा वडिलांवर चिडतो तेव्हा जेवण घेत नाही. याला इंग्रजीत ‘इमोशनल ब्लॅकमेलींग’ म्हणतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते ही पद्धत अत्यंत वाईट व हीन आहे.

चित्तएकाग्रतेसाठी व मानवाच्या जीवनविकासासाठी अंतरंग योगाच्या पैलूंमध्ये – धारणा/ध्यान/समाधी यावर खोल – खोल विचार आपण करीत आहोत. उत्कृष्ट ज्ञानसंपादन करीत आहोत.
मनाच्या तयारीची यंत्रे व सामुग्री या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर पू. पांडुरंगशास्त्री आठवले आपले काय मतप्रदर्शन करतात हे बघताना आपण मन कमजोर झाले की कसे संरक्षणतंत्रांचा वापर करतो याच्यावर विचार करीत आहोत.

आपण संरक्षण तंत्रांचे विविध प्रकार बघितले…
१. तर्कसंगत व्याख्या, २. प्रक्षेपण, ३. भ्रमात्मक श्रद्धा
४. एकरूपता, ५. स्थलच्युति… यांचा अभ्यास केला, आता पुढे…
६. निषेधवृत्ती (निगेटिव्हिझम्)- प्रत्येक घरात अशी वृत्ती थोड्याफार प्रमाणात सक्रीय असते. याचा हेतू असतो – * मी देखील प्रतिकार करू शकतो.
– नेहमीची उदाहरणे म्हणजे पत्नी पतीवर रागावते तेव्हा बोलणे बंद करते, मुलगा वडिलांवर चिडतो तेव्हा जेवण घेत नाही. याला इंग्रजीत ‘इमोशनल ब्लॅकमेलींग’ म्हणतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते ही पद्धत अत्यंत वाईट व हीन आहे. जास्त करून जेव्हा आई मुलांशी किंवा इतर सदस्यांशी बोलतच नाही. अशा वागण्याचा दुष्परिणाम इतरांच्या मनावरच नाही तर आत्म्यावर होतो. ते आत्मे दुखावले जातात. हे खरे म्हणजे आत्मिक पाप आहे. जास्त करून मुले आतल्या आत कुढतात.
अनेकवेळा समोरच्याची मोठी चूक नसते. पण ही शिक्षा महाभयंकर असते. खरे म्हणजे शिक्षा ही अपराधापेक्षा फार मोठी असता कामा नये. मुलांनी रडून रडून माफी मागितली तरी आई आपला राग सोडत नाही. याचं मूळ कारण म्हणजे त्या व्यक्तीचा जबरदस्त अहंकार.
इंग्रजीत एक छान म्हण आहे- ऍन अँगर टेक्स यु टू ट्रबल अँड युवर इगो कीप्स यु देअर.
‘‘आपल्या रागामुळे आपण त्या त्रासदायक स्थितीपर्यंत पोचतो व आपला अहंकार आपणाला तिथेच ठेवतो.
म्हणून संतमहापुरुषांनी सांगितले आहे की – अहंकारावर नियंत्रण ठेवा.
* अहंकाराचा वारा न लागो राजसा|
अशा घटनांमुळे कुटुंबातील वातावरण बिघडते, नकारात्मक कंपने पसरून वायुमंडळ वाईट होते व अनेकांची आत्मशक्ती कमी होते.
माझ्या अनुभवात अशी अनेक उदाहरणे आहेत. आपल्याही असतील. आपल्या दृष्टिक्षेपात आली तर शक्य तेवढा प्रामाणिक प्रयत्न करून अशा घटनांचे निवारण करणे सगळ्यांच्या हिताचेच नव्हे तर अत्यंत पुण्यदायक ठरेल. यश मिळेलच असे नाही पण प्रयत्न जरूर करावेत.

खरे म्हणजे अहंकार ही सृष्टीकर्त्याने दिलेली एक छान देणगी आहे. आपण आपल्या ‘अहं’(मी)ला आकार देतो. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ फ्रॉइड यांच्या म्हणण्यानुसार त्यात तीन प्रकार आहेत-
१. अहंगंड (मी मोठा), २. न्यूनगंड (मी क्षुद्र), ३. भयगंड
खरे म्हणजे अहंकाराचे दोन भाग म्हणजे – आत्मगौरव व पर सन्मान.
– या दोन्ही गोष्टी विचारपूर्वक व भावपूर्वक सांभाळल्या तर समाजातील अनेक भांडणं मिटतीलच असे नाही तर होणारच नाहीत.
७. प्रतिक्रियावृत्ती (रिऍक्शन फॉर्मेशन) – शास्त्रीजी सांगतात- वस्तुतः ज्याच्याबद्दल द्वेष व्यक्त केला जातो, त्याच्यावर प्रेमही आहे असे दाखविण्याचा येथे प्रयास असतो. दोन उदाहरणे ते देतात-
१. सावत्र आई इतर लोकांसमोर आपले आपल्या सावत्र मुलावर विशेष प्रेम आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करते.
२. स्वार्थी मनुष्य निःस्वार्थी असल्याचे ढोंग करतो. असे करणार्‍यांनी लक्षात ठेवायला हवे की आपले अंतर्मन व भगवंत याला साक्षी आहे. आम्ही इतरांना फसवू शकतो पण मनाला व भगवंताला नाही. म्हणून असे ढोंग करू नये. तेदेखील आत्मिक पाप आहे. असे वागून आपण स्वतःचे व समाजाचे फार नुकसान करतो.
या संदर्भातील उदाहरणेदेखील अनेक असतील. पण दरवेळी आपल्याला ज्ञान होईलच असे नाही. काही काळानंतर या गोष्टी उघडकीस येतात.
८. दिवास्वप्न (डे ड्रिमिंग) – अनेकवेळा हव्या असलेल्या गोष्टी मिळत नाहीत किंवा अपेक्षेप्रमाणे घडत नाही. म्हणून त्यावेळी मनाला समाधान मिळावे म्हणून ती व्यक्ती म्हणते- ‘आज मिळाले नाही तरी उद्या मिळेल.’.. ह्याला ‘शेखमहमदी विचारात स्वप्ने रंगवणे’ असे म्हणतात.
९. क्षतिपूर्ती ( रिड्रेस)- येथे असंतोष अथवा अप्राप्तीवर माणूस तात्काळ उपाय शोधून काढतो. शास्त्रीजी उदाहरणादाखल सांगतात —
* घरदार, बायका-मुले सोडून जाणे
* झोपडीलाच सर्वस्व समजणे
* गंगाकिनार्‍यावर राहणे, जंगलात राहणे
आपल्या आसपास अशी काही उदाहरणे दिसतात. अशा व्यक्ती एवढ्या खचतात की त्यांना उपाय सुचत नाही आणि त्यामुळे ते एवढी टोकाची भूमिका घेतात किंवा झेप घेतात. तसे बघितले तर ते इतरांचा विचार करीत नाहीत. ते स्वार्थी वाटतात.
खरे म्हणजे त्यांची आत्मशक्ती क्षीण झाल्यामुळे ते असे वागतात.
१०. दमन (रीप्रेशन) – अनेकवेळा आपण चिंताग्रस्त असतो पण आपण चिंतेत असतो तेव्हा ती वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न करतो. केव्हा केव्हा व्यक्ती घाबरलेली असली तरी तसे दाखवत नाही. धीराचा आव आणते.

तसे बघितले तर यात फार गैर नाही. कारण त्यांना आपल्या कुटुंबाला किंवा अन्य व्यक्तींना चिंता व भय यांच्यापासून मुक्त ठेवण्याची इच्छा असते. पण असे सदासर्वकाळ राहता येत नाही. त्यावर उपाय काढावाच लागतो.
११. उदात्तीकरण (सब्लिमेशन) – विश्‍वात कार्याची विविध क्षेत्रे असतात. इथे मनुष्य एका क्षेत्रातील असफलता दुसर्‍या उदात्त क्षेत्रातील सफलतेने झाकून टाकतो.
उदा. ज्या स्त्रीला स्वतःचे मूल नसते ती स्त्री नर्स किंवा शिक्षिका बनून आपल्या मातृवात्सल्याची पूर्तता करते. हे चांगलेच आहे. कारण त्यामुळे त्यांना शांती- सुख- समाधान प्राप्त होते. त्यांनी जर त्या मुलांना आपले मानून प्रेम दिले तर अति उत्तम. इतर काहीजण दुसर्‍या क्षेत्रात स्वतःला गुंतवून घेतात- साहित्य, संगीत, कला, खेळ… असे उदात्तीकरण चांगले आहे कारण ती व्यक्ती त्या इतर क्षेत्रात प्रगती करते. ही गोष्ट सकारात्मक आहे.

या सर्व मुद्यांवर सार सांगताना पू. पांडुरंगशास्त्री म्हणतात-
‘‘जीवनात असफलता आल्यानंतर माणूस असे आपले संरक्षणतंत्र उभे करतो. पण हे सारे कामचलाऊ व निषेधात्मक (नकारात्मक) असते. संरक्षणासाठी एखादी योजनादेखील तयार करतो. पण ती जुळणी सदोष (मालऍडजस्टमेंट) असू शकते. त्याने ताण कमी झाला असे वाटते पण त्याचा मनावर फार मोठा आघात होतो.’’
खरेच, ही वस्तुस्थिती आहे. मग आपण करायचे तरी काय? तुम्हाला काय उपाय सुचतो? त्यावर अभ्यास- चिंतन करा.
मूर्तिपूजेचा यासाठी कसा उपयोग होऊ शकतो हेदेखील पाहू या.
(संदर्भ – मूर्तिपूजा- पू. पांडुरंगशास्त्री आठवले)