एडिटर्स चॉईस
– परेश प्रभू
दर आठवड्याला एखाद्या ताज्या ‘नॉन फिक्शन’ पुस्तकाचा परिचय या सदरातून करून दिला जातो. यावेळी निवडलेली पुस्तके मात्र वेगळी आहेत. एक आहे अस्सल काश्मिरी लोककथांचे आणि दुसरे आहे मानवी आनंदानुभवाचा आविष्कार मांडणारे!
लोकजीवनाचा हुंकार म्हणजे लोककथा. ज्या समाजातून त्या आलेल्या असतात त्या समाजाच्या जडणघडणीचे ताणेबाणे त्या कथांमधून समजतात. समाजाच्या कल्पनाशक्तीची झेप दर्शवणार्या, त्याच्या वृत्तिप्रवृत्तींचे प्रतिबिंब दर्शवणार्या आणि एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे अशा मौखिक परंपरेने शतकानुशतके चालत आलेल्या लोककथा हा एक सांस्कृतिक ठेवा असतो आणि एका परीने हा कथांत सामावलेला सामाजिक इतिहासही असतो. म्हणी, वाक्प्रचार, कथा, विधिविधान या सार्यांमधून तो प्रकटत असतो.
आज या सदरामध्ये नेहमीसारखे एखादे ‘नॉन फिक्शन’ पुस्तक चर्चेसाठी न घेता दोन वेगळ्या पुस्तकांचा परिचय करून देण्याचे योजिले आहे. त्यातील एक आहे काश्मिरी लोककथांचा संग्रह, ज्याचे नाव आहे ‘द लेजंड ऑफ हिमल अँड नागराय ः ग्रेटेस्ट कश्मिरी फोक टेल्स’ आणि या कथा संकलित केल्या आहेत ओनायझा द्राबू यांनी. प्रकाशक आहेत, ‘स्पीकिंग टायगर.’
कलम ३७० खालील विशेषाधिकार हटवले गेल्यापासून काश्मीर निर्बंधांखाली आहे. राजकीय परिस्थितीने श्वास कोंडलेल्या या राज्याच्या ह्या पारंपरिक लोककथा गतकाळातील एका समृद्ध, संपन्न लोकजीवनाचे आणि महान उदात्त परंपरेचे दर्शन घडवितात. या नुसत्या लोककथा नाहीत, तर हा काश्मिरी लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहेत. या कथा ऐकूनच काश्मीरमधील पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. मौखिक परंपरेने अपरिहार्य फेरफार होऊन जरी त्या पुढे चालत आलेल्या असल्या, तरी त्यांचा गाभा तोच राहिला आहे.
काश्मीर हा एकेकाळचा निसर्गतःच नव्हे, तर सांस्कृतिकदृष्ट्याही अतिशय संपन्न असा प्रदेश. हिंदू, बौद्ध परंपरांचा येथे शतकानुशतके वास राहिला. त्यानंतर पर्शियातून येथे इस्लाम आला. त्यामुळे काश्मिरी लोकभाषेवर संस्कृत आणि पर्शियन या दोन्ही भाषांचा प्रभाव आजही जाणवतो. अशा या काश्मिरी लोककथांमध्ये देखील हे विषयवैविध्य असणे अगदी साहजिक आहे. विविध धर्म, संस्कृती यांचा मिलाफ झालेल्या काश्मीरमधील लोककथांतही हे वैविध्य पावलोपावली दिसते.
असे म्हणतात की आपला ‘कथा सरित्सागर’ हा ग्रंथदेखील काश्मीरमध्येच निर्माण झाला. इतकेच नव्हे, तर विष्णुशर्म्याचे ‘पंचतंत्र’ देखील काश्मीरमध्येच निर्माण झाले. ‘राजतरंगिणी’ हा जसा काश्मीरचा राजकीय इतिहास आहे, तशा काश्मिरी लोककथा हा तेथला सामाजिक, सांस्कृतिक इतिहास आहे.
लोककथा म्हणजे शेवटी काय असते? लेखिका म्हणते त्याप्रमाणे, ‘ज्या गोष्टी लोक स्मरणात ठेवू इच्छितात’ त्यांनाच लोककथांचे रूप मिळते. या कथांमागचे उद्देश वेगवेगळे असू शकतात. नीतीपर मार्गदर्शन, शौर्याचे स्मरण, संस्कार अशा अनेक उद्दिष्टांनी निर्माण झालेल्या आणि पिढ्यांमागून पिढ्या चालत आलेल्या ह्या कथांनी लोकजीवन समृद्ध निश्चित केलेले आहे.
या संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ लोककथा नाहीत. त्याला पूरक अशा अनेक गोष्टींची जोड त्याला दिलेली असल्याने हा संग्रह बहारदार बनला आहे. उदाहरणार्थ – कोणत्याही भाषेत नीट अनुवादित न होऊ शकणार्या काश्मिरी संकल्पनांचा अर्थ विस्ताराने देणारी एक नामावली या पुस्तकात देण्यात आलेली आहे. खरोखरच ह्या संकल्पना पूर्णांशाने अभिव्यक्त करू शकतील असे शब्दच इतर भाषांत नाहीत. दुसरे म्हणजे लोककथा ह्या मौखिक पद्धतीने सांगितल्या जात असल्याने त्या कथनाला गतिमान करणारे काही शब्द त्यात पुन्हापुन्हा येत असतात. त्या कथेला ते अधिक खुलवतात. अशा शब्दांची अर्थासह यादी कथांच्या प्रारंभी दिलेली आहे, तीही पूरक आहे.
काश्मीरमध्ये लोककथेला ‘लुख-कथ’ असा प्रतिशब्द आहे. खोर्यात पिढ्यानपिढ्या सांगितल्या जात आलेल्या लोककथांपैकी निवडक २९ कथा ह्या संग्रहात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. पाताळ, जानवर, जमीं आणि बोलचाल अशा चार भागांमध्ये त्यांची विभागणीही केलेली आहे. काश्मिरी लोककथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात सहसा स्वर्ग ह्या संकल्पनेचा उल्लेख आढळत नाही. आढळावा तरी का? कारण काश्मीर हाच जणू पृथ्वीतलावरचा स्वर्ग आहे. त्यामुळे स्वर्गाऐवजी पाताळाच्या कथा काश्मीरमध्ये फार सांगितल्या जातात. त्यांचा समावेश ‘पाताळ’ ह्या विभागात लेखिकेने केला आहे. जानवर म्हणजे प्राण्यांशी संबंधित लोककथा ज्या प्रत्येक लोकभाषेमध्ये सर्रास आढळतात त्यांचा समावेश एका स्वतंत्र विभागात केलेला आहे. जमीं म्हणजे जमिनीवर घडणार्या कथा आणि बोलचाल म्हणजे दैनंदिन संवादातून येणार्या कथा असे हे ढोबळ वर्गीकरण आहे. ज्या लोककथेचे शिर्षक संग्रहाला देण्यात आलेले आहे, ती हिमल आणि नागरायची कथा तर विख्यात आहे. ‘नाग’ या शब्दाचा काश्मीरमधला खरा अर्थ झरा. ‘कोकरनाग’ वगैरे नावे ही त्यामुळेच आलेली आहेत. मात्र पृथ्वीवरचे हे झरे पाताळातल्या नाग लोकांपर्यंत जातात अशी काश्मीरमधील लोकसमजूत आहे. त्यामुळे त्या नाग लोकांच्या कथा हाही काश्मिरी जनमानसाच्या कल्पकतेचा अविभाज्य भाग आहे.
या संग्रहात दिलेल्या काश्मिरी कथा मी येथे सांगणार नाही, कारण त्या मुळातूनच वाचायला हव्यात. फक्त उदाहरणादाखल एक लोककथा जिचा उल्लेख काश्मीरच्या संदर्भात नेहमीच होत असतो ती अशी – सतीसारस सरोवरामध्ये जलोद्भव नावाचा राक्षस वास करीत असतो. तो सतत बाहेर येऊन लोकांना त्रास देतो आणि पुन्हा सरोवरात गडप होतो. त्याच्या त्रासांना कंटाळलेले नागरिक शेवटी कश्यप ऋषींकडे धाव घेतात. कश्यप ऋषी भगवान श्रीविष्णूचा धावा करतात. शेवटी विष्णू वराहरूप धारण करून संपूर्ण तळे आटवतो. जलोद्भव राक्षसाला त्या सरोवरात लपणे अशक्य होते. त्यामुळे तो बाहेर पडतो. मैनेचे रूप धारण करून हरी त्याच्यावर धोंडा घालतात. कालांतराने ते ठिकाण उंचच उंच होत जाते आणि बनतो हरीपर्वत. दल सरोवरात विहार करताना समोर दिसते ती टेकडी म्हणजेच हा हरिपर्वत ज्यावर आजही शारदेचे मंदिर आहे. कश्यप ऋषी मग शिवाला प्रार्थना करतात की दुष्ट जलोद्भवाच्या मृत्यूने अपवित्र झालेल्या भूमीचे शुद्धीकरण करा. मग भगवान शिव आपले त्रिशूल जमिनीमध्ये आपटतात आणि पाण्याची धारा निघते ती म्हणजे वितस्ता. वितस्ता म्हणजेच आजची झेलम नदी. कल्पना आणि वास्तवाचा असा मेळ असलेल्या या सार्या लोककथा काश्मीरच्या समृद्ध पुरातन वारशाचे स्मरण आपल्याला करून देतात आणि काश्मिरी जनमानसाच्या बुद्धिचातुर्याचे, कल्पकतेचे दर्शनही घडवतात.
या आठवड्यात वाचनात आलेले दुसरे पुस्तक आहे ‘अ प्रायव्हेट हिस्टरी ऑफ हॅपिनेस.’ हे एक अनोखे संकलन आहे. माणसाच्या जीवनामध्ये आनंद अवतरतो, तेव्हाचे ते क्षण काही और असतात. जीवन हवेहवेसे वाटू लागते. काय करू नि काय नको असे होऊन जाते. मानवी जीवनातील अशाच आनंदी क्षणांचे हे संकलन आहे. म्हणजे जगभरातील विविध प्रदेशांतील व्यक्तींनी वेगवेगळ्या काळामध्ये नोंदवून ठेवलेल्या आपल्या जीवनातील आनंदाच्या प्रसंगांचे हे अनोखे संकलन आहे. अमेरिकेपासून ब्रिटनपर्यंत आणि चीनपासून भारतापर्यंत आणि प्राचीन काळापासून अर्वाचिन काळापर्यंत टिपले गेलेले हे आनंदाचे क्षण आहेत. त्या आनंदाची कारणे वेगवेगळी आहेत, कालावधीही वेगवेगळा आहे, परंतु त्या सर्वांमध्ये एक समान सूत्र आहे ते म्हणजे ‘हॅपिनेस’. जॉर्ज मायरसन यांनी केलेले हे संकलन म्हणूनच त्याच्या वेगळेपणामुळे लक्षात राहते. हे आनंदाचे क्षण एकाच स्वरूपात लिहिले गेलेलेही नाहीत. काही दैनंदिनींमधील आहेत, काही कवितांत नोंदवले गेले आहेत, काही पत्रांतून व्यक्त झाले आहेत, परंतु दैनंदिन जीवनामध्ये आनंदपेरणी करणारे हे क्षण आहेत आणि म्हणूनच अनमोल आहेत! संकलक म्हणतात, आज एकविसाव्या शतकामध्ये आनंदच दुर्मीळ झालेला आहे आणि राजकारण्यांपासून अर्थकारणी आणि मानसशास्त्रज्ञांपर्यंत सारे आपल्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे आश्वासन देत असतात. पण पूर्वीच्या तुलनेत आज आपण आर्थिकदृष्ट्या अधिक संपन्न आणि धनवान झालेलो आहोत, परंतु आपण खरेच आनंदी आहोत का? लेखक म्हणतो, जगाच्या कानाकोपर्यातल्या या ९९ व्यक्ती असतील, परंतु त्यांच्यामध्ये समान सूत्र आहे ते म्हणजे जीवनाची सार्थकता शोधण्याचा त्यांचा प्रयत्न. जीवनातील आनंद अनुभवण्याचे त्यांच्यात असलेले सामर्थ्य.
माणसामध्ये काही विघातक घडवण्याची जशी ताकद असते, तसेच छोट्या अगदी छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवण्याचे अंगभूत सामर्थ्यही त्याच्यामध्ये असते. मात्र अनेकदा अशा आनंदाला तो पारखा झालेला असतो. तो आनंद मिळवण्यासाठी लागणारी संवेदनशीलताच तो हरवून बसलेला असतो, याकडे लेखक आपले लक्ष वेधतो. किती खरे आहे त्याचे म्हणणे! या आनंद क्षणांच्या निर्मितीची कारणे किती साधीसुधी आहेत. कधी प्रसन्न पहाट पाहिल्यावर, कधी बहरलेला बगीचा पाहून, कधी निसर्गाचे विहंगावलोकन करताना, स्वास्थ्य, कल्पकता, प्रेम, मैत्री, अशा अनेक कारणांनी मिळालेल्या आनंदाची ही वर्णने आहेत. मानवी इतिहास म्हटले की आपण केवळ होऊन गेलेली युद्धे, लढाया, राज्याभिषेक, सत्तांतरे, कटकारस्थाने, हत्या यांच्याच सनावळ्या नोंदवून ठेवत असतो. परंतु मानवी जीवनामध्ये आनंद निर्माण करणार्या गोष्टींची आपण कुठे नोंद ठेवतो? त्यामुळे ज्या लोकांनी ह्या आठवणी लिहून ठेवल्या त्यांच्या त्या वेळच्या आनंदाची प्रचीती आज इतक्या शतकांनंतर देखील जर आपण घेऊ शकत असू, तर तो अनुभव मोलाचा नव्हे काय? मानवी क्षणांचे हे मोल आणि सौंदर्य अनुभवण्यासाठी हे आगळेवेगळे संकलन वाचायलाच हवे.
—–