- नागेश सरदेसाई
(वास्को)
३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुलें यांची १९०वी जयंती साजरी करताना आणि समाजात आज महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करताना पाहून आनंद होत असला तरी ही किमया घडवून आणण्यासाठी सावित्रीबाईंनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं, हे विसरता येणार नाही.
सावित्रीबाई फुले म्हणजे आधुनिक भारतातील एक थोर समाजकार्य करणारे व्यक्तिमत्त्व होय. त्या उत्तम दर्जाच्या कवयित्री आणि शिक्षणतज्ज्ञही होत्या. भारत देशातील त्या प्रथम महिला शिक्षिका म्हणूनही ओळखल्या जातात. महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्याबरोबर महत्त्वाचे कार्य केले. एकोणिसाव्या शतकात भारतामध्ये स्त्रिया शिक्षण घेण्यास पुढे सरसावत नसत. त्यावेळी असलेल्या फिरंगी ब्रिटीश राजवटीच्या काळात सावित्रीबाईंनी नारीशक्तीच्या विकासावर ठोसपणे प्रभाव टाकल्यामुळे त्यांना भारतीय स्त्रीशक्तीच्या जनक म्हणून ओळखले जाते.
सावित्रीबाईंचा जन्म ३ जाने. १८३१ साली नायगाव या सातारा जिल्ह्यातील गावात झाला. लक्ष्मी आणि खंडोजी दाम्पत्याची ती थोरली मुलगी. जातीयवादाच्या काळात त्या माळी कुटुंबातील आणि तेव्हा मुलींचे लग्न लहान वयातच करून देत असत. त्याच परंपरेला अनुसरून नऊ वर्षांच्या वयात तेरा वर्षीय ज्योतिराव फुले यांच्याबरोबर १८४० साली त्या विवाहबंधनात अडकल्या. त्यांचं शिक्षण लग्नानंतरच झालं. प्रारंभीचे वाचनाचे व लिहिण्याचे धडे ज्योतिबांनी त्यांना शिकवले. ३री आणि ४थीची परीक्षा त्यांनी सामान्य शाळेतूनच दिली. त्यांनी अहमदनगरच्या फरार संस्थेतून शिक्षण घेतले.
सावित्रीबाई विद्यादान करण्यास फार इच्छुक होत्या. ज्योतिबांसमवेत त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यावेळी त्यांचं वय फक्त १७ वर्षांचं होतं. त्यांच्या या धाडसी निर्णयाला त्यांच्या कुटुंबाकडून आणि समाजाकडून मदत तर मिळाली नाहीच. पण उस्मान शेख आणि त्यांची बहीण फातिमा यांनी हातभार लावला. या प्रयोगात त्यांना यश मिळालं. बालविवाहाची प्रथा असल्यामुळे बालविधवांचे प्रमाणही वाढू लागले होते. व त्या काळी विधवांचे जीवन फार त्रासदायक होते. त्यांना समाजाकडून फार वाईट वागणूक मिळायची. म्हणून सावित्रीबाईंनी अशा स्त्रियांसाठी एक कायमस्वरुपी जागा शोधून तेथे त्यांच्या संगोपनाची व्यवस्था केली. बलात्कारित आणि गरोदर महिलांची त्यांनी विशेष काळजी घेतली. त्याचबरोबर त्यांच्या मुलांचेही पालनपोषण केले. त्यांनी स्त्रीभृणहत्या थांबवण्याासाठी प्रयत्न केले. तसेच ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ या नावाची एक वास्तु घेऊन बालविवाह आणि सतिप्रथेविरुद्ध एक मोहीम सुरू केली. महिलांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली.
ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी मिळून २४ सप्टेंबर १८७३ साली ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. त्यांनी कित्येक जोडप्यांची निम्म्या खर्चात त्याचप्रमाणे धार्मिक विधींवर जास्त खर्च न करता लग्ने लावून दिलीत. एकामेकांवर विश्वास ठेवून नवरा-बायकोने शपथा घेऊनव कित्येकांचे संसार त्यांनी मांडून दिले. त्यांनी मांग आणि महार लोकांच्या मुलांसाठी तीन शाळा सुरू केल्या, ज्यांना समाजात अस्पृश्य समजलं जायचं. अशा प्रकारे त्यांनी शिक्षणाच्या गंगेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रकारे सुरू ठेवला. १८५२ साली ब्रिटीश फिरंगी राजवटी सरकारने त्यांचा सत्कार करून त्यांना ‘‘उत्तम शिक्षक’’ पुरस्काराने सन्मानित केले. सावित्रीबाईंनी त्याच वर्षी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव होऊन त्या जागृत व्हाव्या हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता. महिलांना विशेष स्थान देऊन त्यांना सामाजिक समस्यांबद्दल माहिती करून देणे असे या संस्थेचे धोरण होते. त्यांनी न्हावी समाजातील लोकांना जागृत करून महिलांचे मुंडण करण्याविरुद्ध बाजू घेण्यास प्रवृत्त केले.
फुले दांपत्याने सुरू केलेल्या तीनही शाळा ब्रिटीश सरकारने १८५८ साली बंद केल्या, त्यास वेगवेगळी कारणं होती. प्रामुख्याने १८५७च्या लढ्यानंतर युरोपियन संस्थांच्या देणग्या कमी झाल्या. तसेच ज्योतिबांनी शाळा प्रशासन समितीला राजिनामा दिला आणि सरकारने आपली मदत काढून घेतली. त्या परिस्थितीतसुद्धा ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी फातिमा शेख समवेत शिक्षणाच्या गंगेचा प्रसार कायम ठेवीत हजारोंच्या संख्येने कष्टकरी आणि उपेक्षित समाजाला शिक्षित करण्याचे कार्य चालूच ठेवले. त्यांनी विशेष भर महिलांच्या शिक्षणावर दिला, ही गोष्ट काही उच्चवर्णियांना मान्य नव्हती. त्यामुळे या दांपत्यास फार त्रास भोगावे लागले. त्यांना धमक्या तसेच मानहानी सहन करावी लागली. शेण, माती आणि अन्य गोष्टी त्यांच्या अंगावर फेकण्यात आल्या. पण त्याही परिस्थितीला त्या सामोर्या गेल्या. त्यांनी आपले ध्येय सोडले नाही. त्यांच्या या प्रवासात फातिमाबरोबर सगुणाबाईही जोडल्या गेल्या. १८५५ साली फुले दांपत्याने रात्रीची शाळा सुरू केली. त्यात शेतकरी तसेच कामगारांना विशेष शिक्षण दिले जात होते. शाळेतील मुलांची संख्या कमी होऊ नये म्हणून मुलांना स्टायफंड दिला. लहान मुलींसाठी त्या प्रेरणास्रोत ठरल्या. त्यांनी मुलींना लेखन आणि चित्रकला या माध्यमांवर भर देण्यासाठी प्रेरित केले. मुक्ता साळवे नावाच्या मुलीचा एक निबंध दलित महिलेच्या जीवनाचा आरसा ठरला. सावित्रीबाईंनी पालक-शिक्षक संघटनेच्या वारंवार बैठका घेऊन त्यांना जागृत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
१८७४ साली फुले दांपत्याने एक मूल दत्तक घेतले. ब्राह्मण विधवा काशीबाई हिच्याकडून मूल दत्तक घेऊन त्यांना समाजाला एक संदेश दिला. त्यामुळे समाज परिवर्तन होण्यात मदत झाली. त्यांचा मुलगा यशवंतराव डॉक्टर झाला. ज्योतिबांनी विधवांचा पुनर्विवाह आणि सावित्रीबाईंनी बालविवाह आणि सतीप्रथेविरुद्ध समाजामध्ये जागृती करण्याची विशेष मोहीम सुरू केली. त्यांनी आपल्याच घरात एक विहीर खणून घेतली व त्याचा फायदा समाजातील शोषित आणि दलित लोकांना करून दिला. सत्यशोधक समाजाच्या कार्यकारिणीमध्ये मुस्लिम, ब्राह्मण, सरकारी अधिकारी आणि वेगवेगळ्या लोकांचा समावेश होता. महिलांना समाजात सन्मानाची वागणूक देणे हा त्यामागील उद्देश होता. २८ नोव्हें. १८९० मध्ये ज्योतिबांच्या निधनानंतर त्यांनी समाजाच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्या हाती घेतली आणि समाजाचे काम पुढे नेण्यात मोलाचा वाटा उचलला. १८७६ च्या दुष्काळाच्या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या काना-कोपर्यात ५२ मोफत जेवण केंद्रे सुरू करून मोलाची भूमिका भजावली. १८३४ साली त्यांनी ‘काव्य फुले’, तसेच १८८२ साली ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या काव्यरचना त्यांनी लिहिल्या.
त्यांच्या मुलांनी समाजात वैद्यकीय सेवा दिल्या. प्लेगच्या साथीच्या दिवसात त्यांनी आणि सावित्रीबाईंनी मिळून एक दवाखाना नालासोपारा, पुणे येथे सुरू करून हजारोंच्या संख्येतील रुग्णांची सेवा केली. हे पुण्याचे काम करत असताना त्यांना प्लेग झाला आणि त्या १० मार्च १८९७ साली स्वर्गवासी झाल्या.एक भव्य स्मारक पुणे महानगरपालिकेने त्यांना समर्पित केले. भारतीय डाक सेवेने १० मार्च १९९२ या दिवशी एक डाक तिकिट त्यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध केले. २०१५ साली पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे करण्यात आले.
३ जानेवारी रोजी त्यांची १९०वी जयंती साजरी करताना आणि समाजात आज महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करताना पाहून आनंद होत असला तरी ही किमया घडवून आणण्यासाठी सावित्रीबाईंनी आपलं जीवन समर्पित केलं. त्यांना लक्ष लक्ष आदरांजली देताना आपण भारतवासी सदैव त्यांच्या ऋणात राहून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करुया.