वागातोर येथे सनबर्न क्लासिक या ईडीएम संगीत महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेल्या हैदराबाद-आंध्रप्रदेश येथील दोघा युवकांच्या संशयास्पद मृत्यूने गोव्यात खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून संशयास्पद मृत्यूप्रकरणी सरकारवर टीका सुरू झाली असून अमलीपदार्थाच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.
हणजूण पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले आहेत. शवविच्छेदनानंतर दोघांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. व्यंकट आणि साईप्रसाद अशी दोघा युवकांची नावे आहेत. दोघेही संगीत महोत्सवात प्रवेश घेण्यासाठी रांगेत थांबले असता चक्कर येऊन खाली कोसळले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
सनबर्न क्लासिक या संगीत महोत्सवाच्या स्थळाजवळ दोघेही कोसळल्याने त्यांना म्हापसा येथील जिल्हा इस्पितळामध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी दोघांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.
संगीत महोत्सवामुळे अमलीपदार्थाचा व्यवहार वाढत असल्याचे आरोप करून कॉंग्रेससह इतर विरोधकांनी संगीत महोत्सवाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. गोव्यात पर्यटकांच्या संख्येत वाढ व्हावी म्हणून संगीत महोत्सवाला मान्यता देण्यात आली. संगीत महोत्सवाच्या ठिकाणी अमलीपदार्थाच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमलीपदार्थ विरोधी विभागातील पोलिसांची नियुक्ती केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली होती.
वागातोर येथे सनबर्न क्लासिक संगीत महोत्सवाला काल शुक्रवार दि. २७ पासून प्रारंभ झाला असून २९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या संगीत महोत्सवाच्या सुरुवातीला दोघांचा संशयास्पद मृत्यूने गोवा हादरला आहे.
कॉंग्रेस, आपची टीका
गोव्यात अमली पदार्थांचा व्यवहार व व्यसन नसल्याचे सांगणार्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे या दोघा पर्यटकांच्या मृत्यूच्या प्रकरणामुळे पितळ उघडे पडले आहे, अशी टीका गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. या पर्यटकांच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील मंत्री तसेच उच्च पदधिकार्याकडून हस्तक्षेप सुरू झाला आहे. गोमेकॉतील डॉक्टरांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता शवविच्छेदन अहवाल तयार करावा, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.
या दोघाही पर्यटकांच्या मृत्यूची निःपक्षपाती चौकशीसाठी करण्याची गरज आहे. संगीत महोसत्वाला मान्यता देऊन निरपराध पर्यटकांचा बळी घेतला जात आहे, अशी टीका आपचे निमंत्रक एल्वीस गोम्स यांनी केली.