आंतराष्ट्रीय मानवाधिकार दिन

0
412
  • प्रा. नागेश सु. सरदेसाई
    (वास्को)

या वर्षीचे म्हणजे २०१९ चे घोषवाक्य आहे – ‘युवक आणि मानव अधिकार’.
असे समजले जाते की युवक हा देशाच्या पाठीचा कणा असतो. भारत देशात ६५% जनता ही वयाच्या ३५ वर्षांखालील असल्यामुळे आपला देश हा तरुण देश म्हणून ओळखला जातो. तरुणाई ही बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा वाटा उचलू शकते, यात काहीच शंका नाही.

दरवर्षी १० डिसेंबर या दिवशी मानवाधिकार दिन मनवतात. युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत १९४८ साली जागतिक मानव अधिकाराचा मसुदा तयार करण्यात आला. ही एक महत्त्वपूर्ण बाब होती कारण मानव जातीकडून मानव अधिकार कधीच काढून घेता येत नाहीत. मानव जीवनाचे अविभाज्य अंग असलेले मानव अधिकार सर्व मनुष्यजातीला त्यांचे धर्म, पंथ, जात, वर्ण इत्यादी वगळता मिळाले पाहिजेत, असे मसुद्यात लिहिलेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ३१७व्या आमसभेत १० डिसेंबर १९५० या दिवशी दरवर्षी जागतिक पातळीवर मानवाधिकार दिवस मनवण्यास परवानगी दिली. त्यानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन या दिवसाचं महत्त्व पटवून दिलं जातं. त्यात सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिरे तसेच परिसंवादाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मानवाधिकाराचे महत्त्व समजावून सांगणे ही आजच्या काळाची गरज आहे. कारण जागतिक पातळीवर मानव अधिकाराचे उल्लंघन करणार्‍या बर्‍याच गोष्टी आज समाजामध्ये घडताना दिसतात.

याव्यतिरिक्त पंचवर्षीय संयुक्त राष्ट्र तसेच नोबेल शांती पुरस्कारांचे वितरणही याच दिवशी केले जाते. सर्वसामान्य जनतेमध्ये या विषयाची जाणीव निर्माण करून देऊन, त्याचे महत्त्व पटवून देऊन समाज सशक्त करणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवर बिगर सरकारी संघटना तसेच सरकारी आस्थापनांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम मानवाधिकार हा केंद्रबिंदू ठरवून केले जातात. राजकीय, सामाजिक, आर्थिक, नागरिक आणि सांस्कृतिक हक्क घेऊन हा मसुदा जरी सर्वसमावेशक असला तरी तो आंतरराष्ट्रीय स्तरावर बंधनकारक नाही. जवळ जवळ साठ मानवाधिकार कायदे हा मसुदा घेऊन निर्माण झाले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेकडून मानवाधिकार आंतरराष्ट्रीय मंचावर सक्षम करण्यासाठी आज सर्व राष्ट्रांच्या मान्यतेची गरज आहे. हा मसुदा आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात करून मानव जीवन कसे समृद्ध करावे या मुद्यावर भर दिला जातो. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त ही संयुक्त राष्ट्राद्वारे निर्माण केलेली सर्वांत मोठी अधिकारिणी आहे. त्या अधिकारिणीच्या वतीने वार्षिक मानवाधिकार दिवसाची संकल्पना आणि कार्यक्रम ठरविण्यात येतात. जगातल्या निरनिराळ्या ठिकाणी मानवीय अधिकारांचे कशाप्रकारे उल्लंघन केले जाते आणि ते संपविण्यासाठी कशा प्रकारे मदत करता येईल, हा या अधिकारिणीचा मुख्य हेतू आहे. जगात स्वातंत्र्यासाठी लढा देत असलेल्या विविध संघटना आणि त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या शासन प्रणाली.. आज जगासमोर हे एक आव्हान आहे. आज मानवाधिकाराचं रक्षण करण्यासाठी विविध अडथळे निर्माण झालेले आहेत. त्यात प्रामुख्याने गरिबी हा मुद्दा अनेक देशांमध्ये मुख्य आहे. सं्‌युक्त राष्ट्र मानवाधिकार मसुदा हा सर्वांत जास्त भाषांमध्ये अनुवादित केलेला मसुदा आहे. मुळात याचा मुख्य उद्देशच जगात सर्व लोकांना मानवाधिकारासंबंधात जाणीव करून देणे हा आहे.

भारतात राष्ट्रीय मानव अधिकार आयोग कायद्यानुसार तयार केलेली यंत्रणा आहे. ती १२ ऑक्टोबर १९९३ साली अस्तित्वात आली. त्याचे सर्वांत पहिले अध्यक्ष होते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (रिटायर्ड) रंगनाथ मिश्रा. त्यानंतर एम. एन. वेंकटचलैय्या, जे. एस. वर्मा, डॉ. आदर्श सेन आनंद, एस. राजेंद्र बाबु यांनी हे पद भूषविले. सध्या ही धुरा सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एल. दत्तु हे सांभाळत आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हा सरकारी कर्मचार्‍यांकडून मानव अधिकाराच्या उल्लंघनाचे तंटे तपासून बघू शकतात. आतंकवादाचे विविध प्रकार आणि त्याशिवाय इतर अनेक प्रकार बघून त्यावर ठोस निर्णय घेणे, तसेच नवे पर्याय सुचवणे या आयोगाच्या मुख्य बाबी आहेत.आज मानवी अधिकारांविषयी वेगवेगळ्या सामाजिक घटकांमध्ये जागृती निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे.

या वर्षीचे म्हणजे २०१९ चे घोषवाक्य आहे – ‘युवक आणि मानव अधिकार’.
असे समजले जाते की युवक हा देशाच्या पाठीचा कणा असतो. भारत देशात ६५% जनता ही वयाच्या ३५ वर्षांखालील असल्यामुळे आपला देश हा तरुण देश म्हणून ओळखला जातो. तरुणाई ही बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा वाटा उचलू शकते, यात काहीच शंका नाही. जागतिक पातळीवर तरुणांमध्ये आज नवीन जिद्द निर्माण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देऊन चालना देणे ही एक महत्त्वाची बाब आहे, आज जगाच्या विकासात युवकांची भागिदारी ही फार मोलाची ठरू शकते. त्या दिशेने तरुणांना एक वैचारिक मंच मिळवून देणे ही काळाची गरज आहे. संयुक्त राष्ट्राच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण मंडळी पुढे येण्याची गरज आज भासते आहे. जगात सकारात्मक बदल घडवून आणणे आणि त्यांना हक्काची जाणीव करून देऊन त्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी त्यांनी करावा, ही महत्त्वाची बाब आहे. समाजामध्ये एक आमूलाग्र बदल घडवून एक ठोस परिपक्व समाज घडवण्याची गोष्ट आम्ही प्राधान्याने समोर आणण्याची गरज आहे.