महाराष्ट्राचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी परळीतील गोपीनाथगडावर आयोजिण्यात आलेल्या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये अखेर पंकजा मुंडे यांनी आपली अस्वस्थता सूचकतेने व्यक्त केली, तर एकनाथ खडसे यांनी रोखठोक शब्दांमध्ये भाजप नेतृत्वाला खडसावले. पंकजांची भाषा सौम्य होती, तर खडसेंची परखड, एवढा फरक सोडला तरी जो घरचा अहेर द्यायचा होता तो त्यांनी व्यवस्थित दिलेला आहे. पक्षामध्ये अस्वस्थ असलेले हे दिग्गज मागासवर्गीय नेते भारतीय जनता पक्ष सोडणार असल्याची जी चर्चा माध्यमांत रंगली होती, तिला पूर्णविराम मिळाला असे जरी म्हणता येत नसले, तरी तूर्त अर्धविराम निश्चितच मिळाला आहे. गोपीनाथ मुंडेंनी जनसामान्यांपर्यंत नेलेला हा पक्ष मूठभर लोकांच्या हाती ठेवू नका हा पंकजांनी दिलेला इशारा असो, अथवा आजचे पक्षाचे जे चित्र आहे ते जनतेला मान्य नाही ही खडसेंनी केलेली कानउघडणी असो, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वापुढे या मागासवर्गीय नेत्यांनी एकप्रकारे आरसा धरला आहे आणि त्याचा दबाव यापुढील पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर निश्चितपणे राहणार आहे. तसा तो राहणे हे पक्षाच्या भल्याचे असेल. महाराष्ट्र भाजपमध्ये सारे आलबेल नाही हे एवढे खुलेपणाने आता बाहेर आलेेले आहे. कालच्या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मंचावर उपस्थित होते. अस्वस्थ नेत्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल, उत्तर शोधलं जाईल वगैरे आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत. त्या आश्वासनांची येणार्या काळात कितपत पूर्तता होते आणि पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांचे आणि त्यांच्यासारख्या नाराज नेत्यांचे राजकीय पुनर्वसन कशा प्रकारे होते त्यावर या नेत्यांची पुढील पावले ठरतील असे एकूण चित्र सध्या समोर आलेले आहे. पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला राज्यव्यापी स्वरूप देण्याचा संकल्प कालच्या कार्यक्रमात बोलून दाखवला. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर त्या औरंगाबादेत लाक्षणिक उपोषणालाही बसणार आहेत. म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आपल्याला बाजूला फेकण्यात आपल्या पक्षांतर्गत हितशत्रूंना यश येऊ नये यासाठी सर्वशक्तिनिशी प्रतिकारार्थ त्या उभ्या ठाकल्या आहेत आणि स्वतःची राज्यस्तरीय नेत्याची प्रतिमा कायम राखू इच्छित आहेत, असा याचा अर्थ आहे. खडसे मात्र अधिक आक्रमकतेने पुढील पावले टाकत आहेत आणि ‘माझा भरवसा धरू नका’ असे त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत जाहीर करून टाकले आहे. या दोन्ही नेत्यांचा रोख अर्थातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भोवतीच्या उच्चवर्णीय कंपूवर असल्याचे त्यांच्या भाषणांतून दिसत होते. भाजप पुन्हा एकदा शेटजी – भटजींच्या हाती गेला आहे अशीच भावना दोन्ही नेत्यांच्या तोंडून प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे व्यक्त झाली आहे. हा आरोप किती खरा किती खोटा हा भाग वेगळा, परंतु पक्षामधील बहुजन घटक पक्षाला दुरावत चाललेला आहे असे जे चित्र या सार्यातून उभे झालेले आहे ते भारतीय जनता पक्षासाठी अतिशय मारक आहे. तोंडावर गोड बोलून पाठीत खंजीर खुपसला गेला, जे घडले ते घडवले गेले, आपोआप पक्ष सोडून जावे म्हणून प्रयत्न चालले आहेत, जातीयवाद चालला आहे वगैरे टीकास्त्रे कालच्या सभेमध्ये प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरीत्या सोडली गेली ती पक्षाशी निगडीत बहुजनसमाजामध्ये अस्वस्थता निर्माण करणारी ठरू शकतात. ‘माणसांकडून चुका झाल्या, पक्षावर राग का काढता?’अशी या अस्वस्थ नेत्यांची समजूत काल चंद्रकांतदादांनी काढली. त्यामुळे पक्षत्यागाचे टोकाचे पाऊल जरी उचलले गेलेले नसले तरी महाराष्ट्र भाजपमध्ये पक्षांतर्गत बेदिली माजली असल्याचे हे सारे निदर्शक आहे. उद्या टोकाचे पाऊल उचलायचे झाले तर कदाचित खडसे त्यात आघाडी घेऊ शकतील, परंतु तशीच वेळ आली तर आपल्यामागून रांग लागेल हाही इशारा पक्षाला या नेत्यांनी दिलेला आहे. भाजपामधील ही खदखद ही केवळ महाराष्ट्रापुरती नाही. राज्याराज्यांमधून पक्षासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तीस तीस, चाळीस चाळीस वर्षे काम केलेले, खस्ता खाल्लेले लोक दुखावलेले आहेत. त्यांच्या व्यथांची दखल पक्षनेतृत्व घेणार आहे की नाही? सत्तेच्या उन्मादात केवळ संख्येची गणिते करीत असताना पक्षाचा निष्ठावंतांचा पाया तर ढासळला जाणार नाही ना याचे चिंतन पक्षामध्ये होणार आहे की नाही? एका वेगळ्या वळणावर भाजपा आज येऊन पोहोचलेला आहे. शून्यातून पक्ष उभा करणारे नेते हळूहळू बाजूला फेकले जात आहेत आणि इतर पक्षांतून आयात केले गेलेले आणि ‘विनेबिलिटी’असलेले संधिसाधू जवळ केले जात आहेत, त्यांच्या प्रस्थापनेसाठी निष्ठावंतांचीच उपेक्षा केली जात आहे असे एक विपरीत चित्र भाजपच्या बाबतीत सध्या निर्माण झालेले आहे. ‘मला तो पक्ष परत पाहिजे’ असे पंकजा मुंडे ज्या पूर्वीच्या पक्षसंघटनेविषयी म्हणाल्या, तो ‘पार्टी विथ द डिफरन्स’ असलेला भाजपा पुन्हा उभा करणे हे भाजप नेतृत्वापुढील या घडीचे खरे आव्हान आहे! त्यासाठी यशाचा जोश आणि जल्लोष बाजूला सारून जरा स्वतःकडे त्रयस्थपणे पाहायला तर हवे!