चोडण शैक्षणिक संस्थेचा सुवर्णमहोत्सव

0
175
  • सौ. मंजुषा सरदेसाई

चोडण बेटावर शैक्षणिक प्रगतीची ज्योत तेवती ठेवणार्‍या चोडण शैक्षणिक संस्थेस या महिन्यात ५० वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने या संस्थेच्या आजवरच्या देदीप्यमान वाटचालीविषयी –

आमच्या चोडण गावात सन १९७० साली समाजसेवक व्हिक्टर सिक्वेरा, जॉन अलबर्ट लोबो, कामिलो फुर्तादो, हेरकुलानो रॉड्रिक्स, रमाकांत शिरोडकर, एम. टी. जोजेफ, तेज बहादूर सिंग आणि शिवराम चोडणकर या सुपुत्रांनी एकत्र येऊन चोडण शिक्षण संस्थेची स्थापना केली. एकेकाळी अनेक साधनसुविधांचा अभाव असलेल्या या खेड्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून चोडण शैक्षणिक संस्थेने गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या वरदहस्ताने एकूण १७५ विद्यार्थ्यांसाठी दयानंद हायस्कूलची स्थापना केली. त्यावेळी इयत्ता पाचवी ते अकरावीसाठी वर्ग सुरू करण्यात आले.

या काळात व्हिक्टर सिक्वेरा हे चोडण शैक्षणिक संस्थेचे प्रथम अध्यक्ष, तेजबहादूर सिंग हे दयानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत झाले. त्यावेळी शाळेसाठी स्वतःची अशी वास्तू नसल्याने या समितीने गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांची भेट घेऊन जवळच असलेल्या इमारतीची मागणी केली आणि भाऊसाहेबांनी ती मागणी मान्य करून सदर इमारत उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले. दि. ३० जून १९७८ रोजी तेज बहादूर सिंग संस्थेचे अध्यक्ष बनले.

कालांतराने सन १९७१ साली प्रेमानंद म्हांब्रे हे चोडण शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून नियुक्त झाले व दयानंद हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणूनही रुजू झाले. शाळेतील वाढत्या संख्येमुळे सन १९७४ साली चोडण शैक्षणिक संस्थेने दयानंद हायस्कूलच्या नवीन (स्वतंत्र) वास्तूसाठी चोडण कोमुनिदादसमोर ३००० चौ.मी.च्या भूखंडासाठी (जागेसाठी) रीतसर अर्ज करून ती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि ते सफलही झाले. दि. २८ जुलै १९८६ साली या शाळेसाठी जागा मंजूर झाली. पुढे २८ जुलै संस्थेने शाळेच्या बांधकामासाठी चोडण पंचायतीकडून रीतसर परवाना मिळविला. मार्च १९९० रोजीच्या शुभमुहूर्तावर दयानंद हायस्कूलच्या बांधकामाचे भूमिपूजन होऊन मार्च १९९४ साली दयानंद हायस्कूलची वास्तू उभी झाली.

संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे, ‘इवलेसे रोप लावियले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी’ या ओवीप्रमाणे चोडण शैक्षणिक संस्थेने जून १९९४ साली रघुवीर आणि प्रेमावती साळकर नावे उच्च माध्यमिक विद्यालयाची सुरुवात करून त्यात कला आणि वाणिज्य अशा दोन शाखा उघडल्या. त्यास चोडण तसेच जवळपासच्या पालक तसेच विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद लाभला.

दि. १ सप्टेंबर १९९४ साली मुख्याध्यापक तेज बहादूर सिंग हे निवृत्त होऊन त्यांच्या जागी मुख्याध्यापक म्हणून प्रेमानंद पं. म्हांब्रे यांनी पदभार सांभाळला. त्याकाळात गावचे एक थोर सुपुत्र तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. काशिनाथ महाले हे चोडण शैक्षणिक संस्थेचे नवीन अध्यक्ष बनले. दि. ५ सप्टेंबर, १९९४ रोजी गोव्याचे तत्कालीन शिक्षणमंत्री विनयकुमार उसगावकर यांच्या शुभहस्ते शाळेचे उद्घाटन झाले.

आधुनिक युगात संगणक हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे आणि यापासून गावातील मुले वंचित राहू नयेत या उदात्त हेतूने दि. २४ मे १९९६ रोजी शाळेत संगणक कक्षाची स्थापना झाली. यासाठी खासदार हरीश झांट्ये यांनी या कक्षाचे उद्घाटन केले. त्यांनी संस्थेला भरभरून मदत केली. आपल्या खासदार निधीतून शाळेला ३ संगणक व १ प्रिंटर दिला. जून १९९६ रोजी संस्थेने इंग्रजी शिशूवाटिका व बालवर्ग एक अशा दोन वर्गांना सुरुवात केली. सन १९९७ साली संस्थेच्या रघुवीर आणि प्रेमावती साळकर उच्च माध्यमिक शाळेसाठी सरकारची मान्यता प्राप्त झाली आणि दि. १६ जुलै २००२ रोजी उच्च माध्यमिकची मुहूर्तमेढ रोवली गेली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व माननीय वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले.

दि. ९ एप्रिल २००४ साली रमाकांत शिरोडकर हे चोडण शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष बनले. दि. २३ एप्रिल २००५ रोजी उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक, माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर, माजी मुख्यमंत्री कै. शशिकलाताई काकोडकर यांच्याहस्ते चोडण शैक्षणिक संस्थेच्या शिक्षण संकुलाचे उद्घाटन झाले.

आज चोडण शैक्षणिक संस्था संचालित दयानंद हायस्कुलास ५० वर्षे पूर्ण होत असल्याने डिसेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० दरम्यान सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून विविध शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनुसार मोठ्या थाटात साजरा होत आहे. तेव्हा संस्थेची पुढील वाटचाल यशस्वी तसेच भरभराटीची होवो, हीच सदिच्छा!