>> आंदोलनाचा इशारा
नुशी नलिनी हे नाफ्तावाहू जहाज पाण्यावर तरंगू लागल्याने बुधवारी रात्री टगांनी ओढून मुरगाव बंदरात धक्का क्र. ८ वर आणून ठेवले. या जहाजातील नाफ्ता रस्तामार्गे इतर ठिकाणी नेण्यात येणार असल्याचे एमपीटी अध्यक्षांनी सांगितले आहे. मात्र मुरगाव बंदरातून हे जहाज हटवावे अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
गेल्या दीड महिन्यापूर्वी समुद्रात झालेल्या चक्रीवादळाच्या प्रवाहात मुरगाव बंदरात ठेवलेले नलिनी हे जहाज २४ ऑक्टोबर रोजी भरकटत येऊन दोनापावल येथील एका खडकाळ भागात रुतले होते. ते जहाज त्या ठिकाणीहून बाहेर काढण्यासाठी नेदरलॅण्ड येथील मास्टर मरिना या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. या कंपनीने ते जहाज बाहेर काढण्यासाठी टग जहाजाचा वापर करून जहाज या खडकाळ भागातून पुन्हा तरंगवण्यात बुधवारी रात्री यश मिळवले व ते आता मुरगाव बंदरात आणले आहे.
दरम्या सदर नाफ्ता जेटी येथील टाक्यांमध्ये साठविण्यास नगरविकास मंत्री व मुरगांवमध्ये आमदार मिलिंद नाईक यांनी मंगळवारी आमचा विरोध असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, याविषयी मंत्री मिलिंद नाईक यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणी एमपीटी अध्यक्षांना जबाबदार धरले आहे. आम्ही मुरगाववासीय नाफ्ता सडा येथील टाक्यांत साठवण्यास कोणत्याही परिस्थितीत देणार नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.
कॉंग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनी या जहाजप्रकरणी कारणीभूत असलेल्या मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्याच वरदहस्ताने हे नाट्य चालले असून आता ते जनतेसमोर देखावा करत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगून सडा येथे नाफ्ता साठवणूकीस त्यांनीही विरोध दर्शविला आहे.
शिपिंग महासंचालकांना चौकशीची सूचना
गोवा सरकारने शिपिंग महासंचालकांना (डीजी) नाफ्तावाहू नलिनी जहाजप्रकरणी चौकशी करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
वास्को येथील मुरगाव पतन न्यास (एमपीटी) शिपिंग महासंचालकांच्या कक्षेत येत आहे. त्यामुळे महासंचालकांना चौकशी करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
नलिनी हे मानवविरहीत नाफ्तावाहू जहाज मुरगाव बंदरात आणण्यासाठी एमपीटीने मान्यता दिली होती. नाफ्तावाहू जहाजाबाबत वाद निर्माण झाल्याने बेवारस स्थितीत ठेवण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्यात अरबी समुद्रात झालेल्या चक्री वादळामुळे नलिनी हे जहाज भरकटत दोनापावल येथे येऊन खडक व चिखलात रुतले होते. सदर जहाज काढण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागला. या नाफ्तावाहू जहाज प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते.