राज्यात नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी जानेवारी महिन्याच्या अखेरपासून सुरू केली जाणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकाराशी बोलताना काल दिली.
राज्यात रस्ता सुरक्षा महत्त्वाची आहे. रस्ते योग्य नसल्याने अपघात होतात. केंद्र सरकारने नवीन मोटर वाहन कायदा लागू करण्याचा निर्देश सर्व राज्यांना दिलेला आहे. तथापि, राज्यातील खराब रस्त्यांमुळे नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. येत्या १ जानेवारी २०२० पासून नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले होते, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
राज्य रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीत रस्ता सुरक्षेवर चर्चा करण्यात आली. बैठकीत रस्ता सुरक्षेसाठी विविध विधायक सूचना करण्यात आल्या. त्यांचे पालन केल्यानंतर नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ठिकठिकाणी वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी सूचना फलक व इतर सुरक्षा उपाययोजना हाती घेतली जाणार आहे. बांधकाम खात्याला विविध ठिकाणी सूचना फलक व इतर आवश्यक उपाययोजना एक महिन्यात पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. पंचायत क्षेत्रात आवश्यक सूचना फलक लावण्याचे काम पंचायतींना दिले जाणार आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
नवीन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सर्वोच्च न्यायालयात ३१ मार्चपूर्वी अहवाल सादर करण्याची गरज आहे. वाहतूक नियमभंग प्रकरणी दंडाच्या शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे त्यात कपात करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गुदिन्हो म्हणाले.