पथ्य, अपथ्य, कुपथ्य विचार

0
591
  •  रमेश सप्रे

पथ्य-अपथ्य-कुपथ्य हा जरी आहाराचा विचार असला आणि आहार प्रामुख्यानं पोटाचा असला तरी डोळे, कान, मन-मेंदू यांचाही आहार असतो. तिथंही ज्यामुळे व्यक्तीचं हित साधलं ते पथ्यकर आणि नाही ते अपथ्यकर किंवा कुपथ्यकर मानायला हवं.

 

काही वर्षांपूर्वी एक हिंदी चित्रपट खूप गाजला होता- ‘मैं हूँ ना’ या नावासमोर कोणतंही विरामचिन्ह नव्हतं. म्हणजे हा उद्गारही असू शकतो किंवा प्रश्‍नचिन्ह किंवा साधं वाक्य. पण यात एक आश्‍वासन मात्र होतं.
जसं युुध्दाच्या वेळी अर्जुनाला काहीही करायला सांगताना ‘तू परिणामांची चिंता करू नकोस, मी आहे ना?’ या आश्‍वासक शब्दांमुळे युद्धापूर्वी मोहग्रस्त- शोकग्रस्त झालेला, काय करावं हे न कळल्यामुळे गोंधळून गेलेला (किंकर्तव्यमूढ) अर्जुन युध्द सुरू झाल्यावर बिलकूल डळमळला किंवा डगमगला नाही.

‘मैं हूँ ना’ हे वाक्य गमतीने डॉक्टर-पेशंट म्हणजे वैद्य- रुग्ण यांच्यासंदर्भात वापरलं जातं. पूर्वी औैषधांबरोबर हे खाऊ नकोस, ते खाणं टाळ’ असं सांगितलं जात असे. आज जशी डॉक्टर औषधांची भलीमोठी यादी देतात तशी पूर्वी पथ्य-अपथ्यविषयक सूचनांची दिली जाई. आज डॉक्टरांचा पथ्यांवर तेवढा भर राहिलेला नाही. कारण समजा औषधांच्या दुष्परिणामांमुळे (साइड इफेक्ट्‌स) रोग्याला त्रास होऊ लागला तर डॉक्टरांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काढलेले उद्गार असतात- ‘मैं हूँ ना?’ काहीही झालं तरी परत परत माझ्याकडे ये, मी आहेच ना रे!’

पूर्वी एक किस्सा खूप सांगितला जायचा. एक लक्षात ठेवायला हवं की किस्सा हा प्रत्यक्ष घडलेला प्रसंग असो किंवा नसो, तो एखादी महत्त्वाची गोष्ट सुचवतोच. तर एक ज्येष्ठ डॉक्टर परदेशाला जायला निघतात. बरेच दिवस ते बाहेर राहणार असतात. त्यांचा मुलगाही परदेशात डॉक्टरीचं उच्च शिक्षण घेऊन परतला होता. त्याचेकडे आपल्या अनुपस्थितीत आपले शेकडो रुग्ण तपासण्याची जबाबदारी देण्यात आली. रोग्यांनाही त्याची कल्पना दिली गेली. डॉक्टरांचा मुलगा रोगी तपासू लागला. बरेच दिवस अनेक देशांची यात्रा करून डॉक्टर परतले. नंतर आपल्या रोग्यांना तपासायला गेल्यावर त्यांना अगदी मोजकेच रुग्ण दिसले. मुलाकडे चौकशी केल्यावर तो म्हणाला, ‘योग्य ती औषधं देऊन, इलाज करून मी त्यांना बरे केले.’ ज्येष्ठ डॉक्टर कपाळावर हात मारत म्हणाले, ‘मुर्खा, असं बरं करायचं नसतं. या रोग्यांच्याच बळावर मी तुला परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवलं होतं ना रे!’ हे ऐकून मुलाच्या चेहर्‍यावर विचित्र भाव निर्माण झाले.
एक मजेदार सुभाषित आहे-
चितां प्रज्वलितां दृष्ट्‌वा वैद्यो विस्मयमागत:|
नाहं गतो न मे भ्राता, कस्येदं हस्तलाघवम् ॥
म्हणजे, जळणारी चिता पहून वैद्य आश्‍चर्यचकित झाला. त्याच्या मनात विचार आला, ‘मी किंवा माझा व्यवसायबंधूही याच्या उपचारासाठी गेलो नाही मग हे हस्तकौशल्य कुणाचे आहे?’ म्हणजे आम्ही वैद्यांनी उपचार केला नाही तरी हा मेला कसा?- यातला गुप्त अर्थ लक्षात आला असेलच.
आणखी एक तर यापेक्षा स्पष्ट अर्थाचं सुभाषित आहे-
वैद्यराज नमोस्तुभ्यं क्षपिताशेष मानव|
त्वयि विन्यस्तभारोऽज्यं कृतांत: सुखमेधते॥
‘शाड़र्गधर पध्दति’ या वैद्यकशास्त्रविषयक ग्रंथातीलच हे सुवचन आहे. अर्थ- हे वैद्यराजा, तुला नमस्कार. कारण आपलं मानवसंहाराचं कार्य तुझ्यावर सोपवून यमराज (मृत्युदेव) सुखानं राहतात.

खरंच आहे, वैद्य जगवतो तशीच चूक झाली तर रुग्ण मरतोदेखील. हल्ली वैद्य म्हणजे डॉक्टर जगवतात, पण नागवतातही. याला काही सन्माननीय अपवाद असतीलही, पण एकूण चित्र कसं दिसतं? डॉक्टर आलेल्या रुग्णाला म्हणतात- ‘आजारी पडल्यावर तू माझ्याकडे ये. माझ्या औषधांनी तू कदाचित बरा होणारही नाहीस. पण भिऊ नकोस रुग्णा, मैं हूँ ना!’

एक गमतीची म्हण इंग्रजीत आहे- ‘डॉक्टरकडे गेलास तर एका आठवड्यात बरा होशील, नाहीतर तुला बरं व्हायला साऽत दिवस लागतील.’ हा फक्त विनोदच आहे का? असाही प्रकार आढळतो की जेव्हा रोगी तक्रार करत डॉक्टरला म्हणतो, ‘डॉक्टर, तुम्ही दिलेल्या औषधांचे साइड इफेक्टस् खूप जाणवताहेत. काय करू?’
यावर डॉक्टर शांतपणे म्हणतात- ‘साइड इफेक्ट्‌स तरी जाणवतात ना, मग औषधं चालू ठेव. कदाचित एक दिवस इफेक्ट मिळूनही जाईल.’ असो. अशीही अनेक सुभाषितं आहेत ज्यात डॉक्टरांचं जीव वाचवणारं, रोग्याच्या वेदना कमी करणारं कार्य पाहून म्हटलं जातं-
महाभारतातलं सुवचन आहे-
प्राज्ञोपसेविनं वैद्यं धार्मिक प्रियदर्शिनम्‌|
मित्रपंतं सुवाक्यं च सुहृदं परिपालयेत्‌॥
म्हणजे- विद्वान, प्रतिष्ठित अशांची सेवा करणारा, धर्माचरण करणारा, लोकांचे हित पाहणारा (प्रियदर्शिनम्) किंवा ज्याला पाहिल्यावर रुग्णांना बरे वाटते असा दिसणारा, रोगीमंडळींना मित्र वाटणारा, मधुवचन बोलणारा (मधुरवाणी असलेला), सर्वांवर अगदी हृदयापासून प्रेम करणारा असा वैद्य राजानं आपल्याजवळ (राजवैद्य म्हणून) ठेवावा. इथं आदर्श वैद्याची अनेक लक्षणं सांगितलीयत.
वैद्यो नारायण: स्वयम्‌|
वैद्याला साक्षात् परमेश्‍वरही मानलेलं आहे. अनेकांना असा अनुभवही येतो. आपला विषय आहे वैद्य आणि दिलेल्या किंवा सुचवलेल्या पथ्याचा. आरंभीच लक्षात ठेवलेलं बरं की पथ्यकारक किंवा अपथ्यकारक असे पदार्थ नसतात, तर विशिष्ट रोगात विशिष्ट रुग्णाला काही पदार्थ टाळायला सांगितले जातात, तर काही मुद्दाम खायला सांगितले जातात. मुख्य म्हणजे, एका रोग्याला जे पथ्य असतं ते दुसर्‍याला अपथ्य असू शकतं. म्हणतात ना – एकाचं अन्न हे दुसर्‍यासाठी विष असू शकतं.
म्हणून- रोग्यासाठी हितकारक पदार्थ म्हणजे पथ्य आणि अहितकारक पदार्थ हे अपथ्य! कुपथ्य म्हणजे मात्र सर्वांत अहितकारक पदार्थ जे हल्ली रस्त्याच्या कडेला किंवा हॉटेलात किंवा चकचकीत पिशव्यातून (चिप्स, वेफर्स इ.) मिळतात नि आबालवृद्ध मंडळी ते चवीनं खातात.
वैद्य महर्षी चरकानं म्हटलंय-
पथ्यं पथोऽनपेतं यद् यच्चोक्तं मनस: प्रियम्‌|
यच्चप्रियमपथ्यं च नियतं तन्त लक्षयेत्‌॥
जीवनात जे इंद्रियांच्या आरोग्यासाठी हितकर (शरीराच्या विविध मार्गांना, अभिसरण, श्‍वसन, पचन इ. संस्थांना अनुकूल) तसेच मनाच्या स्वास्थ्यासाठी कल्याणकारक असते त्याला पथ्य असे म्हणतात. तसेच जे नेहमी आणि निश्‍चित अहितकर किंवा प्रतिकूल असते अशी कोणतीही वस्तू असत नाही. याचा अर्थ पथ्यकारक किंवा अपथ्यकारक अशा खाद्यवस्तू नसतात. एकाला अनुकूल असलेला पदार्थ दुसर्‍याला प्रतिकूल असू शकतो. एखाद्याला जे शक्तिवर्धक अन्न असतं त्याचं दुसर्‍याला वावडं (ऍलर्जी) असू शकतं.

हा फार महत्त्वाचा विचार आहे. ‘सब घोडे बारा टके’ असं म्हणून किंवा मानून जी औषधं बाजारात उत्पादन केली जातात ती सगळ्यांसाठी सारखीच परिणामकारक नसतात. व्यावहारिक जीवनातही मोलाचं असं एक सूत्र सांगणारं सुभाजित-
अप्रियस्यापि पथ्यस्य परिणाम: सुखावह:|
वक्ता श्रोता च यत्रास्ति रमन्ते तत्र संपद:॥
कितीही नावडणारी गोष्ट पथ्य म्हणून घेतली तर परिणामी ती हितकारकच असते. हे केवळ आरोग्य आणि औषधं यांबाबतीतच खरं नाही तर अप्रिय पण हिताचं सांगणारे वक्ते नि ऐकणारे श्रोते जिथं असतात तिथं लक्ष्मीचा (संपदेचा) नित्य वास असतो. ही लक्ष्मी म्हणजे आरोग्यलक्ष्मी! ज्याला ‘आरोग्यं धनसंपदा’ किंवा ‘हेल्थ इज वेल्थ’ असं म्हणतात.

आजारी पडल्यावर पथ्य एवढा संकुचित विचार नसावा. कोणत्याही खाद्यपदार्थांचा अतिरेक टाळायला हवा. जिभेची चटक आणि चोचले हे बर्‍याचवेळा अनारोग्याकडेच नेतात. म्हणून आपला आहार ठरवताना पौष्टिक पदार्थांचा विचार करणं आणि सर्वांना अनिष्ट असे पदार्थ वर्ज्य करणं आवश्यक असतं.
पथ्यं भुक्त्वा तु यो मोहाद् दुष्टमश्‍नाति भोजनम्‌|
परिणामं अविज्ञाय तदन्तं तस्य जीवितम्‌॥ (महाभारत)
अर्थ : पथ्यकर म्हणजे हितकर जेवण त्यागून परिणामांचा विचार न करता जो केवळ मोहामुळे म्हणजे चटक लागली म्हणून, चवदार चमचमीत आहे म्हणून अपथ्यकर भोजन ग्रहण करतो तो जणू मृत्यूला आमंत्रण देतो. त्याचं जीवन अकाली संपतं. कधीकधी आपला मुद्दा पटवण्यासाठी समांतर किंवा विरोधी उदाहरणं दिली जातात. हेच पहा ना-
अव्याकरणं अधीतं, भिन्नद्रोण्यां तरंगिणीतरणम्‌|
भेणजं अपथ्यसहितं त्रयं इदं अकृतं, कृतं न वरम्‌॥
तीन गोष्टी या करण्यापेक्षा न करणेच कल्याणकारी असते? कोणत्या त्या तीन गोष्टी- व्याकरणाच्या ज्ञानाशिवाय अध्ययन करणं, फुटलेल्या नावेतून नदी पार करणं आणि पथ्य न पाळता औषध घेत राहणं या त्या तीन गोष्टी. या तिन्हींमुळे आपली हानीच होते.
एक मार्मिक एका ओळीचं सुवचन आहे, पण अर्थपूर्ण मात्र जरूर आहे.
यदि अपथ्यं किं औषध्या, यदि पथ्यं कि औषधै:॥
पथ्याप्रमाणे विधिनिषेध (डूज अँड डोन्टस्) पाळला नाही तर औषधं घेऊन काम लाभ होणार? आणि जर नियमितपणे पथ्य पाळलं तर औषधांची गरजच पडणार नाही. शेवटी एक निराळा विचार.
अपथ्य करून, अरबटचरबट काहीही खाऊन (कुपथ्य करून) खार्‍याबाबत स्वैर वागून, व्यसनं लागूनही ज्यांचं आरोग्य शाबूत राहतं तो केवळ एक योगायोग असतो. कावळा बसायला नि फांदी मोडायला एकच गाठ पडणं किंवा एखाद्या कीटकानं लाकूड कुडतडल्यामुळे त्यात दिसणारी अक्षरं किंवा आकार याचा भास होणं याप्रमाणे कसंही अतिरेकी वागणार्‍या माणसाचं आरोग्य टिकणं असतं.

पथ्य-अपथ्य-कुपथ्य हा जरी आहाराचा विचार असला आणि आहार प्रामुख्यानं पोटाचा असला तरी डोळे, कान, मन-मेंदू यांचाही आहार असतो. तिथंही ज्यामुळे व्यक्तीचं हित साधलं ते पथ्यकर आणि नाही ते अपथ्यकर किंवा कुपथ्यकर मानायला हवं.
दिसणार्‍या माणसापेक्षा न दिसणारा माणूसच महत्त्वाचा असतो. हिमनगाच्या टोकासारखा (टिप ऑफ आइसबर्ग) म्हणजे इंद्रियांपेक्षा मनबुद्धी महत्त्वाची असते. मनापेक्षा अंतर्मन महत्त्वाचं असतं. संपूर्ण आरोग्याचा विचार करताना या सार्‍यांचा विचारही करावा लागतो. असं पूर्ण आरोग्य असणारी व्यक्ती दुर्मीळच असणार. निळ्या चंद्रासारखी (ब्ल्यू मून) किंवा आकाशकमळांसारखी (स्काय लोट्‌स)!