– डॉ. सोमनाथ कोमरपंत
अवतीभोवतीच्या सामाजिक रचनेतील विषमता, जातिव्यवस्था, अज्ञान आणि स्त्रीला नगण्य लेखण्याची वृत्ती पाहून ज्यांचा आत्मा अस्वस्थ झाला आणि त्यामुळे आपल्या मानसप्रतिक्रिया ज्यांनी उत्स्फूर्तपणे, मनस्वी वृत्तीने आणि जळजळीत शब्दांत व्यक्त केल्या त्या तेजस्वी लेखणीच्या महापुरुषाच्या आठवणींनी कृतज्ञतेने नतमस्तक व्हावे…
ध्येयनिष्ठ आणि समर्पणशील वृत्तीने आपले संपूर्ण जीवन सामाजिक सुधारणेसाठी झोकून दिलेल्या विचारवंतांमध्ये प्रिन्सिपल गोपाळ गणेश आगरकर यांची अग्रक्रमाने गणना करावी लागेल. अवतीभोवतीच्या सामाजिक रचनेतील विषमता, जातिव्यवस्था, अज्ञान आणि स्त्रीला नगण्य लेखण्याची वृत्ती पाहून ज्यांचा आत्मा अस्वस्थ झाला आणि त्यामुळे आपल्या मानसप्रतिक्रिया ज्यांनी उत्स्फूर्तपणे, मनस्वी वृत्तीने आणि जळजळीत शब्दांत व्यक्त केल्या त्या तेजस्वी लेखणीच्या महापुरुषाच्या आठवणींनी कृतज्ञतेने नतमस्तक व्हावे… शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच्या समाजपुरुषासमोर जे द्रष्टेपणाने उद्गार काढले होते त्या समाजस्थितीत थोडासा अपवाद वगळता आमूलाग्र बदल झालेला नाही याबद्दल खंत वाटावी… आपण अजूनही नर्मदेतील गोटे कसे राहिलो याविषयी अंतर्मुख होऊन विचार करावा… संघर्षावाचून गती नाही आणि गतीवाचून जीवन नाही याचा द्रष्टेपणाने विचार करणारा हा प्रज्ञावंत होता. महाराष्ट्रातील आणि बंगालमधील प्रबोधनपर्व त्याकाळातील नवशिक्षित तरुणांनी आपल्या कर्तृत्वाने निर्माण केले होते.
माणसाला कृतिप्रवण करायला विचार महत्त्वाचा असतो. तो समाजमानसात रुजावा लागतो. हळूहळू विचाराचे रूपांतर आचारात व्हावे लागते. समानधर्मी लोकांच्या पचनी हे आचार-विचार पडावे लागतात. अशा प्रकारच्या अभिसरणप्रक्रियेमुळे समाजमन गतिमान व्हायला लागते. अठरापगड वृत्तिप्रवृत्तींनी व्यापलेल्या आणि अजगरासारख्या सुस्त होऊन पडलेल्या भारतीय समाजाला उत्थानाची दिशा दाखविणारी माणसे अवघीच लाभली. केवळ राजकीय पारतंत्र्यच नव्हे तर जीवनातील सर्वंकष पारतंत्र्याला कारणीभूत ठरलेले काही घटक होते. त्यातील गतानुगतिकता हा सर्वांत मोठा अवगुण होता. ‘ठेविलें अनंते तैसेंचि रहावे|’ ही वृत्ती किती तिरस्करणीय असते, तिचे स्थायी भावात कसे रूपांतर होते हे आम्हाला कळलेच नव्हते. आगरकरांसारख्या धन्वन्तरीला ते लवकर कळले. म्हणून अर्धांगविगलित भारतीय समाजपुरुषाला ऐहिक सुखवर्धनाची प्रेरणा पुढे नेऊ शकेल असे त्यांनी निक्षून सांगितले.
जीवनाच्या सम्यक अंगांचे आकलन आगरकरांना बालपणापासून झाले होते. गरिबीचे दुःख त्यांनी स्वतः भोगले होते. स्त्रियांच्या जीवनातील यातनापर्व जवळून पाहिले होते. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानमय प्रकाशाकडे जाताना खडतर साधना कशी करावी याचा वस्तुपाठ त्यांनी गिरवला होता. त्यांची बौद्धिक क्षमता तोलामोलाची होती. भारतीय परंपरेचे परिशीलन त्यांनी समग्रतेने केलेले होतेच. जॉन स्टुअर्ट, मिल्ल, स्पेन्सर यांचे निबंधवाङ्मय त्यांनी अभ्यासले होते. गिबन हा त्यांचा आवडता इतिहासकार. फ्रेंच राज्यक्रांतीला मूलप्रेरणा देणार्या रुसो, व्हॉलतेर, दिदेरो, मॉंटेस्न्यू आदी विचारवंतांचे साहित्य त्यांनी वाचले होते. मोर्लेच्या लेखनाचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला होता. पौर्वात्य आणि पाश्चात्त्य वाङ्मयाच्या दोहनातून आलेल्या संतुलित विचारसरणीमुळे आगरकरांच्या बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. त्यांची सत्यान्वेषी वृत्ती निरंतर कायम राहिली. त्यामुळे आयुष्यातील व्यक्तीविरुद्ध समाज या भीषण संघर्षात त्यांनी आपल्या ध्येयमार्गात चलबिचल होऊ दिली नाही. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी आपल्या ‘माझे चिंतन’ या ग्रंथातील ‘विश्वाविरुद्ध’ या निबंधात या मानसिक ताणाचे हुबेहूब चित्र उभे केले आहे. आपला संघर्ष समाजाशी नसून समाजातील अनिष्ट प्रवृत्तींविरुद्ध आहे याची खात्री आगरकरांना पटलेली होती. म्हणूनच ‘महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र’ आणि ‘इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार’ या अग्रलेखांसारखे जाज्वल्य मनोवृत्तीचे लेखन ते करू शकले. ‘महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र’ या अग्रलेखात ः
उत्पत्स्येऽस्ति मम कोपि समानधर्मा|
कालोह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी॥
या भवभूतिवचनाचा त्यांनी केलेल्या पुनरुच्चारातून त्यांच्या मनुष्य म्हणून जगण्याच्या धारणेवर आणि आंतरिक निष्ठेवर प्रकाश पडतो. त्यांच्या या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन ‘केसरी’मधून सात वर्षे आणि ‘सुधारक’मधून सात वर्षे अव्याहतपणे त्यांनी मनस्वी वृत्तीने केलेल्या लेखनातून घडते. आगरकर रुक्ष मनोवृत्तीचे नव्हते. जीवनातील रूप-रस-रंग-गंध-स्पर्श- संवेदनांचा स्पर्श त्यांनी आपल्या लेखनाला होऊ दिला. त्यांनी मानवी मनाला सर्वांगस्पर्श होऊ दिला हे त्यांनी हाताळलेल्या विविध विषयांवरून कळून येते. सामाजिक रचना हा आपल्या जीवनाचा मूळ पाया असल्यामुळे तो बळकट व्हायला हवा हे त्यांनी प्रतिपादन करणे हे क्रमप्राप्त होतेच. पण आपल्या सामाजिक रचनेत धर्मकल्पना कोठून आली, देवतोत्पत्ती कशी झाली, मूर्तिपूजा कशी आली, वेडीवाकडी कर्मकांडे कशी काय शिरली यांची मीमांसा होणेही आवश्यक होते. आपल्या समाजातील विवाहपद्धती आणि तिच्यातून निर्माण झालेल्या दोषांसंबंधी सडेतोडपणे लिहिणे आवश्यक होते. आगरकरांनी समाजमनस्क वृत्तीने हे सारे निष्ठापूर्वक केले. त्यासाठी वार झेलले. ‘संमतीचे वय आणि जुन्या लोकांचा खोटेपणा’, ‘संमतिविलास धर्मशास्त्र बाधक नाही’, ‘होऊंच द्या तर दोन हात’, ‘ग्रामण्यप्रकरण’, ‘सोंवळ्याची मीमांसा’, ‘आमचें अजून ग्रहण सुटलें नाही’ आणि ‘पांचगन्याचा हंगाम’ यांसारखे अग्रलेख त्यांनी लिहिले. स्त्रियांच्या प्रश्नांकडे त्यांनी अगत्याने लक्ष पुरविले. या दृष्टीने त्यांनी लिहिलेले ‘स्त्रियांस चरितार्थसंपादक शिक्षण देण्याची आवश्यकता’, ‘मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता’, ‘स्त्रियांस वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे की नाही?’ आणि ‘स्त्री-पुरुषांना एकच शिक्षण द्यावे व तेंहि एकत्र द्यावें!’ हे अग्रलेख महत्त्वाचे ठरतात.
हिंदुस्थानच्या तत्कालीन आर्थिक स्थितीसंंबंधी आगरकरांनी मूलगामी स्वरूपाचे चिंतन केले होते. यासंदर्भात त्यांनी लिहिलेले ‘तीन अर्थशास्त्रे’, ‘इंग्रजी राज्याची उलट बाजू अथवा आमचें घोर दारिद्य्र’, ‘हिंदुस्थानास क्षय लागला’, ‘वाचाल तर चकित व्हाल!’, ‘घ्या, पण त्याला काही धरबंद असूं द्या’, ‘हिंदुस्थानांतील अन्नान्नदशेचे दुष्परिणाम’, ‘हिंदुस्थानची तिजोरी आणि घाटत असलेला अन्याय’, ‘समाजोत्कर्षाचा एक मुख्य घटक (व्यापारवृद्धि)’, ‘भांडवल गेलें, व्यापार गेला!’आणि ‘हिच्या नावानेहि तीच रड’ हे अग्रलेख उल्लेखनीय आहेत. ब्रिटिश राजवटीत आर्थिकदृष्ट्या एतद्देशीयांची कंगाल परिस्थिती झालेली होती, याकडे आगरकरांनी लक्ष वेधलेले आहे.
‘आधी राजकीय की आधी सामाजिक?’ या प्रश्नावरून लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यामध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले. सारासार विवेकानंतर असे दिसून येते की या दोघांच्या विचारसरणीत तथ्य होते; पण आपल्या सामाजिक समस्यांच्या मुळाशी गेल्यानंतर आगरकरांची भूमिका अधिक उचित वाटायला लागते. कारण राज्यशकट पेलण्यासाठी सक्षम समाजधारणेची आवश्यकता असते. तीच जर सदोष असेल, ठिसूळ असेल तर वरचा डोलारा टिकेल कसा? स्वतंत्र प्रज्ञा आणि स्वतंत्र मन असल्याशिवाय समाजउभारणीच्या विधायक कार्याला मोल प्राप्त होत नाही याचा मूलभूत विचार आगरकरांसारख्या समाजधुरिणाने केेलेला होता. त्यांना आपले कच्चे दुवे ज्ञात होते.
आगरकरांच्या चिंतनप्रक्रियेत ज्ञानाधिष्ठित परिपूर्ण मानवाविषयीचे आणि अभिरुचिसंपन्न समाजाविषयीचे स्वप्न तरळत होते. राजकीय पारतंत्र्याच्या काळात त्यांनी सर्वंकष उन्नतीचा पाया म्हणून वाचनाची महती सांगितली आहे. ज्ञानाची महत्ता अधोरेखित केली आहे. या दृष्टीने त्यांचे ‘वाचन’ आणि ‘ज्ञान’ हे निबंध आवर्जून वाचण्यासारखे आहेत. सुसंस्कृत समाजात साहित्याची अभिरुची जपली जाणे किती आवश्यक आहे आणि त्यासाठी रसिक अत्यंत सहृदय असावा लागतो याविषयी ‘कवि, काव्य, काव्यरति’ या निबंधात त्यांनी केलेले विवेचन आजच्या काळालाही कसे लागू पडणारे आहे याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. ‘सणांचा व खेळांचा र्हास’ या निबंधात शारीरिक विकासासाठी आणि मनोविकासासाठी सण आणि खेळ याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली आहे.