सुदान देशातील एका सिरॅमिक कारखान्यात काळ एलपीजी टँकरच्या झालेल्या स्फोटात २३ जण ठार झाले असून त्यात १८ भारतीयांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. सुदानमधील भारतीय दुतावासाने या वृत्ताला दुजोरा दिला असून या दुर्घटनेत १३० जण जखमी झाले असल्याचे म्हटले आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पूर्णपणे जळालेले असल्याने त्यांची ओळख पटविणे कठीण झाले आहे. या स्फोटानंतर कारखान्यात कामावर असलेल्या, बेपत्ता झालेल्या व बचावलेल्यांची यादी दुतावासाने प्रसिद्ध केली. दुतावासाने दिलेल्या माहितीनुसार सात जण इस्पितळात दाखल असून त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.
या दुर्घटनेतून वाचलेल्या ३४ भारतीयांची कारखान्यात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. कारखान्यात आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध नव्हती असे या दुर्घटनेनंतर स्पष्ट झाले आहे.