बालसंगोपन ः एक कला

0
183
  •  अंजली मुतालिक

    किती वाजलेत हे सांगताही न येणार्‍या मुलांना पालक हौसेने मॅचिंगचे गड्याळ बांधतात. यात वरदला त्याने हट्ट करताच आईने त्याला सौम्य शब्दात नकार दिला पाहिजे. मुलांचे प्रत्येक हट्ट पुरवले जाणार नाहीत ही त्या मुलाला जाणीव करून द्यायला पाहिजे.

जनकल्याण संस्कार आयाम प्रमुख आणि विद्याभारती या अखिल भारतीय संस्थेमध्ये पाच वर्षे काम केल्यानंतर आणि शिक्षिका असल्यामुळे कायम मुलां-मुलींच्या संपर्कात असल्याने काही विचार मांडावेसे वाटले. यामध्ये कुठेही कोणाला उपदेश करावयाचा नसून मी प्रांजळपणे काय अनुभवले ते संवादातून व्यक्त होतेय इतकंच!

आपल्या आजुबाजूला पाहिलं तर बर्‍याच कुटुंबातून एक अपत्य ही संकल्पना फारच रूढ होताना दिसते आहे. तुरळक ठिकाणी दोन-दोन मुलं पण तिसरं मूल अगदी क्वचितच कुटुंबात दिसेल. पूर्वीची एकत्र कुटुंबपद्धतीही तुरळक झालेली दिसून येते. ‘हम दो हमारे दो’, काही ठिकाणी ‘हम दो हमारा एक’- हाच नारा आहे. मर्यादित कुटुंबाचे फायदे तसेच तोटेही आहेत. विभक्त कुटुंबातील दोन्ही व्यक्ती – आईबाबा दोघांचेही लक्ष अर्थार्जन करण्याकडे असते. पैशांच्या मोबदल्यात आपल्या तान्हुल्याला एखाद्या विश्‍वासू हातांवरती भरवसा ठेवून ती दोघे अधिक पैसा मिळवतात. त्यामुळे बाळाच्या हक्काची आई त्याला खूपच कमी वेळ जवळ मिळत असते. जेवढा वेळ आई, पालक देतात तोे खरेच ‘क्वालिटी टाईम’ असतो का? वेगवेगळ्या वयोगटासाठी एकच ढाचा, साचा, नियम सर्व ठिकाणी लागू होत नाही. प्रत्येक मूल भिन्न असते. प्रत्येकाचा पिंड निराळा असतो. हाही विचार केला तर योग्य दिशेने जाता येईल. आज पालकांकडेच वेळेचा अभाव तर पैशांची सुबत्ता असते. आणि मुलं वेगळ्याच भावाची भुकेलेली असतात. पालक नोकरीलाच अधिक भाव देऊ लागतात. या त्रांगड्यामुळे संवाद कमी होऊन फक्त तणाव वाढतो.

‘‘आमचा वरद, ‘शाळेतल्या मुलासारखं लाईटवालं घड्याळच हवंय’ असा हट्ट करतो.’’
‘‘त्याची आई ना, त्याला शाळेत डबा न देता रोज २० रुपये देते’’.
‘‘तिचे बाबा तिला रोज कारने सोडतात आणि न्यायला पण येतात’’.
‘‘तुमच्या गाड्या काय दसर्‍यादिवशी पूजता का फक्त? मुलाला चालायला लावता एवढं दप्तर घेऊन पाठीवर?’’
वरील संवाद वेगवेगळ्या स्वरूपात कधी नाव बदलून आपणही ऐकलेला असेल. या पहिल्या संवादात वरदने वर्गातील मुलाचे घड्याळ पाहिलेले असते आणि तसेच घड्याळ त्याला पालकांकडून हवे आहे. किती वाजलेत हे सांगताही न येणार्‍या मुलांना पालक हौसेने मॅचिंगचे गड्याळ बांधतात. यात वरदला त्याने हट्ट करताच आईने त्याला सौम्य शब्दात नकार दिला पाहिजे. मुलांचे प्रत्येक हट्ट पुरवले जाणार नाहीत ही त्या मुलाला जाणीव करून द्यायला पाहिजे. अगदी वर्षाच्या मुलापासून १८ ते २१ वर्षांपर्यंतच्या पाल्यांशी, मुलांशी पालकांचा योग्य संवाद असेल तर घर्‍कुल आनंदी होईल.
नंबर वन अपेक्षा – तुलना –
‘‘तुझ्याचएवढी ती स्वरा आहे, ती बघ कशा दोन दोन पोळ्या नेते डब्यात आणि सगळ्या संपवून येते. डबा चकाचक धुतल्यासारखा असतो तिचा! सगळ्या भाज्या खाते ती! आणि तू शीऽ ऽ बॅड गर्ल’’.
‘‘आई, पण मला बटाट्याची भाजी देतेस तेव्हा मी गुड गर्ल असते ना!’’
एकच आई आपल्या एकुलत्या एका लेकीला तिच्या मुडनुसार गुड किंवा बॅड गर्ल ठरवत असते. दुसर्‍या कोणाशी तरी तुलना करून आपल्याच पिलाच्या मनात न्यूनगंडाची भावना वाढवत असते. प्रत्येक मूल हे युनिक आहे. तुमचं प्रत्येकाचं मुल हे एकमेव अद्वितीयच आहे. ज्याप्रमाणे देवाने चेहरे घडवतानाही साचाही एकच ठेवला नाही तर तुम्ही सर्वांना एकाच साच्यात बसवायला बघू नये. ज्यावेळी ती एकच आई कधी गुड तर कधी मला बॅड गर्ल म्हणणार आहे तर मी नक्की कशी आहे? ‘गुड की बॅड’? याबाबत पाल्याला तुम्हीच कन्फ्यूज करू नका.

‘‘तुझ्या चुलत किंवा आते बहिणीला ९४% पडलेत, तुला त्याखाली येऊन चालणार नाही. तुलाही ९० च्या वरतीच मार्क्स हवेत!’’
वरील असेच बरेच मार्क्सवाद घरोघरी आढळून येतात. कुणालाच आपलं मुल गुणवंत नकोय. फक्त मार्कस् असणारं हवं आहे. ६० जणांच्या तुकडीत एकाचाच नंबर येणार बाकी ५९ जण जगायला लायक नाहीत काय? पाचव्या नंबरचा मुलगा उत्तम क्रिडापटूही असेल. आठव्या नंबरचे हस्ताक्षर मोत्यांसारखे असेल. दहावा नंबरवाला उत्तम चित्रकार असेल. पस्तीसावा मोठा अभिनेता असेल. चाळीस नंबरवाला मोठा बिल्डरवाला असेल. आज कोणाच्याच कपाळावर तू उद्या कोण होशील हा शिक्का मारलेला नाही. शिकून कुणी काय काय केलं हाही मोठा विषय होईल. त्यावर नंतर बोलू. तूर्तास कौशल्य वाढवायच्या मागे लागू. नंबरच्या रेसमध्ये तर घोडेच लागतात.