‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ चा तपोभूमीवर उद्घोष!

0
172
  • शंभू भाऊ बांदेकर

शबरीमलासारख्या वादामध्ये स्त्रियांच्या देवदर्शनावर बंधने आणली जात असताना दुसरीकडे कुंडईच्या तपोभूमीमध्ये महिला पुरोहितांकरवी तुलसीविवाह सोहळा अगत्यपूर्वक पार पाडला जात असतो. स्त्री पुरुष समतेचे हे अनोखे उदाहरण स्पृहणीय ठरावे..

श्री दत्त पद्नाम पीठ, गोवा तथा ‘जय मॉं मिशन’ पंजाब यांच्या सहआयोजनाने नुकताच गोमंतकातील गुरुपीठ क्षेत्र तपोभूमी, कुंडई येथे श्री दत्त पद्नाभ पीठाचे पीठाधीश्‍वर सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या अधिष्ठानाखाली ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ या सदराखाली महिला पुरोहितांमार्फत तुळशीविवाह समारंभ संपन्न झाला. सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या ‘घरोघरी पुरोहित’ या संकल्पनेतून निर्माण झालेल्या हजारो प्रशिक्षित महिला पुरोहितांकडून या तुळशीविवाह सोहळ्याचे पौरोहित्य केले गेले, ही तमाम स्त्रियांसाठी भूषणावह अशी गोष्ट म्हणावी लागेल.

विशेष म्हणजे गेली तीन वर्षे राजभवन गोवा येथे तुळशीविवाह महिला पौरोहित्याखाली होत असे. याचे कारण तत्कालीन राज्यपाल मृदुला सिन्हा यांचा पुढाकार असावा. शिवाय राज्यातील विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी, मंत्री, आमदार, उद्योजक अशा सर्वांच्या घरोघरी तपोभूमीच्या महिलांद्वारे तुळशीविवाह संपन्न होत असतो, ही सर्वांसाठी स्तुत्य अशी गोष्ट आहे.

पूर्वी कीर्तन हे ह. भ. प. बुवांचे व्यासपीठ होते. आता महिलांनीही कीर्तन या विषयात प्रावीण्य मिळविले असून गोवा व महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंतच्या मंदिरातून महिला वर्गाकडून उद्बोधक कीर्तनांची पर्वणी चालू असते. मुख्य म्हणजे शबरीमला मंदिरात स्त्रियांना मज्जाव हा विषय कोर्ट-कचेर्‍यांत गाजत असताना आणि यासाठी पुरुषवर्गाचाही महिलांना पाठिंबा असताना एका बाजूने महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवीत असताना काही विपरीत घटना धर्माच्या नावाखाली घडत आहेत, ही कुठल्याच धर्माला भूषणावह अशी गोष्ट नाही, हे तथाकथित धर्ममार्तंडांनी लक्षात घेणे ही आता काळाची गरज होऊन बसली आहे.

स्त्रियांची सर्वांगीण उन्नती झाली पाहिजे यासाठी त्यांनी शिक्षणाची कास धरणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घेऊन ज्याप्रमाणे वंदनीय सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, ताराबाई मोडक, ऍनी बेझंट आदी महिलांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतीबा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महर्षी धोंडो केशव कर्वे, समाजप्रबोधनकार आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी पुरुषवर्गानेही स्त्रियांसाठी महान कार्य केले आहे, हे विसरून चालणार नाही. असे असले तरी ‘नरेचि केला हीन किती नर’ या धर्तीवर आता ‘नारीनेच घोटला नारीचाच गळा’ अशी भयाण परिस्थितीही आपल्या देशातील शीना बोरा हत्याकांडासारख्या प्रकरणातून उघडकीस आली आहे.

बदलत चाललेल्या चांगल्या सामाजिक बदलांबरोबरच गुन्हेगारीचे स्वरूप बदलत चालले आहे आणि त्यात महिलांचा सूड महिलाच घेत आहेत असे भयानक दृश्य वाचनात, ऐकण्यात येत आहे. दूरचित्रवाणी मालिकांतूनही याचे दर्शन घडते.

संस्कृती आणि संस्कार यांच्यापासून आजचा समाज दुरावत चालला आहे. त्यामुळे व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी नातेसंबंध सुद्धा गळून पडत आहेत. याला आता कोणताही भूप्रदेश अपवाद राहिलेला नाही. आपल्या गोव्याचेच उदाहरण द्यायचे झाले, तर तीन चार वर्षांपूर्वी वास्को येथे सुनेने सासूचा कसा खात्मा केला, आपल्या जावेचा कसा काटा काढला हे आठवले की, आपल्या अंगावर शहारे येतात. एकूण वैयक्तिक मानमरातबापोटी, संपत्तीसाठी आणि स्वैराचारापोटी हे साडे घडत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. असे असले तरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र होऊन भांडणार्‍या स्त्री शक्तीचा उद्रेकही गोव्याला नवखा नाही. उदाहरण द्यायचे झालेच तर अंगणवाडी महिलांचे देता येईल.

वेतनातील तफावत, अल्पवेतन आणि असे असूनही वेळोवेळी वेगवेगळे सरकारी सर्वेक्षण अहवाल तसेच अन्य कामकाजासाठी अंगणवाडी महिलांचा वापर मोठ्या प्रमाणात शासनाकडून केला गेला आहे. हे खरे तर त्या महिलावर्गाला प्रशासनाकडून दिले गेलेले शासनच होते, कारण त्या बदल्यात त्यांची मागणी असूनही त्यांना सरकारी सेवकाचा दर्जा मिळाला नाही. म्हणायला महिलांचे प्रतिनिधित्व करणार्‍या संगीता परब, निर्मला सावंत, व्हिक्टोरिया फर्नांडिस, एलिना साल्ढाणा, जेनिफर मोन्सेरात (विद्यमान) यांनी मंत्रिपदे भूषवली, पण त्या त्या वेळच्या सरकारांनी त्यांच्याही तोंडाला पाने पुसली. शेवटी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर येऊन या महिलांनी स्त्रीशक्तीचा उद्रेक काय असतो, हे ही सरकारच्या नजरेस आणून दिले होते, असो. येथे एक गोष्ट सर्व लोकांनी विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे विचार हा खर्‍या लोकशाहीचा आत्मा आहे आणि आपला भारत देश तर लोकशाहीप्रधान देश आहे. येथे सामाजिक विकासात विचारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे विसरून चालणार नाही. किंबहुना आपण असे गृहित धरले पाहिजे की, समाजाच्या सशक्तीकरणाची वाटचाल ही विचारांवर अवलंबून असते, हे आपण प्रत्यक्ष मानत असलो, तरी प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे दिसते. दिवसेंदिवस जातीय आणि धार्मिक कलह कुठे ना कुठे प्रबळ होत असल्याचे देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये घडत असलेल्या बातम्यांवरून समजते. त्यातच कुठे मग मराठा आरक्षण, कुठे ओबीसी आरक्षण, कुठे दलित मोर्चा, कुठे महिला आरक्षण अशा घटनांमुळे ताणतणावाचे वातावरण असल्याचे जाणवते. त्यावर कुणी उघड बोलले किंवा उघड लिहिले तर वातावरण गंभीर होण्याचेही प्रकार घडतात, कारण विचार बरा किंवा खरा यावर गंभीरपणे विचार करण्याचा विचारच कमी झालेला आहे. पत्रकार, लेखक, साहित्यिक किंवा विचारवंत यांनी एखादा परखड विचार व्यक्त केल्यास त्यावर विचारांनी मात करण्याऐवजी धमकी, हल्ला, खून आदी माध्यमातून त्या विचारांचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू होतो. या घटना अर्थातच लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह उभ्या करणार्‍या ठरतात. त्यामुळे एका बाजूला आपण जगातील सर्वांत मोठा लोकशाहीनिष्ठ देश म्हणून आपली पाठ थोपटून घेतो, तर दुसर्‍या बाजूला या लोकशाही देशाची समतेकडून विषमतेकडे होणारी वाटचाल आपल्याला व्यथित करून जाते.

विचारांची गळचेपी कशी केली जाते याबाबतची दोन तीन वर्षांपूर्वीची गोष्ट मला आठवते. कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यातील एका शाळेतील १०० विद्यार्थ्यांनी शाळा सोडली. कारण काय, तर त्या विद्यार्थ्यांना स्वयंपाक करणारी महिला दलित वर्गातील होती, असे त्यांच्या पालकांच्या लक्षात आले. ती शाळा सवर्ण संचालकांची आणि पालकवर्गही सधन व बळकट. त्यामुळे भीतीपोटी कुणीही आवाज काढल्याचे वाचनात आले नाही. अस्पृश्याइतकीच अस्पृश्य लेखली जाणारी स्त्री आज शिक्षणामुळे स्पृश्य बनली आहे, ही जमेची बाजू आहे आणि तमाम स्त्री वर्गाला याचा सार्थ अभिमान वाटला पाहिजे. कीर्तनाच्या माध्यमातून, तुळशीविवाहाच्या माध्यमातून आणि अनेक क्षेत्रात यात विशेषत्वाने क्रीडाक्षेत्र, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राचा अंतर्भाव करावा लागेल. स्त्रीशक्तीने ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले आहे. अशावेळी ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ये, तत्र रमन्ते देवत:’ ही गोष्ट खरी करून दाखवण्यासाठी आपण स्त्रीशक्तीला सर्वशक्तीनिशी पाठिंबा दिलाच पाहिजे!