अरीडेन सँटानाने अंतिम क्षणात नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर ओदिशा एफसीने चेन्नईन एफसीला २-२ असे गोलबरोबरीत रोखत हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमात काल गुण विभागून घेतले. चारही गोल उत्तरार्धात झाले. त्यात ओदिशाने दोन वेळा पिछाडीवरून बरोबरी साधत एक गुण खेचून आणला.
चेन्नईनकडून लिथुआनियाच्या नेरीयूस वॅल्सकीसने दोन्ही गोल केले, तर ओदिशाचे गोल झिस्को हर्नांडेझ आणि अरीडेन सँटाना यांनी केले. जॉन ग्रेगरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्या चेन्नईनने सहा सामन्यांत दुसरी बरोबरी साधली असून एक विजय व तीन पराभव अशा कागिरीसह त्यांचे पाच गुण झाले. त्यांनी केरला ब्लास्टर्सला (४ गुण) मागे टाकत आठवे स्थान गाठले.
जोसेप गोम्बाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्या ओदीशाने सहा सामन्यांत तिसरी बरोबरी साधली असून एक विजय व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे सहा गुण झाले. त्यांचे सहावे स्थान कायम राहिले.
दुसर्या सत्राच्या प्रारंभी चेन्नईनने खाते उघडले. ५१व्या मिनिटाला रॅफेल क्रिव्हेलारोने अनिरुध थापाला उजवीकडे पास दिला. त्यातून थोई सिंगने घोडदौड करीत चेंडू मिळविला. त्याने पेनल्टी क्षेत्राच्या मध्यभागी असलेल्या वॅल्सकीसकडे चेंडू सोपविला. मार्किंग नसल्याचा फायदा उठवित मग वॅल्सकीसने शानदार फिनिशिंग केले. ओदिशाला बदली खेळाडू बिक्रमजीत सिंग याची ढिलाई भोवली.
ओदिशाने तीन मिनिटांत बरोबरी साधली. नंदकुमार शेखरचा क्रॉस पास जेरी माहमिंगथांगाने नियंत्रित केला. त्याचा पास मिळताच हर्नांडेझने अचूक फटक्यावर फिनिशिंग केले.
७१व्या मिनिटाला बदली खेळाडू ड्रॅगोस फर्तुलेस्क्यू याने पेनल्टी क्षेत्रात मारलेला चेंडू किंचित पाठीमागे असूनही नेरीयूसने अफलातून कौशल्य प्रदर्शित करीत ओदिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंगला चकविले.
ओदीशाने ८२व्या मिनिटाला बरोबरी साधली. डॅनीएल लाल्हीम्पुईया याने डावीकडून मारलेला चेंडू हर्नांडेझच्या डोक्याला लागून मार्टिन ग्युएडेसपाशी गेला. मार्टिनने नियंत्रणाचा प्रयत्न केला, पण पेनल्टी क्षेत्रात सँटानापाशी चेंडू गेला. त्याने अचूक फटका मारत चेंडू नेटच्या डाव्या कोपर्यात घालविला.
निकाल :
चेन्नईन एफसी : २ (नेरीयूस वॅल्सकीस ५१, ७१) बरोबरी विरुद्ध
ओदीशा एफसी : २ (झिस्को हर्नांडेझ ५४, अरीडेन सँटाना ८२)