>> १ रोजी घेणार शपथ; फडणवीस, अजित पवारांचा राजीनामा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री होणार आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. येत्या १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवतीर्थावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. काल मंगळवारी सायंकाळी हॉटेल ट्रायडंट येथे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव शरद पवारांनी सुचवले आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले.
फडणवीस, पवारांचा राजीनामा
विधानसभा निवडणूक निकालानंतर दुसर्यांदा सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काल मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सर्वोच्च न्यायालयाने आज दि. २७ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रथम भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बहुमत चाचणी आधीच अल्पमतात आलेले फडणवीस सरकार अवघ्यात साडेतीन दिवसात कोसळले.
अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर भाजपाकडे बहुमत नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरले नाही, त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा करतानाच नव्या सरकारला माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांची विरोधाभास असलेली आघाडी त्यांनाच लखलाभ असो, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला. केवळ ८० तासांत फडणवीस सरकारला पायउतार व्हावे लागले.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यानंतर अडीच वर्षांसाठी शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. यावर तडजोड करण्यास भाजपने नकार दिला. त्यामुळे युतीतून वेगळे होत शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसकडे सत्तास्थापनेसाठी हात पुढे केला होता. मात्र वेळेत त्या दोन्ही पक्षांनी पाठिंबा न दिल्यानं शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही.
अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. याचवेळी महाविकास आघाडी आकारात येत होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार होते. मात्र शनिवारी सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा केला. शनिवारी पहाटे राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
या घटनेनंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसने थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवार दि. २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. या निकालानंतर अचानक अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बहुमत सिद्ध करू शकत नसल्याचे लक्षात आल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही राजीनामा सादर केला.
मात्र यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले.
कालिदास कोळंबकर
हंगामी अध्यक्ष
राज्यपालांनी आज सायंकाळी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. त्यामुळे कोळंबकर हे आज विधानसभेत सर्व आमदारांना शपथ देणार आहेत. राज्यपालांनी आज तातडीने सर्व आमदारांना विधानसभेत बोलावल्याने आजच नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवीन आमदारांचा
आज शपथविधी
दरम्यान, राज्याच्या नव्या विधानसभेचे आज बुधवारी गठन होणार असून सकाळी ८ वाजता आमदारांना विधानसभेत हजर राहण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या आहेत. यानंतर आजच नवनिर्वाचित आमदारांचाही शपथविधी होणार आहे.
तीन दिवसांचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे गेल्या ४७ वर्षात पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करणारे महाराष्ट्राच्या इतिहासातील फक्त दुसरे मुख्यमंत्री ठरले. पण त्याचबरोबर ते फक्त तीन दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. शपथविधीनंतर ७२ तासांतच फडणवीसांवर राजीनामा देण्याची वेळ ओढवली. यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त वसंतराव नाईक यांनीच फक्त पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता.