भरपाई वेळेतील नाट्यात चेन्नईनची हैदराबादवर मात

0
104

हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईन एफसीने पहिल्या गोलसह पहिल्या विजयाची प्रतीक्षा हैदराबाद एफसीविरुद्धच्या थरारक लढतीत संपुष्टात आणली. नेहरू स्टेडियमवर ९० मिनिटांच्या खेळात गोलशून्य बरोबरीची कोंडी झाल्यावर पाच मिनिटांच्या भरपाई वेळेत नाट्य घडले. त्यात तिन्ही गोल झाले. लिथुआनियाचा ३२ वर्षांचा स्ट्रायकर नेरीयूस वॅल्सकीस याने केलेला गोल चेन्नईनसाठी निर्णायक ठरला. त्यामुळे चेन्नईनला प्रथमच तीन गुणांची कमाई झाली.

माल्टाचा ३३ वर्षांचा स्ट्रायकर आंद्रे शेम्ब्री याने चेन्नईयीनचे खाते उघडले होते. इंग्लंडचा ३५ वर्षांचा बचावपटू मॅथ्यू किल्गॅलॉन याने हैदराबादला बरोबरी साधून दिली होती.
आठ मिनिटे बाकी असताना चेन्नईनचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांनी रॅफेल क्रिव्हेलारो याच्या जागी आंद्रेला मैदानावर धाडले होते. भरपाई वेळेत आंद्रेने त्यांचा निर्णय सार्थ ठरविला. त्यानंतर नेरीयसने स्थानिक प्रेक्षकांना जल्लोषाची पर्वणी दिली. चेन्नईनचे पूर्वार्धातील अनेक प्रयत्न थोडक्यात हुकले होते.