>> केंद्रीय गृहमंत्र्यांची राज्यसभेत घोषणा
संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) केली जाणार असल्याची घोषणा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली. याप्रकरणी विरोधी सदस्यांच्या विविध आरोपांना शहा यांनी या सभागृहात उत्तर दिले.
एनआरसीमध्ये धर्मावर आधारीत भेदभाव केला जात असल्याचा आरोप यावेळी शहा यांनी फेटाळला. एनआरसीच्या माध्यमातून नागरिकांची ओळख निश्चित केली जाईल व एनआरसी संपूर्ण भारतात लागू केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही धर्माच्या नागरिकांनी विनाकारण घाबरण्याची गरज नाही असे ते म्हणाले. देशाचे सर्व नागरिक एनआरसी यादीत समाविष्ट व्हावेत अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली.
शहा यांनी यावेळी स्पष्ट केले की एनआरसीमध्ये धार्मिक पातळीवरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही. अन्य धर्मियांचा एनआरसीत समावेश केला जाऊ नये असा कोणताही नियम यात नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. एनआरसी व नागरिकता दुरुस्ती विधेयक या वेगवेगळ्या प्रक्रिया असून त्यांचा परस्परांशी संबंध जोडला जाऊ शकत नाही असे शहा म्हणाले.