किदांबी श्रीकांतवर मदार

0
106

कोरिया मास्टर्स बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ३०० स्पर्धा उद्यापासून सुरू होत आहे. खराब कामगिरीची मालिका मोडित काढत फॉर्ममध्ये परतलेल्या किदांबी श्रीकांतकडून या स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सायना नेहवालने मात्र या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

इंडिया ओपनमधील शानदार कामगिरीनंतर सातत्याने खराब कामगिरी केलेल्या श्रीकांतने मागील आठवड्यात झालेल्या हॉंगकॉंग ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून फॉर्म कमावला होता. आपला हाच धडाका कायम राखण्याचा श्रीकांतचा प्रयत्न असेल.

श्रीकांत आपला सलामीचा सामना हॉंगकॉंगच्या वॉंग वी की व्हिन्सेंट याच्याशी खेळणार आहे. जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतचा वॉंगविरुद्ध १०-३ असा शानदार रेकॉर्ड आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेली सायना नेहवालने पुढील आठवड्यात होणार्‍या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय वर्ल्ड टूर सुपर ३०० स्पर्धेच्या तयारीसाठी कोरिया मास्टर्समध्ये न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. सायनाच्या माघारीमुळे महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व नाही. अन्य भारतीयांमध्ये सोळाव्या स्थानावरील समीर वर्माचा सामना चीनच्या शी युकी याच्याशी होणार आहे तर सौरभला पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या खेळाडूशी झुंजावे लागेल.
समीरला युकी याच्याकडून पाचवेळा पराभवाचा सामना करावा लागला असून मागील वर्षी केवळ डेन्मार्क ओपनमध्ये समीर वरचढ ठरला होता. शुभंकर डे आपल्या मोहिमेची सुुरवात ऑलिंपिक विजेता व द्वितीय मानांकित चेन लॉंग याच्याविरुद्ध करेल. दुहेरीच्या कोणत्याही प्रकारात भारतीयांनी सहभाग नोंदविलेला नाही.