पावसाने बाधित चौथा टी-ट्वेंटी सामना पाच धावांनी जिंकून भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी ९ षटकांचा खेळविण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ९ षटकांत ७ गडी गमावून ५० धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना विंडीजला ५ बाद ४५ धावांपर्यंतच पोहोचता आले.
वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारताकडून केवळ पूजा वस्राकर हिने दुहेरी धावसंख्या करताना १० धावांचे योगदान दिले. विंडीजकडून हेली मॅथ्यूजने ३ तर एफी फ्लेचर व शेनेटा ग्रिमंड यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजकडून हेली मॅथ्यूज (११), शिनेल हेन्री (११) व नताशा मॅकलिन (१०) यांनी दुहेरी धावसंख्या केली. परंतु, अनुज पाटील, दीप्ती शर्मा व राधा यादव यांनी टिच्च्चून मारा करताना भारताला विजयी केले. मालिकेतील पाचवा सामना २० रोजी खेळविला जाणार आहे.