– डॉ. स्वाती हे. अणवेकर
म्हापसा
आहारामध्ये शिळे, पिष्टमय पदार्थ, गोड, खारट, आंबट, आंबवलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, मांस, मासे, अंडी ह्यांचे अतिसेवन ह्यामुळे हा व्याधी बळावू शकतो. ह्यावर वैद्य उपचार करत असताना पंचकर्मातील रक्तमोक्षण ह्याचा उपयोग करतात.
………………………………
आयुर्वेदानुसार ह्या व्याधीचे वर्णन करायचे झाल्यास ह्या आजाराचे अनेक वेगवेगळे प्रकार पाह्यला मिळतात. ह्यामध्ये देखील शरीराच्या कोणत्याही भागावर ह्याची उत्पत्ती होऊ शकते- जसे अंगावर प्रामुख्याने ज्या भागात त्वचेची घडी पडते व जिथे त्वचा ओलसर दमट राहते तिथे हा अधिक आढळतो. ह्यात प्रामुख्याने २ जाघांच्या मध्ये, ओटीपोटावर, स्त्रियांमध्ये स्तनाच्या खाली, काखेत ह्याचे प्रमाण अधिक आढळते.
तसेच असे देखील पाहण्यात आले आहे की ज्या व्यक्तींचे हात व पाय हे सतत पाणी चिखल अथवा मातीमध्ये असतात त्यांच्यामध्ये ही व्याधी होण्याचे प्रमाण अधिक असते. तसेच बर्याच लोकांच्या चेहर्यावरही ह्याचे वण आढळून येतात. ज्या व्यक्तींना डोक्यामध्ये सतत घाम येतो, किंवा ते केसांची व डोक्याची स्वच्छता नीट ठेवत नाहीत अशा व्यक्तींच्या डोक्यातदेखील हा होताना आढळतो. पण शरीराच्या प्रत्येक भागामध्ये ह्याचे स्वरूप व लक्षणे ह्यात भेद आढळून येतो. ह्या सगळ्याची सविस्तर माहिती पाहण्याआधी ह्यामध्ये कोणकोणते दोष व धातू प्रामुख्याने दुषित झालेले असतात ते पाहणे आवश्यक आहे.
हा व्याधी प्रामुख्याने शरीरात कफ व वात हे दोष दुषित होऊन त्वचेचा जो भाग कमी रोगप्रतिकारशक्तीचा असेल त्या भागातील त्वचेमध्ये हे दोष जातात व त्या भागात व्याधी उत्पन्न करण्याची प्रक्रिया सुरु करतात. प्रथम ह्यात काही व्यक्त लक्षणे दिसत नसली तरीदेखील व्याधी शरीरात असतो आणि जसे ह्याला काही बाह्य कारणांची साथ लाभते- जसे चुकीचा आहार-विहार… मग ह्या व्याधीची व्यक्त लक्षणे त्वचेच्या त्या भागात दिसू लागतात. क्वचित प्रसंगी जर ह्यामध्ये पित्त दोषाची दुष्टी आढळून आली तर मात्र लक्षणे तीव्र स्वरूप धारण करू शकतात. ह्या व्याधीमध्ये रक्त व मांस हे धातूदेखील दिशीत झालेले आढळतात.
हा व्याधी ज्यावेळी त्वचेवर वण उत्पन्न करतो त्यावेळेस ते काळपट तांबड्या वर्णाचे व क्वचित प्रसंगी गोलाकार व कडा जाडसर असणारे व पुष्कळ वेळेस मध्य भागापासून वाढत जाणारे अथवा कडाकडून एका भागातून दुसर्या भागात प्रसार पावणारे असतात. ह्यामध्ये सुरुवातीला खाज वैगरे जास्त नसते पण जसजसा हा जीर्ण होत जातो तशी ह्यात खाज, टोचल्याप्रमाणे संवेदना, जळजळ वाटू शकते.
हातापायांच्या बोटांमध्ये जेव्हा हे होते तेव्हा ह्याचा आकार समांतर नसतो. तिथली त्वचा कुरतडल्याप्रमाणे वण उत्पन्न होतात. वणाचा रंग पांढरट गुलाबी असून ह्यामध्ये सुरुवातीपासूनच भरपूर खाज असते, क्वचित स्त्रावदेखील होतो. योग्य काळजी न घेतल्यास हे पुढे पसरत जाते.
चेहर्यावर जेव्हा हे उत्पन्न होते त्यावेळेस तिथे फक्त सुरुवातीला हलका त्वचा वर्णाचाच पण त्यापेक्षा थोडा गडद रंगाचा वण उत्पन्न होतो, जो पुढे वाढत जातो. त्यांची संख्यादेखील वाढत जाते व ह्यात विशेष खाज जळजळ असत नाही पण त्याभागाचे त्वचेवरील रोम मात्र नष्ट होताना दिसतात.
घडी पडलेल्या त्वचेवर जसे स्तनाखाली, माड्यामध्ये, जेव्हा हे उत्पन्न होते तेव्हा ह्यात सुरुवातीला बारीक लालसर पुळ्या उठतात ज्यात हळूहळू खाज येऊ लागते व खाजवल्यावर ते भराभर पसरून अन्य निरोगी त्वचादेखील व्यापून टाकतात. व पुढे काही कालांतराने तो भाग काळपट लालसर झालेला आढळतो.
डोक्यात जेव्हा हा होतो तेव्हा डोक्यामध्ये भरपूर खाज येते व तिथे पुरळ येतात व खाजवल्यावर त्यातून स्त्राव निघतो व तो डोक्याच्या त्वचेला चिकटून पुढे डोक्याची त्वचादेखील खवडयाप्रमाणे सुटू लागते व त्यासोबत त्या भागातील केससुद्धा गळून पडतात.
असे ह्या व्याधीचे स्वरूप वेगवेगळ्या भागात वेगवेगळे असते.
हा होण्याची अनेक करणे आहेत त्यातील प्रमुख म्हणजे –
* शरीराची अस्वच्छता, फणी, कपडे इ गोष्टी अस्वच्छ असणे अथवा एकमेकांचे किवा ह्या विकाराने ग्रस्त व्यक्तीची फणी अथवा कपडे वापरणे. दुसर्याचे मोजे चप्पल वापरणे, वारंवार माती, चिखल, पाणी ह्यांच्याशी संपर्क, खूप घाम येणे, दमट हवामान, गरम वातावरण, इ आहारामध्ये शिळे, पिष्टमय पदार्थ, गोड, खारट, आंबट, आंबवलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, मांस, मासे, अंडी ह्यांचे अतिसेवन ह्यामुळे हा व्याधी बळावू शकतो.
ह्यावर वैद्य उपचार करत असताना पंचकर्मातील रक्तमोक्षण ह्याचा उपयोग करतात. तसेच खदिर, कुष्ठ, निंब, कढीपत्ता, टाकळा बी, हळद ह्यांचा लेप उपयुक्त ठरतो. पोटात घ्यायला खादिरारीष्ट, महामंजीष्ठादी काढा, सारीवाध्यासव, गंधक रसायन, चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी, सूक्ष्म त्रिफळा ह्यांचा उपयोग वैद्य करतात.
(वर दिलेले उपचार हे फक्त वाचकांच्या माहितीसाठी आहेत. त्यांचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करू नये ही नम्र विनंती)
क्रमशः