- डॉ. मनाली म. पवार
(गणेशपुरी-म्हापसा)
जी व्यक्ती मलीन अर्थात अशुद्ध आहार सेवन करते व त्यामुळे तिचा आत्मा रज व तम दोषाने व्याप्त होतो. व्यक्तीच्या शरिरात जेव्हा वात, पित्त व कफदोष हे एकेकटे किंवा सर्वजण मिळून रक्तवह, रसवह आणि संज्ञावह स्रोतसांना अवरुद्ध करतात तेव्हा मद, मूर्च्छ, संन्यास या तीन व्याधी उत्पन्न होतात.
मूर्च्छा ही मदाचीच पुढची अवस्था आहे. या व्याधीमध्ये सुख व दुःख यांची जाणीव संपूर्णपणे नष्ट होते. मनुष्य काष्ठाप्रमाणे निश्चल पडतो. या व्याधीला मूर्च्छा म्हणतात.
प्रत्येक सजीव प्राणी हा ‘सचेतन’ असतो. झाडाझुडपांपासून ते किड्यामुग्यांपर्यंत प्रत्येकाला वातावरणातील बदलांना प्रतिसाद देता येतो. निसर्गाचा बदल समजतो, दिवस- रात्रीचे भान असते. पण शरीरातल्या सचेतनेबरोबर संवेदनशील मन असते. पण कधी कधी शरीरातल्या तसेच मनातल्या बिघाडांमुळे जेव्हा ही जाणीव बोथट होते किंवा अकार्यक्षम होते, तेव्हा त्याचे नेहमीचे व्यवहार थंडावतात. आयुर्वेदात या स्थितीचे तीन रोगात वर्गीकरण केलेले आहे.
* मद रोग – यात मनुष्याला आपल्या वागण्या-बोलण्याचे भान राहत नाही.
* मूर्च्छा रोग – यात मनुष्याचे भान हरपते पण शुद्धीवर येतो.
* संन्यास रोग – यात शुद्ध हरपते आणि लागलीच उपचार मिळाले नाही तर मृत्यू येतो.
या तीनही रोगात बरेच साम्य आहे. मन आणि संज्ञावह स्रोतसे यांची विकृती या तीनही रोगात असते. ‘मोह’ हे लक्षण तीनही व्याधीत समान असते. सुख व दुःख यांची संवेदना किंवा घडणार्या गोष्टी यांची योग्य जाणीव न होणे म्हणजेच मोह होय.
आयुर्वेद शास्त्राप्रमाणे मनाचा क्षोभ आणि संज्ञेचा मोह असणार्या मद, मूर्च्छा व संन्यास या तीनही व्याधींमध्ये पित्त या शारीरिक दोषाचा व तम या मानस् दोषाचा प्रकोप असतो. मद, मूर्च्छा, संन्यास हे एकापेक्षा एक अधिक म्हणजे उत्तरोत्तर अधिक गंभीर असे रोग आहेत.
जी व्यक्ती मलीन अर्थात अशुद्ध आहार सेवन करते व त्यामुळे तिचा आत्मा रज व तम दोषाने व्याप्त होतो. व्यक्तीच्या शरिरात जेव्हा वात, पित्त व कफदोष हे एकेकटे किंवा सर्वजण मिळून रक्तवह, रसवह आणि संज्ञावह स्रोतसांना अवरुद्ध करतात तेव्हा मद, मूर्च्छ, संन्यास या तीन व्याधी उत्पन्न होतात. अर्थात्, दोषांची तीव्रता आणि संप्राप्तीची व्याधी कमी असेल तर मद, मध्यम असेल तेव्हा मूर्च्छा आणि फारच अधिक असेल तेव्हा संन्यास उत्पन्न होतात.
अशुद्ध आहार म्हणजे आहाराचे नियम न सांभाळता घेतलेला आहार. यात शिळे अन्न, प्रकृतीचा व शुद्धतेचा विचार न करता केलेला मांसाहार किंवा मद्यपान, विरुद्ध आहार, अति प्रमाणात किंवा अगोदर खाल्लेले अन्न पचण्यापूर्वीच पुन्हा आहार घेणे, चुकीच्या वेळी घेतलेला आहार, अशुद्ध वातावरणात, वाईट मनःस्थितीत घेतलेला आहार. अशुद्ध आहाराचा आणि रज-तम गुणांचा संबंध असतो. शिवाय आपल्या वागणुकीतूनही रज, तम दोष वाढू शकतात.
सतत चिडचिड करणे, इतरांची निंदानालस्ती करणे, स्वतःची कामे नीट न करणे, इतरांना फसविणे, खोटे बोलणे, आणशीपणा करणे, आवश्यकतेपेक्षा जास्त झोपणे… अशा प्रकारच्या आचरणाने रजो-तमोदोष वाढतात. अशा प्रकारे आहार व आचरणात बिघाड असला की त्याचा परिणाम म्हणून वात- पित्त- कफ हे दोष बिघडणे स्वाभाविक असते. आतूनच मद, मुर्च्छा, संन्यास या भयंकर रोगांची सुरुवात होते.
मद रोग ः- मद ही मूर्च्छेची पहिली अवस्था, म्हणजेच पूर्वरुपावस्था आहे, असे विवेचन आढळते. पण प्रत्येकवेळी मदानंतर मूर्च्छा असेलच असे नाही. म्हणूनच मदाचा वेगळा व्याधी म्हणूनही विचार मांडला जातो.
पूर्वरूपे ः-
एखाद्या ठिकाणी टक लावून पाहात बसणे, मौन, विकृत चेष्टा आणि तंद्रा ही रूपावस्थेत आढळणारी लक्षणेच अल्प प्रमाणात असतात.
वातज मद ः- यामध्ये अडखळत परंतु घाईने बोलणे, प्रत्येक हालचाल वेगाने पण अडखळत असणे, शरीर रूक्ष होणे ही लक्षणे आढळतात. व्याधी अधिक वाढल्यास नखं, नेत्र, इ. ठिकाणी श्यावता येते.
पित्तज मद – क्रोध येणे हे लक्षण पित्तज मदामध्ये महत्त्वाचे आहे. त्यामुळेच रुग्ण अकारण कठोर बोलतो., मारावयास धावतो किंवा भांडण करतो.
कफज मद – रुग्ण अगदी कमी व असंबद्ध बोलतो. आलस्य, तंद्रा, ध्यान आदी लक्षणे असतात.
त्रिदोषज मदामध्ये ही सर्व लक्षणे एकत्रित आढळतात.
मदरोग समजवताना ‘मदो मद्यममदाकृतिः’ असे सांगितले आहे. मद्यपान केल्यानंतर नशा चढते व ज्या प्रकारची लक्षणे त्या रोगात दिसतात त्याला मदरोग म्हणतात. मात्र मद रोगावर औषधोपचार करता येतात. आहार – आचरणातील बदलही यातून बाहेर पडण्यासाठी सहाय्यक होतात.
मूर्च्छा रोग –
भान हरपणे पण लगेच शुद्धीवर येणे असे या रोगाचे स्वरूप असते. मूर्च्छा ही मदाचीच पुढची अवस्था आहे. या व्याधीमध्ये सुख व दुःख यांची जाणीव संपूर्णपणे नष्ट होते. मनुष्य काष्ठाप्रमाणे निश्चल पडतो. या व्याधीला मूर्च्छा म्हणतात.
मूर्च्छेमध्ये चेतनाशक्तीचा र्हास होतो व आयुर्वेद शास्त्रानुसार चेतनेचे अधिष्ठान हृदय आहे. हृदयातून रक्तवाहिन्याद्वारे सर्व शरीरास रसरक्तादी धातूंचा पुरवठा होत असतो. कोणत्याही कारणाने शरीरधातूंना मिळणारा रक्तपुरवठा कमी झाला तर आपत्ती ओढवते. शरीरधातू आपले कार्य करिनासे होतात. हृदयाच्या विकृतीमुळे किंवा रक्तवाहिन्यातील दोषांमुळे इंद्रियांचे अधिष्ठान असणार्या या इंद्रियावर नियंत्रण करणार्या प्राणवायुचे प्रमुख स्थान असणार्या शिर प्रदेशाचा रक्तपुरवठा कमी पडल्यावर मस्तिष्क विकृती होऊन इंद्रिय व मन यांचीही विकृती होते आणि मोह उत्पन्न होतो. म्हणूनच मूर्च्छेच्या कारणांमध्ये अभिघात म्हणजे शिरोभिघात सांगितले आहे.
वातज मूर्च्छा –
मूर्च्छित पडण्यापूर्वी व्यक्ती अवतीभवती निळसर, काळसर किंवा संध्याकाळच्या वेळी असतो तसा रंग होतो. मात्र लगेचच पुन्हा शुद्धीवर येतो. बेशुद्धावस्थेत शरीर कापणे, नंतर हृदयात वेदना होणे, अंग दुखणे, त्याचा रंग काळवंडणे ही इतर लक्षणे असतात.
पित्तज मूर्च्छा – बेशुद्ध पडण्यापूर्वी व्यक्ती आसपास लालसर, हिरवा किंवा पिवळा रंग पाहते. डोळ्यांसमोर अंधारी येऊन भान हरपते. शुद्धीवर आल्यावर घाम, तहान तसेच शरीरात दाह ही लक्षणे अनुभूत होतात. डोळे लालसर- पिवळसर दिसू लागतात. तसेच व्याकूळ होतात. जुलाब होतात. संपूर्ण शरीर पिवळसर दिसू लागते.
कफज मूर्च्छा – बेशुद्ध पडण्यापूर्वी व्यक्ती अवतीभवती ढग पाहते किंवा काळाकुट्ट अंधार पाहते. कफज मूर्च्छेतून शुद्धीवर येण्यास थोडा वेळ लागतो. शुद्धीवर आल्यावर शरीरावर ओले चामडे गुंडाळले आहे की काय असा भास होतो. तोंडातून लाळ स्रवते. तसेच मळमळते.
त्रिदोषज मूर्च्छा – या मूच्छेचा वेग आकडी येते याप्रमाणे असतो.
मूर्च्छा चिकित्सा ः-
मूच्छेची चिकित्सा करताना वेगकालीन चिकित्सा व अवेगकालीन चिकित्सा यांचा वेगळा विचार करावा लागतो. वेगकालीन अवस्थेमध्ये मोह – मूर्च्छा दूर करून संग पुन्हा प्राप्त होण्यासाठी विविध प्रकारचे उपचार करावे लागतात तर वेगावस्था नष्ट झाल्यानंतर यव क्षोभ करणारे हेतू शोधून ते पुन्हा घडणार नाहीत या दृष्टीने त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करावे लागतात.
मनाला बल देणारी रसायन चिकित्सा या अवेगकालात अपेक्षित असते.
वेगकालीन चिकित्सा –
मूर्च्छा पीडित रुग्णाला वेगकालाप्रमाणे तीक्ष्ण अंजने, धूम, प्रशमन, नस्य, सूयांनी टोचणे, केस व लोम उपटणे, नाकाखाली सूया टोचणे, चावणे, अंगाला खाजनखुजली लावणे अशा प्रकारे तीक्ष्ण उपचार करावे लागतात.
संज्ञा प्रबोधन या सर्व उपायांनी घडत असते. तीक्ष्ण अंजनरुधि श्वासकुंभरसे सूक्ष्म चूर्ण मधाबरोबर घेऊन त्याचे अंजन केले जाते.
मिरची, मरिच आदी तीक्ष्ण द्रव्यांचा धूम वापरला जातो. प्रशमन नस्यासाठी वचा, मरिच यांच्या चूर्णाचा वापर करतात.
– कांद्याच्या रसाने अवपीडन नस्य देणे किंवा कांदा फोडून तो नाकाशी धरून हुंगवणे याचाही चांगला उपयोग होतो.
– मूर्च्छा हा पित्तप्रधान व्याधी आहे, हे लक्षात घेऊन शीतोपचार आवश्यक ठरतात.
– अंगावर गार पाणी शिंपडणे, रुग्णास सावलीत नेणे, व त्याला भरपूर वारा मिळेल अशी सोय करणे हेही महत्त्वाचे उपचार ठरतात.
अवेगकालीन चिकित्सा –
– मूर्च्छेचा वेग गेल्यानंतर रोग्याला शीत, शांत आणि प्रसन्न स्थळी बसवावे.
– शीत द्रव्यांचा लेप करावा.
– शीत आणि सुगंधी पेय पिण्यास द्यावे,
– मनावर कार्यकारी अशी ब्राह्मी, जटामासी, शंखपुष्पी यासारखी औषधी द्रव्ये वापरवीत.
– मनावर कार्यकारी म्हणून ब्राह्मी घृताचा वापर करावा. केवळ गायीचे तूप हेही स्वतः मनोदोष दूर करणारे मेध्य आहे.
संन्यास रोग –
मदाप्रमाणे मूर्च्छासुद्धा काही क्षणांपुरती येते आणि त्यातून मनुष्य सावरतो व पुन्हा भानावर येतो. संन्यास योगात मात्र तसे घडत नाही.
तसेच मूर्च्छेमध्ये दोषांचा वेग शांत झाल्यावर मनुष्य आपोआप भानावर येतो. संन्यासात मात्र औषध दिल्याशिवाय बेशुद्धी दूर होत नाही तसेच औषध दिले तरी बेशुद्धी दूर होईलच असे नसते.
या रोगात मनुष्य निश्चेष्ट म्हणजे मृतप्राय झालेला असतो.
– तीक्ष्ण अंजन म्हणजे मनःशिला, मिरी, अंजन, कापूर वगैरे तीक्ष्ण द्रव्यांपासून बनवलेले अंजन डोळ्यात घालणे.
– प्रधमन् ः वेखंड, पिंपळी वगैरे द्रव्यांचे सूक्ष्म चूर्ण नाकात फुंकणे
– महाळुंगाच्या रसात सुंठीचे चूर्ण मिसळून ते मूर्च्छित व्यक्तीच्या मुखात घालणे. मात्र हे सगळे उपचार अनुभवी, तज्ज्ञ वैद्यच करू शकतो.
मद आणि मूर्च्छा असणार्या व्यक्तीसाठी सर्वांत उत्तम उपाय म्हणजे पंचकर्म स्नेहन- स्वेदनयुक्त पंचकर्माद्वारे शरीरातील विषद्रव्ये, प्रकूपित झालेल्या दोषाचा निचरा करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होय.
– पंचकर्मानंतर मानसिक रोगात सांगितलेली औषधी तुपं. उदा. कल्याणक घृत, ब्राह्मी घृत, दहा वर्षांचे जुने तूप, उत्तम रसायने घेण्याने गुण येतो.
– आयुर्वेदातील ग्रहचिकित्सेत या रोगांवर काही उपाय सांगितले आहेत.
– परमेश्वराजवळ भावपूर्ण प्रार्थना करणे, रुग्ण कोमात असला तरी त्याला सगळे समजते आहे असा विश्वास ठेवून खोलीत संगीत लावणे, वातावरण सुगंधी ठेवणे, धूप-दीप जाळणे.
मेंदूचा कुठलाच विकार चांगला नसतो. दिवसेंदिवस वाढणारे मेंदूचे विकार खरोखरच संपूर्ण उपचार व्यवस्थेला मोठे आव्हानच आहे.