एनडीएचे विघटन

0
175

महाराष्ट्रातील बेबनावानंतर शिवसेनेने केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधूनही बाहेर पडण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली आहे. केंद्रातील सेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर त्याची चाहुल लागलीच होती. संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि शिवसेनेदरम्यान कोणी तरी दरी निर्माण करीत असल्याचा आरोप केल्यानंतर पुन्हा शिवसेना आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व यामध्ये थेट बोलणी आणि वाटाघाटीची दारे पुन्हा किलकिली होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती, परंतु भाजप नेत्यांनी शिवसेनेवर केलेला पलटवार पाहता ही शक्यताही जवळजवळ मावळलेली आहे. त्यामुळे आता एनडीएतून बाहेर पडण्यावाचून शिवसेनेकडेही पर्याय उरलेला नाही. लोकसभेत आणि राज्यसभेत त्यामुळे शिवसेनेच्या अठरा खासदारांची जागा आता सत्ताधारी बाकांवरून विरोधी बाकांवर हलवली जाईल. परंतु हिंदुत्वाची समान विचारधारा सांगणारी शिवसेना राष्ट्रहिताच्या विषयांमध्ये भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता नाही हेही तितकेच खरे आहे. मग एनडीएमधून बाहेर पडण्याचे कारण काय? तर केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हेच त्याला निमित्त ठरलेले आहे. महायुतीचा घटक या नात्याने भाजपासोबत सुखाने पाच वर्षे सत्ता उपभोगण्याची संधी शिवसेनेपुढे चालून आलेली होती, परंतु केवळ भाजपाला वरचढ राहण्याच्या हव्यासापोटी मुख्यमंत्रिपदाचे निमित्त करून सेना ती गमावून बसली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्याला पाठिंबा देण्यासाठी उतावीळ असतील आणि आपण भाजपशी फारकत घेताच पाठिंब्यासाठी धावून येतील हे शिवसेनेचे गृहितक पूर्ण फसले आहे. ज्या प्रकारे ते दोन्ही पक्ष शिवसेनेची जिरवत राहिले आहेत, ते पाहिल्यास अशा अपमानास्पद प्रकारे त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यापेक्षा भाजपसमवेत सत्तास्थापना का वाईट होती असा प्रश्न निर्माण होतो. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आता पूर्वीची राहिलेली नाही असे नुकतेच संजय राऊत म्हणाले. लालकृष्ण अडवाणी हे या आघाडीचे निमंत्रक होते, ते अज्ञातवासात गेले आहेत. अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी आणि प्रकाशसिंग बादल यांच्या प्रयत्नांतून शिवसेनेसारख्या समविचारी आणि इतर प्रादेशिक पक्षांची मिळून एक व्यापक राष्ट्रीय लोकशाही आघाडी कॉंग्रेसच्या विरोधात स्थापन झाली होती. त्यांनी वाजपेयींना सरकार चालवण्याची संधी दिली आणि चोवीस पक्षांचे ते कडबोळे सरकार एकदा जयललितांमुळे तोंड पोळले गेले तरी नंतर वाजपेयींनी चालवून दाखवले. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या भाजपमधील उदयानंतर भाजपची स्वतःची ताकद वाढत गेली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांना पूर्वीची किंमत राहिली नाही. त्यामुळे जसजसे निवडणुकांतून यश मिळत गेले, तसतसे एकेका मित्रपक्षाचे जड झालेले ओझे भाजपा फेकून देत राहिला आहे. पूर्वी असे काही मतभेद निर्माण झाले की भाजपचे केंद्रीय नेतृत्व प्रमोद महाजनांसारखे आपले दूत लगोलग सामोपचाराच्या बोलण्यांसाठी रवाना करायचे, परंतु हल्ली तसे काही होताना दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा गोंधळ होऊन शिवसेना दुरावली, तरी भाजपने केंद्रीय नेत्यांना मातोश्रीवर पाठवून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न देखील केल्याचे दिसले नाही. युती फिसकटत असल्याचे दिसताच अमित शहांची भेट देखील रद्द करण्यात आली आणि चर्चेची दारे बंद करण्यात आली. भाजपचा हा अतिआत्मविश्वास म्हणा वा अहंकार म्हणा, परंतु यामुळे कॉंग्रेसविरोध या कारणासाठी भाजपची साथ देणारे पक्ष आता त्यापासून दुरावत चाललेले आहेत आणि ही काही जमेची बाजू म्हणता येत नाही. वापरा आणि फेकून द्या अशीच नीती भाजप त्यांच्यासंदर्भात वापरताना दिसतो आहे. उगवत्या सूर्याला दंडवत घालत काही पक्ष भाजपाच्या वळचणीला जरी राहिलेले असले, तरी त्यांनाही त्यांची गरज संपताच बाहेरची वाट दाखवली जाईल यात शंका नाही. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने स्वतःच्या बळकट असण्याची कितीही ग्वाही दिली, तरी विघटनाची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झालेली आहे. आपल्या देशाची एकूण भौगोलिक रचना आणि वैविध्य लक्षात घेता, एकाच पक्षाची सत्ता संपूर्ण देशावर प्रस्थापित होणे निव्वळ अशक्य आहे. भाजपचा प्रसार अजूनही उत्तर भारतापुरताच सीमित राहिला आहे आणि तेथेही तीन महत्त्वाची राज्ये जनतेने भाजपकडून पुन्हा कॉंग्रेसच्या हाती दिली आहेत. दक्षिणेमध्ये कर्नाटकचा अपवाद सोडला तर इतर राज्यांत प्रादेशिक पक्ष अजूनही आपले भक्कम स्थान राखून आहेत आणि त्यांना सोबत घेऊनच भाजपला आपले राजकारण पुढे न्यावे लागेल. ईशान्य भारतामध्ये तर छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षांना एक तर सोबत घेऊन किंवा त्यांच्या नेत्यांचे इनकमिंग सुरू करूनच भाजपला आपला जम बसवावा लागला आहे. इतर राज्यांमध्ये देखील मित्रपक्षांतून आणि विरोधी पक्षांतून भाजपने ज्या प्रकारे इनकमिंग सध्या चालवलेले आहे, ते पाहाता मूळचे भाजपवाले कोण आणि आयात केलेले कोण आणि त्यांचे प्रमाण काय हे सांगणेच आता कठीण होऊन बसलेले आहे. त्यामुळे खुद्द भाजपालाच एनडीएची अवकळा येत चाललेली आहे.