
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून प्रारंभ होत असून या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले. यावेळी मोदी यानी या अधिवेशनात सर्व महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणण्यास आपल्या सरकारची तयारी आहे अशी ग्वाही विरोधकांना दिली. दरम्यान याच बैठकीत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जम्मू काश्मीरमधील लोकसभा खासदार डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्या स्थानबध्दतेविरोधात जोरदार आवाज उठवला. अब्दुल्ला यांना लोकसभा अधिवेशनात सहभागी होऊ देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.
या बैठकीत चर्चेदरम्यान विरोधी खासदारांनी आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकर्यांचे प्रश्न अशा महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्याची आग्रही मागणी केली. अशी माहिती कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली.
२७ पक्षांच्या खासदारांची उपस्थिती लाभलेल्या या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी सभागृहाचे सर्वात महत्वाचे काम हे महत्वपूर्ण विषयांवर चर्चा, मतप्रदर्शन करणे असल्याचे सांगितले अशी माहिती संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. सभागृहाच्या नियम व प्रक्रियांनुसार सर्व विषयांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे असे मोदी यांनी स्पष्ट केल्याचे जोशी म्हणाले. फारुख अब्दुल्ला यांच्या लोकसभा अधिवेशनातील सहभाग आणि त्यांची स्थानबध्दता यावरून बोलताना कॉंग्रेसचे गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘एखाद्या खासदाराला बेकायदेशीरपणे स्थानबध्द कसे केले जाऊ शकते? त्यांना संसदीय अधिवेशनात उपस्थित राहू दिले पाहिजे?’.